शोले’मधली जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी मला फार आगळी वाटते. खूप कमी वेळा इतकं अव्यक्त असं इतक्या ताकदीनं पडद्यावर पाहिलं आहे. त्या दोघांमधला तो प्रसंग.. तो पाय पसरून बसलेला. बाज्यावर एक धून वाजवतो आहे. ती धून अजूनही कानात ऐकू येते. ती एक-एक दिवा मालवत असलेली. जणू त्या धूनीचंच व्यक्तिरूप.. ती धून जणू तिच्या मनातलंच काही बोलते आहे. तिच्या मनातलं.. तिलाही ऐकू यायला न धजावणारं.. पण तरीही उमलू पाहणारं.. कोमल.. सूक्ष्म.. हलकं.. तरीही त्याला कळणारं. या प्रसंगात सिने-नेपथ्याचा फार उत्तम वापर केला गेला आहे. ती पहिल्या मजल्यावर म्हणजे काहीशी उंचावर.. त्याच्यापेक्षा. तो तळमजल्यावर. ती एका श्रीमंत घरातली सून. विधवा. तो एक अट्टल गुन्हेगार. हे अंतर ‘ती’ वर आणि ‘तो’ खाली या रचनेमध्ये अभिप्रेत असेल का? पण मनांचं जुळणं ही किती अनोखी गोष्ट असते! ही दोन मनं एकमेकांकडे ओढ घेतात. त्यांच्यात वर वर पाहता काहीच साम्य नाही.तरीही आतली कुठली तरी तार त्या दोघांना जोडते आहे. त्याची धून ऐकत ऐकत ती एकेक दिवा मालवत जाते.. तिचं ते दिवा मालवत जाणं आणि त्याचं त्याचवेळी बाज्यावर ती धून वाजवत राहणं, यात एक रुमानी कसक आहे. एक अव्यक्त ओढ आहे. पण ती ओढ काबूत ठेवण्याचा निर्णय! तिच्या दिवा मालवण्यात तो निर्णय आहे.. आतलं काहीही बाहेर न येऊ देण्याचा.. एकेका दिव्याबरोबर जणू तिचे डोळेही मालवत जातात. ती शेवटच्या दिव्यापाशी येते.. तिची आणि त्याची नजर काही क्षण एकमेकांत अडकते. ती वेळ घेऊन अखेर शेवटचा दिवाही मालवते. तिच्या खोलीत येते. खोलीचं दार घट्ट लावून घेते. तारुण्याच्या उंबरठय़ावर सगळं काही गमावून बसलेली ती! तिच्या बंद ओठाआड काय काय उदमसत असेल..

‘शोले’नं अनेक कारणांनी इतिहास घडवला. मला त्यातलं हे नातं सर्वात जास्त भिडलं. त्यासाठी ‘शोले’चे दिग्दर्शक, छायालेखक, कलाकार आणि अर्थातच पटकथाकारांना माझा साष्टांग दंडवत! शेवटी जयनं उडवलेल्या नाण्याच्या दोन्ही बाजू ‘एकच’ निघतात तेव्हा वीरू ‘तू मला फसवलंस!’ म्हणून असहाय रडतो. तेव्हा वाटतं, जयनं एका अर्थी ठकुरानीची- जया भादुरीचीही सुटका केलीय. तिचा मालवलेला दिवा, तिचा असहाय संयम त्याला सखोल आकळला होता. तो गेल्यावर तिला भडभडून रडू येतं तेव्हा तिचा सासरा तिला प्रेमानं जवळ घेतो. पण जर जय वाचला असता तर ती आणि तो एकत्र येऊ शकले असते? ठकुरानी झालेल्या जया भादुरीचे समुद्री डोळे आठवून आजही गलबलून येतं. तिचा नवरा गेला, ती अकाली विधवा झाली तेव्हा एकदा अधुरी राहिलेली तिची प्रेमकहाणी पुन्हा एकदा अधुरीच राहिली..