lr10समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरीं’ हे आत्मचरित्र ग्रंथालीतर्फे २५ डिसेंबर रोजी प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..
आ मच्या दुसरीच्या वर्गाला श्रीधर वेटू पाटील हे शिक्षक शिकवीत. ते कडक असले तरी अभ्यास मात्र हसत- खेळत घेऊन मनोरंजक करायचे. आमच्या खोलीत तिसरीचा वर्गही भरायचा. मग त्यांना आणि आम्हाला एकत्र घेऊन पाढे म्हणून घ्यायचे. ते सांगतील त्या पाढय़ानं पहिल्या मुलानं सुरुवात करायची. म्हणजे एकवीस एके असं तो म्हणाला की दुसऱ्यानं एकवीस दुणे, तिसऱ्यानं एकवीस त्रिक.. असं म्हणत जायचं. मध्ये एखाद्याला आलं नाही तर पुढच्यानं म्हणायचं. त्याचं बरोबर आलं तर  त्यानं वरच्या क्रमांकावर जायचं आणि न आलेल्यानं त्याच्या- म्हणजे खालच्या क्रमांकावर जायचं. कधी कधी वर जाणाऱ्यानं खालच्याच्या थोबाडीत मारायचं. म्हणजे मास्तरांऐवजी ज्याला पाढा येतो तोच शिक्षा करायचा. जर शिक्षा करणारा धष्टपुष्ट असेल तर काही खरं नसायचं. आणि मुलींवर अशी पाळी आली तर त्या बिचाऱ्या गोऱ्यामोऱ्या होऊन जायच्या. त्यांना शरमेनं र्अध व्हायला व्हायचं. खरं तर तशी वेळ आपल्यावर येऊ  नये म्हणून मुलांनी अभ्यास करून यावं, हा मास्तरांचा हेतू असायचा.
त्या काळातले जवळजवळ सगळेच शिक्षक अभ्यासाच्या बाबतीत कडकच असत. आपल्या मुलांनी अभ्यास करावा, मोठं व्हावं असं शिक्षकांना वाटत असल्यानं ते तसे वागत असत. पण ते जेवढे कडक होते तेवढेच प्रेमळही होते. याच मास्तरांची एक आठवण आजही माझ्या मनात आहे. माझ्या जन्माआधी बऱ्यापैकी पैसा गाठीला असलेले माझे आई-वडील गावाला आले आणि सगळंच बिनसलं. माझ्या कुटुंबात मी, माझ्या पाठीवर जन्मलेली जाखूबाय ही माझी बहीण, सदाशिव हा भाऊ, आजी, आई-बाबा असे एकूण सहा जण होतो. एवढय़ांना वर्षभर पुरेल एवढं पीक येत नव्हतंच. सततची देणी असल्यामुळे आई-बाबांचा जीव मेटाकुटीला यायचा, जगण्यालाच विटायचा. घरात पुरेसं अन्न नसल्यानं आम्ही सारीच मुलं कुपोषणाचे बळी झालो होतो. त्यामुळे जवळजवळ सहावीला जाईपर्यंत माझ्या अंगावर खरजेचे फोड टरारून यायचे. ते फोड बरे करण्यासाठी औषध वगैरे आणण्याएवढे त्या काळातले पालक जागरूक नव्हते. स्वत:च्या जगण्याचा भार कसा हलका करायचा, या विवंचनेत असलेल्या माझ्या आई-बाबांना या अशा आजारांकडे पाहायलाही वेळ नसायचा. मग मीच ते फोड हातानं, नाहीतर कधी सुईनं फोडायचो. कुल्यावरही हे फोड असायचे. शाळेत जमिनीवर बसायला लागायचं. तशा अवस्थेत वेदना सहन करत मी बसायचो. ते फोड पँटला चिटकायचे आणि पँटही खराब व्हायची. पण ती एकच असल्यानं धुताही येत नव्हती. आठवडय़ातून एकदा धुतली जायची. अशी जखमांतलं पाणी लागून, सुकून खरखरीत झालेली पँट अधिकच टोचायची. त्या वेदना सहन व्हायच्या नाहीत. मग कधी पँट धुवायची म्हणून, तर कधी नीट बसता येत नाही म्हणून मी शाळेत गैरहजर राहायला लागलो. वार्षिक परीक्षा जवळ यायला लागली तसं मास्तरांनी माझ्या गैरहजेरीचं कारण विचारलं. जेव्हा त्यांना ते कळलं तेव्हा त्यांनी मला लोणी घेऊन त्यांच्या घरी यायला सांगितलं. इथं दोन वेळचा सुका भातही मिळण्याचे हाल होते तिथं लोण्याचा प्रश्नच नव्हता. चहासाठी दूध मिळायची मारामार. अनेकदा कोराच चहा प्यायचो आम्ही. फक्त लग्नाच्या किंवा उत्सवाच्या जेवणावळीत वरणभातावर पडणारी तुपाची धार पाहिलेली असली आणि त्याची चव घेतलेली असली तरी लोणी कसं असतं आणि कसं दिसतं, हे मला माहीत नव्हतं. मी काहीच बोललो नाही आणि मास्तरांकडे गेलोही नाही. मास्तरांनी थोडे दिवस वाट पाहिली आणि एक दिवस स्वत:च औषध करून एका वाटीत माझ्यासाठी पाठवून दिलं. मलमासारखं ते औषध जखमांवर लावल्यावर खरुज कमी झाली. हातावरचे फोड सुकले. मग कसंतरी बसून मी त्यावेळचे पेपर लिहिले. हे शक्य झालं ते केवळ माझ्या या मास्तरांमुळे.

दुसरीत असताना घरची परिस्थिती फारच बिकट होत गेली. त्या वर्षीच्या अनियमित पावसामुळं भाताची पिकं चांगली आलेली नव्हती. जे पिकलं होतं त्यातला सावकाराचा वाटा बाजूला काढला होता आणि तसा निरोपही त्याला दिला होता. एक दिवस सकाळी सकाळी हा मारवाडी सावकार गावात आला. पांढरंशुभ्र धोतर, तसाच शर्ट, त्यावर राखट रंगाचा कोट, डोक्यावर नारिंगी रंगाची पगडी आणि हातात पितळेचा तांब्या. असा सावकार पुढे जुन्या हिंदी चित्रपटात नेहमी दिसायचा. हा आला तो अगदी मालकाच्या गुर्मीत. सावकार आल्याचं कळताच बाबा पुढे गेले आणि त्याला घरात घेऊन गेले. पण सावकाराचं बाबांच्या आदरातिथ्याकडे लक्ष नव्हतं. तो सरळ त्याच्यासाठी काढलेल्या भाताजवळ गेला आणि ते हातात घेऊन पाहायला लागला. त्यात पळिंज जास्त होतं. कदाचित बाबांनीच ते मुद्दामहून मिसळलेलं असावं. त्या काळात शोषले जाणारे शेतकरी भात मापानं जास्त भरावं म्हणून अनेकदा हे करायचे. पण ते पाहिल्यावर सावकार चिडला. भात न घेताच तो गेला. त्यानंतर बाबांनी त्याचा मक्ता कसा दिला मला माहीत नाही. ते कळण्याएवढा मी मोठा नव्हतो. पण या सावकारानं आम्ही कूळ म्हणून कसत असलेली त्याची जमीन कमळपाडय़ातल्या  दुसऱ्या एका शेतकऱ्याला विकली. खरं तर या साडेतीन एकर जमिनीत जे पिकत होतं त्यातलं सावकाराला दिल्यावर जे उरत होतं त्यावरच आमचं कसंबसं चाललं होतं. घरची तेवीस गुंठे जमीन चांगला पाऊस झाला तरच पिकायची. पिकली तरी जास्तीत जास्त दहाएक मण भात व्हायचं. ते अडीचएक महिने पुरायचं. पण सावकाराची साडेतीन एकर जमीनही आता गेली होती. त्यामुळे उरलेले आठएक महिने आता कसे काढायचे आणि इतर गरजा कशा भागवायच्या, याची चिंता बाबा आणि आयंला पोखरायला लागली.
कसायला जमीन नसणाऱ्या शेतकऱ्याला गावात कोणी उसनंपासनंही देत नाही. उसनं दिलं तरी तो फेडणार कशाच्या जोरावर, अशी त्या शेतकऱ्यांनाही चिंता असायची. त्यांच्याकडेही फार काही नसायचंच. आई आणि आयं दोघीही अत्यंत कष्टाळू होत्या. पण गावात दोन-तीन घरं सोडली तर कोणाकडेही मजुरीची कामं नसायची. अशा परिस्थितीत घरातील एक- एक वस्तू विकायला काढली. प्रथम बाबांनी त्यांच्या सदऱ्याची चांदीची बटणं विकली. त्यानंतर आईनं तिच्या कानातले सोन्याचे गाठे (कानातल्या जाडसर रिंगा) आणि नथ विकून घर चालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंही काही होईना तेव्हा आयंच्या पाटल्या विकल्या. पुढे तर घरातली तांब्यापितळेची भांडी मोडीत काढली. चांगले चांगले हंडे आणि कळशा बारा आणे रत्तलनं (४५३ ग्रॅम) विकल्या. त्या विकण्यासाठी नेताना त्रास व्हायचाच पण जेव्हा दुकानदार त्याचं वजन करायचा आणि त्याच वजनानं तो हंडे- कळशा चेचायचा तेव्हा तो घाव आमच्या काळजावरच पडल्यासारखे वाटायचे. हळूहळू घरातली जवळजवळ सगळी भांडी विकली गेली. जेमतेम गरजेपुरती उरली. विकण्यासाठीही काही शिल्लक राहिलं नाही तेव्हा मात्र बाबांनी पुन्हा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आयंनंच तो घ्यायला लावला. आमचे हाल तिला पाहावत नव्हते. तिनं उभारलेला सगळा संसार तिच्या डोळ्यांदेखतच मोडीत निघाला होता.
मुंबईला गेल्यावर बाबांना एखादी नोकरी मिळेल ही आशा तिला होती. बाबांना लिहिता-वाचता येत नव्हतं. सहीपुरतं ते लिहायचे आणि एक- एक अक्षर लावत वाचायचे. त्यामुळे शिक्षणावर नोकरी मिळणं शक्य नसलं तरी पूर्वीचा गिरणीत काम करण्याचा अनुभव होता. इथं राहून निभावणं कसं शक्य नाही, हे आयं बाबांना रोज समजावत असायची आणि बाबा कुरकुरत असायचे. असं अनेक दिवस चाललं होतं. मी त्यांच्या त्या कुरबुरीनं अस्वस्थ व्हायचो. दुसरीत असलो तरी घरात काहीतरी नकोसं चालू आहे हे जाणवायचं. तो ताण यायचाच. शेवटी बाबा नाखुशीनं का होईना, पण मुंबईस जाण्यासाठी तयार झाले.