लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ठरावीक वयात या स्वर्गातल्या गाठी बांधल्या जातात. मग गुलाबी आयुष्याची सुरुवात व्हावी असं मानलं जातं. पण असं प्रत्येकच वैवाहिक आयुष्य गुलाबी राहत नाही. मधुचंद्राचा काळ ओसरला की त्याचे इतर रंग, इतर चवी सामोऱ्या येऊ लागतात. अर्थात हे वास्तव आहे. कोणाचेच वैवाहिक आयुष्य एकरंगी, एकाच चवीचं झालं तर त्यातील रंगत, स्वादच संपून जाईल. पण सामोऱ्या येणाऱ्या सर्व विविध रंग-चवींना सामोरे जाण्यासाठी एकमेकांचे हात हातात असतील तर आयुष्याच्या या नव्या वाटेवरचा प्रवास सुखकर होऊ शकतो. आपण हेही पाहिलंय की, जोडीदारांचे हात हातात नसले की काय होतं.. एकतर विवाह तुटतात किंवा बहुसंख्य विवाह समाजाच्या भीतीपोटी कुढत, पिचत सुरूराहतात, पण त्यांचा खरा रंग पूर्णपणे उडालेला असतो. चित्र भकास झालेलं असतं.
आज आपली कुटुंबपद्धतीसुद्धा बदलली आहे. एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडचा प्रवास पूर्ण स्थिरावला आहे, रूढ झाला आहे. मानसशास्त्रीय भाषेत बोलायचं तर समान मूळ कुटुंबाकडून (ल्ली १३ ऋं्रे’८) एका छताखाली राहणारे कुटुंब (ल्ली १ऋ ऋं्रे’८) असा झाला आहे. पण या कुटुंबपद्धतीला अनुसरून विवाहसंस्थेबाबत आपण काहीच समायोजन केलेलं नाही. परंपरागत पद्धतीप्रमाणेच या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. फरक पडला असेल तर तो एवढाच की, प्रेमविवाहाचा स्वीकार बऱ्यापकी लवकर होऊ लागला आहे. काही प्रमाणात आंतरजातीय विवाहाचा स्वीकारसुद्धा होऊ लागला आहे. त्याचबरोबर लग्न ‘जोरदार’ होऊ लागली आहेत, ‘दिमाखदार’ होऊ लागली आहेत. ‘हम आपके हैं कौन’सारख्या सिनेमांचा, मीडियाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे कपडे, सजावट, जेवणावळी, जगातील सर्व प्रकारचे ‘फूड’ उपलब्ध करणारे स्टॉल्स याबाबतीत भपकेबाजपणा जेवढा करता येईल, तेवढा प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे एवढय़ा दिमाखात, रंगांच्या उधळणीनंतर जर बेरंग समोर आले तर ते वास्तव पचनीच पडत नाही व लगेच ‘पूर्ण’ विभक्त होण्याकडे कल वाढताना दिसतो आहे.
म्हणजेच विवाह करताना पुढील आयुष्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, त्यांचा विवेकपूर्ण विचार फार कमी प्रमाणात केला जातो. पत्रिका, गोत्र वगरे जुळली की झालं! सगळे ग्रह कायम जुळलेलेच राहणार, मग काय बहारच बहार! पण मग एखादा ग्रह वक्री झाला तर संपलं, एकतर कुढायचं वा तोडायचं! लग्नात काय अभिप्रेत आहे तर एकमेकांविषयीचं प्रेम, एकमेकांविषयी विश्वास, एकमेकांविषयी आदर, एकमेकांचा गुणदोषांसहित ‘स्वीकार’, एकमेकांचे अवकाश जपत, दोघांचे एक वेगळे अवकाश निर्माण करणं.. आणि ही मूल्ये, विचार आयुष्यभर जपावी लागतात. लग्नात अभिप्रेत आहे ते व्यावहारिकच नव्हे तर सामाजिक, भावनिक, बौद्धिक व शारीरिक पातळींवर समायोजन! पण प्रत्यक्षात विचार होतो तो फक्त व्यावहारिक व सामाजिक गोष्टींचाच. म्हणजे रूप, उंची, शिक्षण, इतर कला वगरे. पण भावी जीवनात एकत्र राहताना आपला स्वभाव, आवडीनिवडी, अनेक बाबींवरचे आपले विचार, आपल्या त्याविषयीच्या भावना, आपले गुण, आपल्या कमतरता, आपले आजार वगरे बाबींची चर्चा होत नाही. आजारांबाबतीत तर लपवालपवीच जास्त! सांगितले तरी अर्धसत्य सांगणार. विशेषत: मानसिक आजार, फीट्स, त्वचेचे विकार याबाबतीत हे जास्त होतं. एकदाचे आपल्या मुलामुलींचे लग्न व्हावे व आपण सुटावे, असा विचार करताना दुसऱ्याच्या आयुष्याचे आपण नुकसान करत आहोत, फसवत आहोत, या नात्याचा पायाच अविश्वासावर उभा करत आहोत, ही बाब लक्षातच घेतली जात नाही. खरं सांगितलं तर नकारच जास्त येणार, हे खरं असलं तरी एखादा/एखादी उशिरा का होईना पण पूर्ण समजून घेऊन जर साथ देण्यास तयार झाला/झाली तर ते दोघांसाठी व कुटुंबासाठी जास्त ेसुखदायक ठरतं. अन्यथा फसवणूक बूमरँग होतेच होते. आणि म्हणूनच आयुष्यभर एकत्र सहवास, सहजीवन फुलवायचं असेल तर हा खुलेपणा अत्यावश्यक आहे. तोलामोलाचे घराणे, अमेरिकेतला नवरा वगरेसारख्या बाह्य गोष्टींनाच फक्त महत्त्व देण्याऐवजी होणाऱ्या जोडीदाराचे शिक्षण, व्यवसाय/नोकरी कोणती, कुठे आहे या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या दोघांच्या दृष्टीने ते योग्य आहे का, आपली प्राथमिकता कशाला- व्यवसाय/नोकरी, शिक्षण की करिअर, या सर्वाचा साकल्याने विचार होणं आवश्यक आहे. दोघा भावी जोडीदारांनी याविषयीच्या आपल्या मतांविषयी आपल्या भावी जोडीदाराशी चर्चा करणं आवश्यक आहे. अगदी प्रेमविवाहांबाबतही हे लागू अहे. प्रेमिका व प्रेमवीराच्या भूमिकेतून पती-पत्नीच्या भूमिकेत जाणं ही फार वेगळी गोष्ट आहे. त्या भूमिकांचाही अशा रीतीने अभ्यास किती जण करतात? बऱ्याचदा प्रेमाची धुंदी ओसरते व जबाबदारीचे चटके बसले की त्या भूमिकांचे  मग ‘परंपरागत’ भान येतं व प्रेमसागरात आनंदाने प्रवास करणारे त्यांचे ‘जहाज’ वादळात सापडते. भावनिक, बौद्धिक गोष्टींमध्ये आपले स्वभाव, आवडीनिवडी यांची देवाणघेवाण झाली तर आपल्या ‘वेव्हलेंन्थ’ जुळतील का याची कल्पना येऊ शकते. तसंच भावी जोडीदाराकडून आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत, हे चíचले जाणे गरजेचं असतं. आज जोडीदार दोघेही शिक्षितच नव्हे बऱ्याचदा उच्चशिक्षित असतात. अशा वेळेला दोघांनी आपापल्या व्यवसायक्षेत्राबरोबर घरातसुद्धा कामाचा वाटा कमीअधिक प्रमाणात उचलणं आवश्यक ठरतं. अशा वेळेला होणाऱ्या जोडीदाराची विचारसरणी ‘परंपरागत पतिराज’ निभावण्याची असेल तर आधीच विचार करता येऊ शकतो की, आपल्याला हे चालेल की नाही?
स्वभावाची, सवयींची, व्यसनांची (ज्यात कामाचे व्यसनसुद्धा अंतभूर्त आहे.) कल्पना आधीच आली तर आपल्याला समायोजन करणं जमेल का, याचा विचार करता येऊ शकतो. आपला जोडीदार हा एक माणूस आहे व माणूस म्हणून तो आपल्याला प्रेमाने, आदराने वागवू शकतो का, याची पूर्वकल्पना आधीच येऊ शकते.
 लंगिक समायोजन ही सर्वात महत्त्वाची, पण सर्वात दुर्लक्षित राहाणारी बाब! याबाबतीत एकतर अज्ञान, लाज असं एक टोक असतं; तर विवाहपूर्व संबंध हे दुसरं टोकदेखील गाठलेलं असू शकतं. याबाबतीतसुद्धा एकमेकांच्या लंगिक बाबतीत असलेलं ज्ञान, त्याबाबतीतील ग्रह, रोमँटिसिझमच्या कल्पना याची खुलेपणाने चर्चा झाली तर सगळे (एकूणच) सूर जुळायला मदत होईल. अर्थात, यातसुद्धा कोणी चर्चा करण्याचा ‘आव’ आणून त्या वेळेला एक, नंतर एक असं वागू शकतो. आणि म्हणून जोडीदारांचं विवाहपूर्व समुपदेशन झालं तर या बाबतीत तज्ज्ञ व्यक्ती सावध करू शकते. म्हणून विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन ही काळाची गरज आहे. ‘आमच्या वेळेस असली थेरं नव्हती’, असं काही महाभाग यावर म्हणाले तरी काळाप्रमाणे जर आपण राहणीमानाला, भौतिक उपयोगाच्या वस्तूंना मनापासून स्वीकारतो; तर ही नवी व्यवस्था स्वीकारली तर कित्येकांच्या वैवाहिक जीवनाची घडी छान बसेल व प्रीतीची फुलं चतन्याने डोलत राहतील यात शंका नाही!