प्रसंग एक..
जाणते महाराज : (समोरच्या मोकळ्या मैदानाकडे पाहत.. खोल आवाजात) अरे, कोणीतरी आहे का तिकडे?
प्रधानजी : तूर्तास आम्ही आहोत इकडे, महाराज! (त्रिवार मुजरा करीत) महाराजांचा विजय असो!
जाणते महाराज : हे काय प्रधानजी? तुम्ही एकटेच? बाकीचे गेले की काय.. आपलं ते.. गेले कुठे?
lok03प्रधानजी : आहेत ना महाराज. पण बाहेर यायला लाजताहेत.  
जाणते महाराज : (संतापाने) लाजा नाही वाटत लाजायला? बेशरम! बेशिस्त! बेमुर्वत! बे.. बे..
प्रधानजी : बेइज्जत..?
जाणते महाराज : बेइज्जत कॅय बेइज्जत?
प्रधानजी : नाही म्हंजे हाफ पँटीची सवय नाही ना! इज्जत गेल्यासारखं वाटतंय!
जाणते महाराज : तसं कशाला वाटायला पाहिजे? उलट, छान वाटतं.. एअरकंडिशण्ड! आणि सवयीचं म्हणाल, तर ती काय होते! आधी तुम्हाला कुठं चरायची सवय होती? पण लागली ना! पोट बघा किती सुटलंय ते! ते काही नाही. सगळ्यांनी हाफ पँट घालून रोज व्यायाम करायचा म्हणजे करायचा! बोलवा सगळ्यांना.
प्रधानजी : पण महाराज, आता या वयात हाफ पँट घालून धावायचं म्हंजे कसंसंच वाटतंय.
जाणते महाराज : धावायचं? कोण म्हणालं धावायचं? धावण्यासाठी स्वबळ पाहिजे. ते राहिलंय का आता आपल्यात?
प्रधानजी : मग महाराज, कोणता व्यायाम करायचा?
जाणते महाराज : सोपा! बेडूकउडय़ा मारायचा!!
०००
प्रसंग दोन..
जाणते महाराज : प्रधानजी! ओ प्रधानजी! अहो, झोपले की खपले?
प्रधानजी : (खडबडून जागे होत) जी..जी महाराज..
जाणते महाराज : काही लाजलज्जा? सेशन वाटले का तुम्हाला हे? खुशाल भर बैठकीत झोपताय?
प्रधानजी : झोपलो नव्हतो महाराज, चिंतन करीत होतो.
जाणते महाराज : एवढं ढाराढूर?   
प्रधानजी : जी महाराज, गाढ चिंतन करीत होतो!
जाणते महाराज : मग झालं का करून?
प्रधानजी : हो महाराज. आपल्या पराभवाची कारणं सापडली महाराज!
जाणते महाराज : भले शाब्बास! दोन दिवस सतत आम्हाला याचीच चिंता लागून राहिली होती, की चिंतन होतं की नाही? पण तुम्ही लाज राखलीत या बैठकीची.. या रिसॉर्टची!
प्रधानजी : थ्यांक्यू महाराज!
जाणते महाराज : आमच्या अवघ्या देहाचे कान झालेत प्रधानजी! सांगा सांगा, तुमचे निष्कर्ष सांगा.. कशामुळे झाला आपला पराभव? भ्रष्टाचार नडला की आरक्षण? सिंचनानं बुडवलं की मोदीलाटेने उडवलं?
प्रधानजी : नाही महाराज. खरं कारण वेगळंच आहे..
जाणते महाराज : काय म्हणता? सुटलो! आम्हाला वाटलं की, लोकांना आपला भ्रष्टाचारच आवडला नाही की काय!
प्रधानजी : तसं काही झालेलं नाहीये महाराज. आपल्या पराभवाचं एकच कारण आहे..
जाणते महाराज : काय बरं ते?
प्रधानजी : त्याचं काय झालं- लोकांना वाटलं, सरकार चालवण्याचा मक्ता फक्त आपण एकटय़ाने घेतलेला नाही! घोळ तिथं झाला!!
०००
प्रसंग ३..
जाणते महाराज : (किंचित हळवे होत..) प्रधानजी, हा समोर लाखो एकर भूखंडावर पसरलेला अथांग समुद्र पाहताय?
प्रधानजी : जी महाराज.
जाणते महाराज : काय वाटते तो पाहून?
प्रधानजी : (उत्सुकतेने) बुजवून प्लॉट पाडायचे का महाराज?
जाणते महाराज : नाही प्रधानजी. त्याच्यासंबंधाने कोणताही निकाल सध्या घेऊ  नका. मध्यावधी झाल्यावर त्याचं काय ते पाहू. पण आम्हाला हा समुद्र आणि त्यात बुडत असलेले ते सूर्यबिंब पाहून वाटते..
प्रधानजी : बुडत असलेले? सॉरीची माफी असावी महाराज, पण काल याच वेळेला तुम्ही उगवत असलेले सूर्यबिंब असे म्हणाला होता..
जाणते महाराज : असे म्हणालो होतो? असेल. तसेही असेल.. पाहिलेत ना प्रधानजी- हल्ली असे सारखे सारखे विस्मरण होते. काल काय बोललो ते आज मुळीच लक्षात राहत नाही.
प्रधानजी : खुखुखु खीखीखी!
जाणते महाराज : हसताय काय प्रधानजी डिपॉझिट वाचल्यासारखं?
प्रधानजी : सॉरीची माफी असावी महाराज.. पण आम्हाला ना राज्यातल्या राजकीय विश्लेषकांचं आणि ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकारांचं हसू आलं.
जाणते महाराज : प्रधानजी, ज्येष्ठ पत्रकारांना हसू नये. ते किती कष्ट करतात! त्यांच्या त्यांच्या पेपरातनं आपल्याप्रमाणेच व्यायामसुद्धा करतात..
प्रधानजी : खीखीखी! आम्हाला वेगळ्याच कारणासाठी हसू आलं. हल्ली तुम्हाला सारखं विस्मरण होतं..
जाणते महाराज : हो ना!
प्रधानजी : काल बोललेलं आज आठवत नाही..
जाणते महाराज : हो ना!
प्रधानजी : त्यामुळे रोज वेगवेगळी स्टेटमेंटं देता..
जाणते महाराज : हो ना!
प्रधानजी : आणि त्यांना वाटतं, याच्यात तुमची काहीतरी राजकीय खेळी आहे! खीखीखी!!      lr12