नाटक आणि चित्रपट या दोन्ही जरी प्रयोगक्षम कला असल्या तरी  नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर होत असताना त्यात अनेक बदल होतात. त्याची बरीच कारणे आहेत. कारण मूलत: या दोन कलाप्रकारांची बलस्थाने आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत. त्यांचा विचार या बदलांना कारणीभूत ठरतो.
एकोणिसावे शतक संपता संपता चित्रपटकलेने जन्म घेतला आणि पाहता पाहता ती विसाव्या शतकातील सर्वाधिक महत्त्वाची कला बनली. याचे प्रमुख कारण म्हणजे चित्रपट ही एक कला नसून ते अनेक कलांचे संयुग आहे. साहित्य, संगीत, छायाचित्रण, चित्रकला, नृत्य, वास्तुशास्त्र अशा अनेक कलांतील सामथ्र्ये चित्रपटाने स्वत:त सामावून घेतली आणि आपला विकास साध्य केला. अगदी मूकपटाच्या काळापासून साहित्य व चित्रपट या कलांचे साहचर्य पाहावयास मिळते. लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक अशा विविध प्रकारच्या lr07साहित्यकृतींवर आजवर हजारो चित्रपट निर्माण झाले आहेत. प्रत्येक प्रकारच्या साहित्यकृतींचे चित्रपटीकरण करताना दिग्दर्शकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. शब्द माध्यमातून दृश्य माध्यमात होणाऱ्या प्रवासाचा शोध हा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. या लेखाच्या मर्यादेत आपण फक्त नाटक आणि सिनेमा यांतील माध्यमांतराचा विचार करणार आहोत.
प्रत्येक कला प्रथम स्वान्त सुखाय जन्मली व वाढली. पण चित्रपटकलेच्या बाबतीत एक विलक्षण गोष्ट घडली. ती ही की, ही कला जन्मताक्षणीच व्यवसायाच्या विळख्यात सापडली. एक नवा फायदेशीर व्यवसाय म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ  लागले. चित्रपटकला ही परफॉर्मिग आर्ट असल्यामुळे स्वाभाविकपणे दुसऱ्या परफॉर्मिग आर्टशी, विशेषत: नाटकाशी तिची स्पर्धा आहे अशी हवा निर्माण केली गेली व नंतर ते गृहीतच धरले गेले. आता नाटक लवकरच नामशेष होईल अशी भाकितेही केली गेली. अर्थात ती खोटी ठरली, ही गोष्ट निराळी.
नाटक आणि सिनेमातील स्पर्धेच्या चर्चेबरोबरच या दोन कलांतील मूलभूत साम्य-भेदांचाही अभ्यास सुरू झाला. या दोन्ही परफॉर्मिग आर्ट असल्या तरी दोन्हीतील साम्य येथेच संपते. नाटक हा सर्वार्थाने एक ‘जिवंत’ प्रयोग असतो. अभिनेते हे प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मंचावर हजर असतात, ते एकमेकांशी संवाद करतात, तसेच प्रेक्षकांशीही! प्रत्येक प्रयोग हा एकमेवाद्वितीय असतो, हे नाटकाचे फार मोठे वैशिष्टय़ आहे. चित्रपट हे मात्र घडवून आणलेल्या प्रयोगाचे तंत्राच्या साह्याने जतन केलेले रूप असते. ते कायम असते. त्यात बदल होत नाही.
एखाद्या नाटकावरून जेव्हा दिग्दर्शक चित्रपट तयार करू पाहतो तेव्हा त्याच्यासमोर नाटकाला त्याच्या विशिष्ट आकृतिबंधातून- चौकटीतून कसे बाहेर काढावे, हा कळीचा प्रश्न असतो. नाटकाचा अवकाश हा रंगमंचापुरता सीमित असतो. तीन भिंतींच्या घरात नाटककाराला आपली पात्रे खेळवावी लागतात. तंत्राच्या विकासाबरोबर सरकता व फिरता रंगमंच अशा काही संकल्पना आल्या असल्या तरी नाटकाचा एकंदरीत lr09अवकाश फारसा वाढला नाही. नाटकातील नाटय़ हे स्टेजच्या चौकटीत बद्ध असते ही गोष्ट प्रेक्षकांनी स्वीकारलेली असते. ते तिच्याबद्दल तक्रार करीत नाहीत. पण केवळ नाटकाचे कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याने सिनेमा तयार होत नाही. कारण ही चौकट सिनेदिग्दर्शक तोडू शकतो, हे प्रेक्षकाला माहीत असते. चित्रपटात अवकाश अमर्यादित असतो. एका क्षणात दिग्दर्शक महानगर दाखवू शकतो आणि दुसऱ्याच क्षणी तो प्रेक्षकाला हिमालयाच्या कुशीतही नेऊ शकतो. स्टेजच्या बंधनामुळे नाटककाराला अनेक दृश्ये प्रत्यक्ष मंचावर घडलेली दाखविता येत नाहीत. युद्ध किंवा विध्वंसाच्या दृश्यांचे फक्त सूचन संवादातून करता येते. ही दृश्ये प्रत्यक्ष दाखवल्यामुळे परिणामात कोणती भर पडेल याचा विचार दिग्दर्शकाला करावा लागतो. मात्र, चित्रपटाला ‘बाहेर’ काढल्याने आपोआप त्याची परिणामकारकता वाढेल असे नाही. अनेकदा बाह्य चित्रीकरणाच्या हव्यासाने नाटकाचा बंदिस्तपणा नष्ट होतो. त्यामुळे या क्लृप्तीचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो.
रंगमंचाची मर्यादा, पात्रांच्या हालचाली, त्यांचे येणे आणि जाणे यांचा बारकाईने विचार करून नाटककाराला नाटकाची रचना करावी लागते. त्याची प्रवेश आणि अंकांत विभागणी करावी लागते. सिनेदिग्दर्शक या तांत्रिक अडचणीतून सहज सुटका करून घेऊ  शकतो. काळाचे दर्शन घडविण्याची सिनेमाची शक्ती नाटकापेक्षा खूपच जास्त असते. काळावर सिनेदिग्दर्शकाचा ताबा असतो, तर नाटय़-दिग्दर्शकावर काळाचा ताबा असतो. समजा, एका प्रसंगी नटाला रंगमंचाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे जायचे असेल तर त्याला प्रत्यक्ष पाऊल उचलत तेथे जावे लागेल. सिनेमात तो क्षणार्धात हे अंतर पार करू शकतो. चित्रपटात भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, एवढेच नव्हे तर पात्राच्या मनातील काळ यांचीदेखील सरमिसळ दिग्दर्शक करू शकतो. नाटकात हे जवळजवळ अशक्य असते. चित्रपटात एखादा प्रसंग जलदगतीने पुन्हा पुन्हा दाखवता येऊ  शकतो. मात्र, नाटकात हेही अशक्य असते. पण Stanley Kufman च्या मते, नाटकामधील काळाचे वास्तवगतीने सरकणे ही नाटकाची एक ताकद आहे.. The strength of the theatre is that you feel and see the time passing. स्वगत हे नाटकाचे एक मोठे वैशिष्टय़ आहे. नाटकांत निरनिराळ्या कारणास्तव स्वगते वापरली जातात. चित्रपटात त्यांचे प्रयोजन फारसे उरत नाही. ठेवली तर ती ‘नाटकी’ वाटू लागतात. नाटकांत संवादांची एक खास पद्धत असते; जिचा विचार चित्रपट तयार करताना दिग्दर्शकाला करावा लागतो. संवाद सहजतेने व प्रभावीपणे अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचतील अशी काळजी नाटकात घेतली जाते. (नाटय़गृह व सिनेमा टॉकिजची रचना पाहिली तरी हे ध्यानात येते. नाटय़गृहात जास्त किमतीची तिकिटे पुढल्या रांगांसाठी असतात व मागच्या रांगांची तिकिटे स्वस्त असतात. चित्रपटगृहात एकदम याउलट स्थिती असते.) चित्रपटातील संवादांना दूपर्यंत पोहोचवण्याची वा स्पष्टीकरणाची आवश्यकता नसते. येथे संवाद हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लहानसा भाग असतो. त्यामुळे नाटकातील शब्दबहुल भाषा बदलणे व तरीही प्रसंगांचा प्रभाव कायम ठेवणे हे चित्रपट दिग्दर्शकासमोरील आव्हान असते. चित्रपटात अत्यंत कमी व मोजके संवाद असणे हे चित्रपटीय भाषेचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. सत्यजित राय यांचे असे मत आहे की, अनेकदा चित्रपटात संवादापेक्षा मूक असणे अधिक प्रभावी असते.
नाटकात घडणारे नाटय़ प्रेक्षक स्वत: पाहत असतो, तर चित्रपटाचा प्रेक्षक दिग्दर्शकाने जे दाखविले तेवढेच पाहू शकतो. ‘क्लोजअप’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. पात्रांच्या मनातील भावना क्लोजअपद्वारे सिनेदिग्दर्शक जेवढय़ा प्रभावीपणे दाखवू शकतो तेवढे नाटकात शक्य होत नाही. नाटकाच्या प्रेक्षकाला नाटक एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून पाहावे लागते. ही मर्यादा चित्रपट दिग्दर्शक कॅमेऱ्याचा कोन, Point of view वगैरे तंत्रांचा वापर करून झुगारून देऊ  शकतो.
त्यामुळे सिनेपटकथाकार-दिग्दर्शक ज्यावेळी नाटकावरून पटकथा तयार करू लागतो तेव्हा प्रथम तो त्यातील शब्दबंबाळ भाग बाजूला काढतो. शब्दांना प्रतिमांत रूपांतरित करणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान असते. ते पेलण्यासाठी दिग्दर्शकाला दोन्ही भाषांचा अभ्यास व जाण असणे गरजेचे असते. शब्दांतून व्यक्त होणाऱ्या प्रतिमा जर ओळखता येत नसतील तर त्यांचे दुसऱ्या माध्यमात रूपांतर कसे करणार? शब्द आणि प्रतिमा यांच्या परस्परविरोधी प्रभावांतून एक नवा वाद निर्माण झाला. शेक्सपीअरच्या नाटकांतील ‘काव्य’ हे चित्रपटात प्रभावीपणे व्यक्त होऊ  शकेल काय? हा तो वाद होता. या वादाचा निर्णय आजतागायत लागलेलाlr10 नाही. त्याच्या नाटकांची जी चित्रपटीकरणे झाली त्यापैकी बहुतेकांत त्याचे काव्य हा दिग्दर्शकांना मोठाच अडथळा वाटत आलेला आहे. शब्दांच्या नजाकतीवर, सौंदर्यावर आणि सामर्थ्यांवर लक्ष द्यावे तर प्रसंगाचे दृश्यरूप उणावते, आणि दृश्यरूपावर भर द्यावा तर शब्दांतील काव्य झाकोळते असा पेच दिग्दर्शकांना नेहमीच पडलेला आहे. जर्मन महाकवी गटे याने लिहिले आहे- ‘डोळे मिटून एखाद्या जातिवंत आवाजात शेक्सपीअरचे नाटक ऐकणे यासारखा दुसरा आनंद नाही.’ त्याच्या भाषेचा हा गुणधर्म चित्रपट दिग्दर्शकांना अडचणीत आणणारा आहे. मजेची गोष्ट म्हणजे श्रेष्ठ कलावंतांनीही यासंदर्भात उलटसुलट विधाने केलेली आढळतात. ओर्सन वेल्स या नाटक व सिनेमा या दोन्ही क्षेत्रातील मान्यवर कलावंताने एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘दुसरीकडे कुठेच अनुभवता येणार नाही असा अनुभव देऊन सिनेमा आपल्याला समृद्ध करतो.’ मात्र, तोच शेक्सपीअरच्या संदर्भात लिहितो, ‘त्याच्या नाटकाशी समान पातळीवर चर्चा करता येईल असा एकही चित्रपट कधी बनू शकणार नाही.’   
बर्नार्ड शॉने म्हटले आहे, ‘Cinema is an extension of the literary art of theater, with some limitations removed.’ नाटय़तंत्राच्या मर्यादेमुळे ज्या गोष्टी नाटककाराला लिहिता आल्या नाहीत, त्यांचा शोध घेणे हे सिनेदिग्दर्शकाचे आद्यकर्तव्य आहे असे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक ग्रिगोरी कोझीन्स्तेव याचे म्हणणे आहे. मात्र, या शोधाच्या सोप्या पायऱ्या सांगता येत नाहीत. प्रत्येक दिग्दर्शकाला आपला मार्ग स्वत:च शोधून काढावा लागतो व चालावा लागतो.
माध्यमांतर होत असताना मूळ कलाकृतीत बदल होणारच हे मान्य करावे लागते. बहुसंख्य प्रेक्षक ते बदल मान्य करीत नाहीत आणि त्यामुळे माध्यमांतरित कलाकृती त्यांना असमाधानकारक वाटतात. पुस्तकाचे बोट धरून ते काही काळ चाललेले असतात आणि ते सुटू लागले की सैरभैर होतात. सरतेशेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे- असे बदल करताना दिग्दर्शकाने किती स्वातंत्र्य घ्यावे? हा मात्र कधीही न सुटणारा प्रश्न आहे. मूळ कलाकृतीत बदल झाला की दुखावणारे ‘Purist’ एकीकडे व मनाप्रमाणे बदल करण्याचा आपल्याला अधिकार आहे असे मानणारे सिनेदिग्दर्शक दुसरीकडे- यांच्यातील झगडा कधीच संपणार नाही. फार तर एवढेच म्हणता येईल की, या बदलामुळे मूळ कलाकृतीच्या गाभ्याला धक्का पोहचू नये. शिवाय हा वाद साहित्य विरुद्ध चित्रपट असा असू नये. माध्यमांतर झाल्यावर मूळच्या सौंदर्यात भर पडली की घट झाली, याचा विचार व्हायला हवा. आपल्याकडील काही सिनेमाप्रेमी तर असा अभ्यास हवाच कशाला, असा प्रश्न करतात. अशा प्रकारचा अभ्यास हा चित्रपटकलेबद्दलची जनसामान्यांची जाण वाढविणारा ठरू शकतो हेही चित्रपटप्रेमींनी ध्यानात घ्यायला हवे. ‘इंग्रजीच्या प्राध्यापकांनी शेक्सपीअरच्या नाटकांवर तयार झालेले चित्रपट अवश्य पाहावेत. त्यामुळे त्यांना शेक्सपीअर अधिक समजण्यास मदत होईल,’ असेही मत शेक्सपीअरच्या एका अभ्यासकाने मांडले आहे.
अशा अभ्यासाला एक मानसशास्त्रीय बैठकदेखील आहे. एखादा दिग्दर्शक जेव्हा मूळ साहित्यकृतीत काही बदल करतो, तेव्हा तो तसे का करतो, याचा अभ्यास त्या दिग्दर्शकाची मानसिकता व जडणघडण यावर प्रकाश टाकू शकतो. नवीन पटकथाकारांच्या दृष्टीनेही असा अभ्यास मोलाचा ठरू शकतो. कथेवरून पटकथा तयार करताना कोणती पथ्ये पाळावी लागतात, हे त्यावरून समजू शकते.
या विषयाबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाकून त्याचा अभ्यास केला जावा; ज्यायोगे भावी काळात या दोन कलांवर आधारित अनेक श्रेष्ठ कलाकृती निर्माण होतील, ही अपेक्षा ठेवणे वावगे होणार नाही.
-विजय पाडळकर

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर