सार्त् अमुक विचारसरणीचा होता का, त्याची बांधीलकी बदलत असे का, वगैरे विद्वत्तेची मला गरज  नाही. त्याला विचारसरणी या प्रकारातली गोची कळलेली होती, हे नक्की. त्याचे ‘क्राइम पॅशनेल’ हे नाटक वाचले तर lr02मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. विचारसरणी एक- त्यातले जहाल आणि मवाळ गट आणि त्यांचे आपापल्या विचारांशी ठाम असणे! त्यामुळे निर्माण होणारे खुनाखुनीचे राजकारण! अमुक खून करून येण्याची कामगिरी. आणि ती फत्ते होईपर्यंत कामगिरी सोपवणाऱ्यांचेच विचार बदललेले!
शेवटी सगळे येते मानवी संबंधांवर- स्त्री-पुरुष संबंधांवर! नेमके खरे काय घडले, हे तपासायचे आहे. खून केलेला असतो स्वत:ची पत्नी त्या पुरुषाच्या मिठीत पाहून. पण खुनी म्हणतो, ‘मी त्याचा मृत्यू ते खरे कारण सांगून असा ‘चीप’ नाही होऊ  देणार. मी विचारसरणीसाठीच त्याला मारले!’ हे ग्रेट आहे! विचारसरणी उपरी असल्याचे आकलन देणारे आहे! तर, ते माझे एक अत्यंत आवडते नाटक आहे. जगण्याच्या ओघात मलाही काही गंभीर प्रश्न पडत गेले आणि ते समजून घेण्याची निकड निर्माण होत गेली. मी नाटके लिहिली ती व्यावसायिक यशासाठी वा गाजण्यासाठी, किंवा प्रेक्षकांना करमणूक हवीय फक्त- अशा विचारांनी नाही. मी नाटके लिहिली ती जगण्यातले प्रश्न समजून घेण्याच्या माझ्या प्रक्रियेला अभिव्यक्ती देण्यासाठी. एखादे कौशल्य कमवून ते गाजवून दाखवणे, हा माझ्या नाटकांचा हेतूच नव्हता. मला एखादी विचारसरणीही ‘प्रमोट’ करायची नव्हती. माणसाच्या आयुष्यात वेडे व्हायचा क्षण का येतो, आणि वेडे न होता जगता येऊ  शकते का, असे माझे प्रश्न होते. मला हे स्पष्ट दिसत होते की, मानवी जगण्यातले सगळे प्रश्न सामावून घेणारी विचारसरणी असूच शकत नाही. शिवाय तिच्यात फूट असते! तिच्या नेमक्या अर्थाबद्दल मतभेदही असतात. त्यामुळे आहे तेच रटाळ, छळमय जगणे जरा बदल घडवून चालू ठेवणे, याहून जास्त विचारसरणी काही करू शकत नाही. त्यामुळे मी विचारसरणीची अथवा बांधीलकीची नाटके लिहिली नाहीत. ‘डावेदार’ हे नाटक माझ्याकडून का, कसे लिहिले गेले, याची ही पाश्र्वभूमी आहे.
विचारसरणीच्या अंगाने आणि बौद्धिक, तार्किक, विश्लेषणात्मक पद्धतीने माणसाच्या जगण्यावर मास्टरी सांगणारे कोण? तर साम्यवादी. म्हणून ते! मी खूप अभ्यासू, विद्वान वगैरे नाही; पण आजूबाजूचे भान जरूर बाळगतो. सुरुवातीला याचे नाव ‘दावेदार’ असे होते. कल्याणच्या ‘मिती चार’च्या ग्रुपपुढे हे वाचून दाखवल्यावर माझे मित्र रवींद्र लाखे म्हणाले, ‘दावेदार नाही, डावेदार म्हणा.’ हे मला तुरंत पटले! तर ती डावी विचारसरणी बाळगणे आणि व्यक्तिगत जगणे यांतले घोटाळे मला दाखवायचे होते. असे काही प्रत्यक्ष उदाहरण माझ्या पाहण्यात होते का? तर- नाही. विचारावर जगणारा माणूस अंतर्वरिोधातच जगतो, या माझ्या स्पष्ट आकलनातून मी हे नाटक लिहिले. नंतर मला असे काही लोक भेटले, की ‘होय, हे खरे आहे. आहेच हा अंतर्वरिोध!’ असे म्हणणारे. हे नाटक आधी दीर्घाक स्वरूपात होते. नंतर ते दोन अंकी नाटक या स्वरूपात निर्माते राजन वेलणकर यांनी ‘झालं- गेलं विसरून जाऊ ’ या नावाने व्यावसायिक रंगभूमीवरही आणले. त्याच्या २५ व्या प्रयोगाला डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि कुमार केतकर होते. त्याची ठिकठिकाणी परीक्षणेही आली. त्यातले वास्तव मान्य करूनच काय ते बोलले गेले. काही मतभेद होणे अपेक्षित होतेच.
माझे मित्र गिरीश पतके यांनी माझी तीन नाटके दिग्दर्शित केली, त्यांतले हे एक. त्यांचे उत्तम दिग्दर्शन आणि गिरीश साळवी, सीमा देशमुख, चेतन दातार, मयुरी नागवेकर आणि वीणा जामकर यांचा अत्युत्तम अभिनय यांसह या दीर्घाकाचा प्रयोग २७ फेब्रुवारी २००५ रोजी ‘आविष्कार’ संस्थेने पुण्यात सादर केला. हा प्रयोग महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या दीर्घाक स्पर्धेत झाला. सर्वोत्तम दीर्घाकाचे पहिले पारितोषिक आणि लेखनाचेही पहिले पारितोषिक त्याला मिळाले. कमलाकर नाडकर्णी आणि प्रतिमा कुलकर्णी हे परीक्षक होते. या नाटकाला लेखन आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक म्हणून झी गौरव पुरस्कारही मिळाले. पुढे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले तेव्हा गिरीश साळवी, प्रदीप वेलणकर, आभा वेलणकर आणि सीमा घोंगळे यांनी यातील भूमिका साकारल्या.
नाटकाचा गोषवारा असा आहे : भास्कर आणि त्याची बायको मेधा, तसेच हेमंत आणि त्याची बायको स्मिता हे साम्यवादी असून जुने मित्र आहेत. आता भास्करचा घटस्फोट झालेला असून त्याची मुले त्याच्या बायकोच्या बाजूने आहेत. याची कारणे म्हणजे- भास्करचे दारूचे व्यसन आणि लैंगिक बाबतीतला हावरटपणा.. बाहेरही चालणारा. भास्करची- त्याच्याच विचारांच्या विरोधात बऱ्यापैकी मालमत्ता आहे. ती आता तो स्वत:च्या मुलांना देऊ  इच्छित नाही. पूर्वी हेमंत घरी नसताना तो त्यांच्या घरी राहिलेला असतो. त्यावेळी त्याचे आणि स्मिताचे संबंध आलेले असतात. स्मिताचा धाकटा हा त्या गुप्त संबंधांतून झालेला आहे असे स्मितानेच त्याला सांगितलेले असते. हे लक्षात घेऊन भास्करला त्याची मालमत्ता त्या धाकटय़ाच्या नावाने करायची आहे. तो धाकटा त्याचाच आहे का, याची डी. एन. ए. चाचणीद्वारे त्याला खात्री करून घ्यायची आहे. त्यासाठी तो आलेला आहे. ते सगळे पुरोगामी असल्याने समजून, एकमेकांच्या संमतीने आणि खुलेपणाने हा मार्ग अवलंबता यावा असे त्याला वाटते. थोडक्यात म्हणजे ते एका पुरोगाम्याचे प्रतिगामी म्हणता येईल असे प्रपोजल आहे. यात हेमंत राहत असलेल्या भागातच राहत असलेल्या रोहिणी नामक मुलीचे- जी ‘लिव्ह इन्’मध्ये राहत असते- एक उपकथानक आहे. भास्कर बोलताना ‘ते वेगळे, हे वेगळे’ असे म्हणतो!
शेवटापेक्षा इथे नाटकाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. विचारांनी मानवी संबंधांतले प्रश्न हाताळण्यातली अटळ गोची व्यक्त करणारे हे नाटक आहे. विचारसरणीच्या अंगाने तुम्ही कितीही घासा किंवा आपटा- मानवी मने सडतच जातात, अधिकाधिक हिंसक होत जातात, गुंता वाढतच जातो.. याचे भान हे नाटक देते. रशियन क्रांतीनंतर तिथे झालेले स्त्री-पुरुष संबंधांबाबतचे विचारमंथन, दृष्टिकोणात आणि वर्तनात झालेले बदल, बदलत गेलेले कायदे यांचेही उल्लेख या नाटकात येतात. स्त्रीला घरकाम आणि मुलांचे संगोपन यांतून मोकळीक मिळाल्याशिवाय तिचा विकास ती साधूच शकत नाही, हा त्यामागचा विचार होता. या प्रश्नाला विचारांनी देशपातळीवर भिडणेही कसे अपयशी होत जाते, ते त्यातून व्यक्त होत जाते. विचारांमध्ये किती फाटे, अंतर्वरिोध असतात, याचे आलेले हे भान असते. या पात्रांचे पुरोगामी असणे- आणि तरीही एक चोरटा, लपवलेला शरीरसंबंध असणे, वारस शोधणे, आदर्श परिस्थिती मनात ठेवून काही विचार असणे, पण तशी परिस्थिती इथे मुळीच उपलब्ध नसणे- यांतले घोळ हे नाटक दाखवते.
आता या नाटकातले काही संवाद पाहा..
भास्कर – खरं तर उदारमतवादानं आणि पुरोगामी विचारानंच सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजेत!
हेमंत – तसं तर क्रांती झाल्यावरही होत नाही!
भास्कर – आपण डावे असल्यामुळं या विषयावर बोलायची तरी हिंमत आहे आपल्यात! पण एक लक्षात येतंय- वैचारिक पद्धतीनं फाटे खूप फुटतात आणि सगळ्यांची एक समजूत असं छान, स्मूथ काही होऊ  शकत नाही.
हेमंत – अ‍ॅब्सर्डिटी रे!
भास्कर – थोडक्यात म्हणजे सत्य शोधायची गरज नाही!
हेमंत – करेक्ट!
.. मराठी नाटकात प्रेक्षकांना एक लिंक लागतेच. ही पात्रे, यांचे असे झाले, मग असे झाले.. अशी! बहुसंख्य प्रायोगिक म्हटली जाणारी नाटकेही हे बंधन स्वीकारताना दिसतात. मीही खऱ्या-खोटय़ा पद्धतीने बऱ्याचदा हे स्वीकारतो. कधी ते स्वीकारल्याचा आभासही तयार करतो. पण तपशिलांचीच चर्चा करणारे जास्त भेटतात. ‘ते सगळे ठीक आहे, आता आशयाच्या गाभ्याकडे जा आणि त्याबद्दल बोला,’ असे म्हणायची वेळ येते. इतक्या क्रांत्या झाल्या, इतके विचारमंथन झाले, पण कुठेच कुणालाही स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, त्यांत काही आदर्श असू शकतात का, यांबद्दल निर्विवाद निराकरण असे काही सापडू शकलेले नाही. याबाबत काही नाटक आले आहे, तर पाहू या, असे फार कमी घडते. विषय म्हटला तर सनसनाटी आहे.. नाटक प्रेक्षकांना पकडून ठेवते, हे पाहूनच राजन वेलणकरांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणले.. ‘झालं गेलं विसरून जाऊ ’ या नावाने. मी ‘डी. एन. ए.’ हे नाव सुचवले होते. अपयश आल्यावर पश्चातबुद्धी अशी की, ‘झालं गेलं’च ना..? मग आता काय पाहायचे?’ असे प्रेक्षकांना वाटले असेल! तसे असेलही; पण मुख्य म्हणजे मला असे वाटते की, नाटकाची आशयवैशिष्टय़े ओळखून त्यांना ‘प्रमोट’ करणारे समीक्षकच उपलब्ध नाहीत. मूल्य एकच- सामाजिक बांधीलकी! ती किती प्रकारे, कशी कशी असू शकते, याचेही भान नाही. नाटक हे वैचारिक क्षेत्रातच असते आणि त्यात एक नाटय़ात्म विधान शोधायचे असते, हीच धारणा! त्यामुळे बरीच नाटके निष्कारण मातीत जाण्याचा धोका निर्माण होतो.
यानिमित्ताने माझे एक नम्र म्हणणे सांगतो. मराठी रंगभूमी १७० वर्षांची आहे. या काळात सलग इतक्या एकांकिका आणि नाटके- जगण्यातल्या मूलभूत प्रश्नांवर (तत्त्वज्ञानात्मक प्रश्नांवर!) प्रथमच लिहिली गेली आहेत, असे माझ्या नाटय़लेखनाकडे पाहिले गेलेले नाही. विचारांनी मानवी प्रश्नांचे निराकरण न होणे, किंवा अनेक मूल्ये मानल्याने मूल्यसंघर्ष होणे, उदाहरणार्थ- ‘नीती विरुद्ध न्याय’ असे प्रश्न नाटय़माध्यमातून हाताळले जाणे, याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही, ही माझी खंत आहे.. पण फिकीर नाही.
चं. प्र. देशपांडे – champrade@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !