‘केल्याने भाषांतर’ या केवळ भाषांतराला वाहिलेल्या त्रमासिकाने अलीकडेच १५ व्या वर्षांत पर्दापण केले आहे. आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जर्मन, स्पॅनिश, जॅपनीज, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, या भाषांना विशेष महत्त्व आले आहे. ‘केल्याने भाषांतर’मुळे या परदेशी भाषांमधील साहित्य थेट मराठीमध्ये पोहोचते आहे. परिणामी हे त्रमासिक जागतिकीकरणोत्तर काळात वेगवेगळ्या भाषांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरू पाहत आहे.
कधी कधी आपण रागानं (किंवा भांडणात) समोरच्या व्यक्तीला म्हणतो, ‘मी आतापर्यंत छप्पन्न पाह्य़लेत..’ पण मी मात्र प्रेमानं (किंवा समाधानानं) म्हणणारंय- ‘होय, मी ‘अब तक छप्पन्न’ पाह्य़लेत.’ म्हणजे मी आतापर्यंत ‘केल्याने भाषांतर’ या त्रमासिकाचे छप्पन्न अंक पाह्य़लेत. १४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या त्रमासिकाचा नुकताच छप्पन्नावा अंक प्रसिद्ध झाला आहे.
गेली १४ वर्षे फक्त भाषांतराला स्थान देणारं ‘केल्याने भाषांतर’ हे मराठीतील एकमेव त्रमासिक आहे. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे त्यातून फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश, जॅपनीज, इंग्लिश, इ. भाषांतील कथा, कविता, नाटकं, कादंबरीतील अंश यांचे थेट मराठीत अनुवाद झाले आहेत, होत आहेत. त्या- त्या भाषेतून थेट मराठीत भाषांतर झाल्यामुळे त्या भाषेतील साहित्याबरोबरच त्या भाषेची वैशिष्टय़ेही मराठी वाचकांना परिचित होतात. आतापर्यंत  आपण बहुतेक साहित्य हे इंग्रजीतून भाषांतरित केलेले वाचत आलो आहोत. पण जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश इ. भाषांतून थेट मराठीत भाषांतर वाचायला मिळते ते फक्त ‘केल्याने भाषांतर’ या त्रमासिकातूनच!
प्रा. विद्यासागर आणि प्रा. सुनंदा महाजन या दाम्पत्यानं जानेवारी १९९९ मध्ये ‘केल्याने भाषांतर’ची सुरुवात केली. दोघेही जर्मन भाषेचे अध्यापक व साहित्यतज्ज्ञ. त्यामुळे अंकाचा दर्जा प्रथमपासूनच उत्तम. हाच दर्जा सध्या प्रा. डॉ. अनघा भट या संपादकांनीही कायम ठेवलेला आहे.
‘केल्याने भाषांतर’ने आतापर्यंत सुमारे ३००० पानांचा भाषांतरित ऐवज मराठी वाचकांना दिला आहे. या भाषांतरात खूपच विविधता आहे. कथा, कविता, नाटके याबरोबरच समीक्षा, आत्मचरित्रातील काही भाग, वैचारिक लेख असे लेखनही ज्या त्या भाषेतून थेट मराठीत भाषांतरित केले गेले आहे.
भारतात आणि मराठीत भाषांतर प्रक्रियेला वेग आला तो ब्रिटिशांच्या काळात. त्या काळात अनेक विषयांतील पुस्तके इंग्लिशमधून मराठीत अनुवादित झाली. आता- म्हणजे २१ व्या शतकात मात्र जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, जॅपनीज, इ. भाषांतील साहित्यही जागतिक पातळीवर पोहोचू लागले आहे. म्हणूनच ते भारतातही आले आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जर्मन, स्पॅनिश, जॅपनीज या भाषांना विशेष महत्त्व आले आहे, याचं कारण या देशांची औद्योगिक प्रगती! शिवाय जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत, अनेक विषयांत नोकऱ्या उपलब्ध झाल्यामुळे एकूणच परकीय भाषांना महत्त्व आले आहे आणि त्यामुळे परकीय भाषा शिकण्याकडे तरुणांचा कल वाढू लागला आहे. परिणामी परकीय भाषेतील साहित्याचे विद्यार्थी-अभ्यासक वाढल्यामुळे ‘केल्याने भाषांतर’ने मराठी साहित्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गेल्या १४ वर्षांत ‘केल्याने भाषांतर’ने मराठी वाचनसंस्कृती चांगलीच समृद्ध केली आहे. टॉलस्टॉय, पुश्किन, मोपासा, गटे, चेकाव, माक्र्वेझ, सिमॉन द बुहाँ, ब्योल इ. अभिजात लेखकांचे भाषांतरित साहित्य या त्रमासिकाने थेट मराठीत आणले आहे. शिवाय फ्रेंच कथा विशेषांक, जर्मन नाटक विशेषांक, चळवळींना वाहिलेलं साहित्य विशेषांक, स्पॅनिश चित्रकार गोया विशेषांक, युद्ध व युद्धोत्तर साहित्य विशेषांक असे काही विशेषांकही त्याने प्रसिद्ध केले आहेत. एवढेच नव्हे तर परकीय भाषेतील साहित्यावर आधारीत असा ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ हा अभिवाचनाचा एक आगळावेगळा रंगमंचीय प्रयोगही ‘केल्याने भाषांतर’तर्फे केला जातो.
मला वाटतं, ‘केल्याने भाषांतर’ हे मराठीतील सतत १४ वर्षे चालणारे एकमेव त्रमासिक आहेच; पण इतर भारतीय भाषांमध्ये असे त्रमासिक मासिक असेल की नाही, याबाबतीतही मला शंका आहे. ‘केल्याने भाषांतर’मुळे मराठी साहित्यही नकळत समृद्ध झाले आहे.
मराठी वाचकांचे मात्र ‘केल्याने भाषांतर’कडे म्हणावे तितके लक्ष गेलेले नाही. किंबहुना, काहीसे दुर्लक्षच झाले आहे असे वाटते. सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय गुंतागुंतीच्या काळात वाङ्मयीन पुस्तके आणि नियतकालिकांच्या वाचनामुळे वाचकाला एक वस्तुनिष्ठ दृष्टी मिळते. त्यामुळे असा वाचक सैरभैर होत नाही. सर्वसाधारण वाचकाला, विचार करणाऱ्या नागरिकाला ‘केल्याने भाषांतर’सारखी त्रमासिके दीपस्तंभासारखी असतात. परिणामी त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळते. ‘केल्याने भाषांतर’चे मराठी साहित्याला फार मोठे योगदान आहे.
‘केल्याने भाषांतर’ने आता १५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. म्हणूनच शुभेच्छांबरोबरच मराठी वाचकांनी त्याला सक्रिय पाठिंबा देऊन संपादकांचे मनोबल वाढवावे, ही अपेक्षा.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?