अचानक जाग आली. हवेत किंचित गारवा जाणवत होता. किती वाजले असतील? उजाडलं असेल? डोळे उघडायचा प्रयत्न करतेय, पण उघडत नाहीयेत. काल दिवसभरचा त्रास अजून निवळला नाहीये. अंग मोडून आलंय. उठावंसंच वाटत नाहीये. आई गं! अचानक उजवा डोळा उघडला आणि पिवळा झोत पडला डोळ्यावर. lokडोळा चुरचुरतोय. त्रास होतोय त्याचा. एवढं थकायला झालंय! तो डोळा बंदही करवत नाहीये. अचानक झाला बंद. हाऽऽ! आता डावा उघडला. पुन्हा तोच झोत. कोण करतंय हे? कुठे आहे मी? डावा डोळापण बंद झाला. कुणीतरी आहेत आजूबाजूला. कुजबुजतायत काहीतरी. काय बोलतायत काही कळत नाहीये नीटसं. मोठय़ा मुश्किलीने उघडले डोळे हळूहळू. त्या धुरकट खोलीत दहा-बाराजण उभे आहेत आजूबाजूला माझ्या. माझ्याचकडे बघतायत. त्यांचे चेहरे नीटसे दिसत नाहीयेत. डोळ्यावर ताण द्यायला गेले तर डोकं आणखीनच ठणकायला लागलंय. कोण आहेत ते? इथे कधी आले मी? मला हलताही येत नाहीये. की बांधून ठेवलंय त्यांनी मला?
..आता हळूहळू सगळं स्पष्ट दिसायला लागलंय. मी हॉस्पिटलमध्ये आहे बहुतेक. मी इथे का झोपलेय? कोणी आणलं मला इथे? काय झालंय मला? आजूबाजूला डॉक्टर्स, नर्स उभ्या आहेत. एकजण माझ्या बेडवरच बसलाय. बोलतोय काहीतरी माझ्याशीच. पण काय?
‘कसं वाटतंय?’
‘ब्ब.. ब्ब.. ब्बऽऽ रं वाटतंय. बोलताना त्रास होतोय म्हणा. आवाजही बसलाय. पण कालपेक्षा नक्कीच बरं आहे.’
‘नाव काय तुमचं? आठवतंय काही?’
‘शीतल..’
सगळे इतके का खूश झाले माझं नाव ऐकून?
‘हा फोटो कुणाचा आहे आठवतंय काही?’
त्यांनी एक फोटो दाखवला. अर्थात तो माझाच आहे. मी ओळखणार नाही?
‘मा.. झा..’
‘गुड, व्हेरी गुड! आराम करा. आपण नंतर बोलू..’ असं म्हणून ते उठले जायला.
‘संदीप कुठे आहे?’
‘संदीप?’
सगळे एवढे का गोंधळलेत?
‘संदीप.. माझ्यासोबत ते आले नव्हते इथे?’
‘तुम्ही आराम करा. तुम्हाला अशक्तपणा आलाय आत्ता..’ एक नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, ‘बाकीचं सावकाश बोलता येईल.’
‘संदीप.. संदी.. प. कु.. कुठे आ..’
..डोळे उघडले. आता बरंच बरं वाटतंय. बाहेर अंधार पडलाय. लाइट्स लागलेत आतले. गेल्यावेळी शुद्धीवर आले त्यानंतर किती वेळ गेलाय देव जाणे. पुन्हा तेच सगळे अनोळखी डॉक्टरांचे चेहरे समोर होते.. माझ्याकडे रोखून बघत.
‘कसं वाटतंय आता?’
‘आता खूप बरं आहे.. गेल्या वेळेपेक्षा.’
‘तुम्हाला आठवतंय काही? बघा बरं आठवून.’
‘अं.. खूप गोंधळ होता. रात्र होती. मी धावत होते..’
‘हां, बरोबर. आणखीन?’
‘गोळ्यांचे आवाज..’
‘बरोबर.. पुढे?’
‘नाही एवढंच. संदीप कुठेय?’
‘ते वाचले नाहीत त्या हल्ल्यात.’
‘अच्छा. त्याला हेड शॉट लागलेला.. आठवलं.’
‘मला डिस्चार्ज कधी मिळेल?’
‘सध्यातरी नाही.’
‘का?’
‘तुम्हाला पॅरालिसिस झालाय.’
ओह नो! मीपण का नाही मेले बाकीच्यांसोबत? आता हे असं किती र्वष पडून राहायचं.. काही काम न करता!
‘एवढंच?’ मी उपरोधाने म्हटलं.
‘नाही.’ डॉक्टरांनी नर्सला इशारा केला. ती बाजूच्या टेबलवर वळली. ही पुन्हा इंजेक्शन देऊन झोपवून ठेवतेय की काय मला?.. आरसा? काय झालंय माझ्या चेहऱ्याला? ती तो आरसा माझ्या समोर आणतेय. मी तर डोळे मिटूनच घेतले.
‘डोळे उघडा.’
‘मी नाही उघडणार. आधी मला काय झालंय ते सांगा.’
‘मॅडम डोळे उघडा. घाबरू नका.’
‘नाही. मला आधी सांगा- काय झालंय ते डॉक्टर.’ मला रडायलाच येत होतं.
‘घाबरू नका. असं काहीही झालेलं नाहीये. तुमचा चेहरा एकदम व्यवस्थित आहे. बघा तरी.’
मी हळूहळू डोळे उघडले. समोर आरसा होता. पण त्यात चेहरा..?
‘क्कोण आहे ही?’ मला घाम फुटला. ‘कोणाचा चेहरा आहे हा?’
‘तुमचाच.’
‘ही मी नाहीये. तुम्ही गेल्या वेळी दाखवला तो फोटो माझा होता. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी केलीत ना माझ्यावर?’
मी पुन्हा डोळे मिटून घेतले.
‘मी तुमच्यावर केस टाकेन. तुम्ही सगळे जेलमध्ये जाल. माझ्या परवानगीशिवाय माझ्यावर प्लॅस्टिक सर्जरी केलीच कशी तुम्ही?’
‘शांत व्हा मॅडम, शांत व्हा. तुमची प्लॅस्टिक सर्जरी केलेली नाहीये.’
‘खोटं बोलताय तुम्ही. हा चेहरा माझा नाहीये.’
‘तुमचा नव्हता हे खरं आहे, पण आता तुमचाच आहे.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे तुमचा मेंदू तुमचा स्वत:चा आहे; पण हे शरीर तुमचं नाहीये. ज्या रात्री तुमच्यावर गोळीबार झाला, त्या रात्री तुमच्या हृदयात गोळी लागली. पण तुमचा मेंदू जिवंत होता. तुमच्या मेंदूतली माहिती देशासाठी आवश्यक होती म्हणून आम्ही तुमचा मेंदू काढून लॅबमध्ये जिवंत ठेवला आणि त्यातली माहिती काढून घेत होतो इतकी वर्षे.’
‘इतकी? म्हणजे किती?’
‘९२ वर्षे. ज्यावेळी तुमचं स्वत:चं शरीर मृत झालं तेव्हाच. म्हणजे तुमचं मानसिक वय आहे ३५ र्वष. तुमच्या मेंदूचं आज वय आहे ११७ र्वष. आणि तुमचा मेंदू आता ज्या शरीरात इम्प्लांट केलाय त्याचं वय आहे ३० र्वष. तुमच्या मेंदूतली देशाला हवी असलेली माहिती त्यावेळच्या संशोधकांनी दोन वर्षांत मिळवली. पण पुढची सगळी र्वष आम्ही तुमच्या मेंदूच्या मदतीने एकूणच मेंदूच्या रचनेचा अभ्यास करत होतो.’
‘मग मला आता तरी कशाला जिवंत केलंत? तुमचं काम संपलं होतं तर फेकून का नाही दिलात माझा मेंदू कचऱ्याच्या पेटीत.. तुमच्या नेहमीच्या पद्धतीने?’
‘आम्हाला बघायचं होतं, की इतक्या वर्षांनंतरही मेंदू दुसऱ्या शरीरात ट्रान्सप्लांट करून यशस्वी होतो की नाही! दुर्दैवाने ट्रान्सप्लांट करताना या शरीराच्या नर्वज् सिस्टममध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणून तुम्हाला पॅरालिसिस झालाय.’
‘माझं खेळणं का बनवलंय तुम्ही?’
‘आम्ही नाही बनवलंय. तुम्ही स्वत:हून या प्रयोगाचा एक भाग बनला आहात.’
‘मला चांगलंच आठवतंय- मी अशा कुठल्याही प्रयोगाचा भाग झाले नव्हते. तुम्ही खोटं बोलू नका माझ्याशी.’
‘गुप्तचर खात्यात हजर होताना ‘या देशाची एकता, सार्वभौमता आणि सुरक्षितता अखंडित राहावी यासाठी मी कुठलीही गोष्ट करण्यासाठी सदैव तयार असेन.. प्रसंगी प्राणही देईन..’ असा करार केलाय तुम्ही.’
‘आणि त्याप्रमाणे मी प्राण दिलाऽऽऽय एकदा!’
‘तुमचं शरीर म्हणजे तुम्ही नव्हे!’
‘तुम्ही डॉक्टर आहात की संत?’
‘मी जे वास्तव आहे ते सांगतोय. तुम्ही पूर्ण विचारांती निर्णय घेऊन त्या कागदावर सही केलेली. आणि विचार मेंदूनेच केलेला.’
‘मग माझा मेंदू कुठनं काढलाय?’
‘मन, संवेदना, चेतना या मानवी समजुतीच्या आवाक्यापलीकडच्या गोष्टी आहेत मॅडम.’
‘बरं ठीक आहे. माझं शरीर मेलं, मेंदू जिवंत राहिला, तो तुम्ही साठवून ठेवला, तुम्हाला हवं ते सगळं काढून घेतलं, ठीक आहे. माझी हरकत नाहीये. माझ्या देशासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण मग मला पुन्हा जिवंत का केलंत? तुम्हाला कळतंय का माझी काय अवस्था झालीय ती?’
‘आम्हाला पूर्ण कल्पना आहे मॅडम.’
‘नाहीये कल्पना तुम्हाला डॉक्टर! मी कसं जगू तुम्ही सांगा? रोज स्वत:चं शरीर बघताना, रोज आरशात बघताना, कुणाशीतरी बोलत असताना मी सतत दुसऱ्या कुणालातरी बघत, ऐकत असेन. तुम्हाला कळतंय का? आताही मी तुमच्याशी बोलतेय, पण ते मी बोलतेय असं वाटत नाहीये. कारण हे शब्द माझे आहेत, पण हा आवाज माझा नाहीये डॉक्टर.’
‘तुम्ही शांत व्हा..’
‘मी जिवंत झाले ना? तुमचा प्रयोग यशस्वी झाला ना? चला, तुम्ही जिंकलात. पण आता दुसरं कुणीतरी म्हणून मला जगायचं नाहीये. मला तुम्ही मारून टाका.’
‘आय अ‍ॅम सॉरी मॅडम.’
‘प्लीज- माझ्यासाठी तेवढं तरी करा. मी हिंडू-फिरू शकले असते तर स्वत:च जीव दिला असता. पण पॅरालिसिसमुळे मी या बेडवरून हलूही शकत नाही. मला एवढी मदत कराल का?’
 ‘सॉरी, मी समजू शकतो तुमच्या भावना. पण तुमच्यासाठी मी तेवढंही करू शकत नाही. इच्छामरणाला अजूनही परवानगी नाहीये या देशात.’

प्रसन्न करंदीकर