आधुनिक कथेचा रूपबंध जरी पाश्चात्त्य असला तरी आपल्या भारतीय माणसाला गोष्ट नवी नाही. गोष्टीचा रूपबंध ही खास भारतीय ओळखीची गोष्ट आहे. पक्षी, प्राणी यांच्या गोष्टींपासून माणूस, राक्षस, परी यांच्या अनेक गोष्टी आपल्या परंपरेत टिकून आहेत. त्या टिकून राहण्याचे कारण त्या गोष्टींच्या सादरीकरणाची वृत्ती. गोष्टींमध्ये घडणाऱ्या घटनांमागे कार्यकारणभाव असतोच असे नाही. गोष्ट सांगणाऱ्याच्या वृत्तीनुसार तिचे रूप बदलत जाते. त्यामुळे आपोआपच गोष्टी कथेत रूपांतरित झाल्या. यातूनच लोककथेचे दालन पुढे जन्माला आले आणि ते विकसित झाले. या आपल्या गोष्टीशी आणि लोककथेच्या निवेदनशैलीशी नाते सांगत आजची आधुनिक कथा मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिली आहे. लघुकथेचा आधुनिक रूपबंध सांभाळताना त्यांनी गोष्टीशीही नाते कायम ठेवले आहे. ते कशा स्वरूपाचे आहे, याचा प्रत्यय त्यांच्या ‘गोष्टीवेल्हाळ’ या कथासंग्रहातून येतो. हा चौदा कथांचा संग्रह आहे.
धर्मापुरीकरांच्या या सर्व कथा साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या आणि नागर जीवनाचे चित्रण करणाऱ्या आहेत. अर्थात हा मध्यमवर्ग म्हणजे मूळचा गावाकडचा आणि नोकरीच्या निमित्ताने छोटय़ा-मोठय़ा शहरांत येऊन स्थिर झालेला आहे. त्यामुळे या मध्यमवर्गीय जाणिवांमध्ये महानगरीय यंत्रवतता नाही; तर एक प्रकारचा सांस्कृतिक तुटलेपणा जितका आहे, तितकाच त्यांचा जगण्याचा मूल्यसंघर्षही आहे. ‘वरवंटा’ या पहिल्याच कथेत सासू-सुना शहरात रमल्या नाहीत. त्या दिनूला गावी जाण्याचा आग्रह करतात. त्याप्रसंगी सामानाची बांधाबांध करताना राहून गेलेला वरवंटाही दिनूची आई गुपचूप पिशवीत घालते. ‘परीक्षा’मधील शिक्षिका मुलांच्या हजेरीसाठी व सर्वानी परीक्षेला बसावे, आपली बदली टळावी म्हणून मुस्लीम विद्यार्थ्यांने भंगारातील गोळा केलेल्या थम्सअप वगैरेंच्या बाटल्यांच्या टोपणांचे ओझे सांभाळताना दिसते. यामधून टिकून राहण्याचा संघर्ष जसा दिसतो, तसा (सांस्कृतिक) मूल्यभावही अधोरेखित होतो. शिक्षिकेने आपल्या नोकरीसाठी मुलाला शोधून आणण्यातून, किंवा गावाकडे जाण्याच्या ओढीने सामानाची बांधाबांध करण्याची उत्स्फूर्त धावपळ असो- यातून एक प्रकारची मानवतेची छटा दिसते. अशीच छटा ‘बंदा’ या कथेतून दिसते. बलजीत सिंग नावाची एक व्यक्ती गल्लीतल्याच माणसाचा बंदुकीने जीव घ्यायचा प्रयत्न करून जामीनासाठी वकिलाकडे येते. जामीन मिळेपर्यंत वकिलाच्या घरात जीव मुठीत घेऊन राहिलेला बलजीत जामीन लांबणीवर पडू लागतो तेव्हा अस्वस्थ होतो आणि ‘‘साबजी! ये आखरी बार! इस के बाद वो महेंदरने मेरी मुंडी भी छाट दी तो भी मैं कुछ नही करुंगा! कुछ भी नहीं! साला गुन्हा करना आफत है।’’ असं म्हणून बाहेर पडतो. त्याला झालेली ही मानवतेची जाणीव महत्त्वाची आहे.
धर्मापुरीकरांच्या कथा तशा एकेका घटनेभोवती किंवा मानवी स्वभावाभोवती फिरताना दिसतात. लघुकथेच्या रूपबंधाचे पक्के भान असलेले धर्मापुरीकर गोष्टीशी नाते सांगताना घटनेची किंवा कथेची छान गोष्ट करून सांगतात. ती सांगताना त्या घटनेच्या किंवा स्वभावपैलूच्या अनुषंगाने येणारे सभोवतालचे तपशील नेमकेपणाने टिपत जातात. त्यामुळे मूळ पारंपरिक गोष्टीतली कल्पनारम्यता इथे सभोवतालच्या तपशिलाने भरून निघते आणि मग कथा गोळीबंद होत जाते. कथेचे आशय खूप साधे आहेत. त्यामुळे त्यांच्या कथा टोकदार परिणाम साधत नाहीत. पण तरीही साध्या तपशिलातून समाजजीवनावर, मानवी मनावर, संस्कृतीवर कसे परिणाम होत जातात याचे दर्शन ही कथा घडवते. ‘दृष्टांत’ कथेतील प्रा. कस्तुरे जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यानिमित्तानेही ते स्वत:च आपली शुभेच्छापत्रे छापतात. शब्दांवर आणि दृष्टांतांवर हुकूमत असणारे प्रा. कस्तुरे आपल्या मुलाच्या लग्नातही जेव्हा अधिकच बडबड करू लागतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते थोडे अंतर राखूनच राहतात. मनातली ही सुचणारी दृष्टांत सृष्टी निवृत्त झाल्यामुळे आता कोणाला सांगता येत नाही, याची अस्वस्थता त्यांना सतत टोचत राहते. तरीही ते गप्प बसणे पसंत करतात आणि याचा परिणाम म्हणून ते आपल्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देण्याचेही विसरून जातात. ‘शब्दांचे डोळे आहेत मला’ म्हणून ते गप्प बसतात. अशीच प्रा. भालचंद्र सरदेशपांडे यांची घालमेल ‘व्यथा’ या कथेत धर्मापुरीकर मांडतात. एका भाषणाच्या निमित्ताने त्यांनी कथेबद्दल कोणी आडदांड विधाने करू नयेत, असं म्हटलेलं असताना पेपरमध्ये त्याला जोडून छापले जाते- ‘आडदांड विधाने केली तर मर्द मराठा ताबडतोब उत्तर देईल.’ याचा परिणाम त्यांच्या दिनक्रमावर होतो. ‘ ‘मर्द मराठा’ ही काय भानगड? तुम्ही असे म्हणालाच कसे?’ असे आक्षेप घेणारे, धमकी देणारे, आंदोलनाची भाषा करणारे फोन येऊ लागतात आणि सरदेशपांडे आतून घाबरून जातात.
धर्मापुरीकरांच्या कथेच्या विषयामध्येही व्यामिश्रता आहे. या कथांमधले जग जरी मध्यमवर्गीय असले तरी मध्यमवर्गीयांचे आणि चाकरमान्यांचे वेगवेगळे स्तर या कथांमध्ये आलेले आहेत. प्राध्यापक, वकील, आरोपी, लेडीज कंडक्टर, ऑडिटर, व्हीआरएस घेणारे प्रौढ, पोलीस अधिकारी, तुरुंग अधिकारी, डॉक्टर, सावकार, सरपंच, पाणी वाटप करणारे, टँकरवाले, शीख-मुसलमान-हिंदू स्त्री-पुरुष, शिक्षिक, शासकीय विभागात काम करणारे कर्मचारी, कलावंत, कीर्तनकार, पशुवैद्यकीय अधिकारी, तहसील कर्मचारी अशी भिन्न स्तरातली माणसे या कथांमध्ये आली आहेत. या माणसांच्या अधिकारांनुसार, धारणांनुसार त्यांच्या त्यांच्या जीवनात येणारे चढ-उतार धर्मापुरीकर नोंदवताना त्या-त्या अनुषंगाने येणारे प्रदेशाचे, स्थळाचे, काळाचे तपशील बदलत जाण्याने कथा एकसुरीही बनत नाहीत आणि कंटाळवाण्या वाटत नाहीत. औरंगाबाद, नांदेड, मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, पुणे, मुंबई अशा छोटय़ा-मोठय़ा नगर-महानगरांची पाश्र्वभूमी जशी या कथांना आहे, तशीच छोटय़ा-मोठय़ा गावांचीही आहे. त्या- त्या पाश्र्वभूमीवर ती-ती माणसे, घटना-प्रसंग उठून दिसतात. ‘झोत’मधील रंगमंचीय वातावरण तेथील टेन्शन, धावपळ आणि ‘आक्षेप’मधील एकनाथच्या बायकोच्या घरातील व त्याचे संबंध असलेल्या स्त्रीच्या घरातील वातावरण वेगवेगळे आहे. ‘परीक्षा’मधील शाळा आणि ‘बंदा’मधील वकिलाचे घर हेही लक्षात राहण्यासारखे आहे. ‘वधू’मधील एस.टी.चा प्रवास आणि त्यानिमित्ताने होणारे वधूसंशोधन आणि ‘मिती’मधील गावाकडच्या घराचे वर्णन आणि खुन्याच्या घराची वातावरणनिर्मिती वेगवेगळी आहे. या वेगळेपणामुळे धर्मापुरीकरांची कथा वाचनीय बनते.
धर्मापुरीकरांच्या या संग्रहातील कथांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या कथा बहुतेक वेळा निवेदनातून साकारतात. हे निवेदन पुन्हा पात्रागणिक बदलत जाते. उदा. ‘त्या दिवसांत अशी पायपं नव्हती बघा, पाण्यासाठी; म्हणजे आज टँकर आला रे आला गावात, की मोहोळाच्या माश्या चढल्यासारखे लोक टँकरवर चढतात.’ (गोष्टीवेल्हाळ) किंवा ‘३ ऑक्टोबरच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस सोनावणे साहेबांनी खास दूतामार्फत पाठवली. त्यासोबत एक अर्धशासकीय पत्रसुद्धा- दीडशे पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रकरण गंभीर झालं असून, सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणार आहे.’ तपशिलानुसार आणि निवेदनानुसार जशी निवेदनाची भाषा बदलते, तशी सादरीकरणाची पद्धतही बदलते. वर्तमानपत्री, प्रशासकीय, गोष्टीवेल्हाळ, संवादी, अलंकारिक असे निवेदनांचे अनेक नमुने या कथांमध्ये भेटतात.
‘डिबिकिंग’ आणि ‘तीव्रकोमल’ या दोन कथा थोडय़ा वेगळ्या धाटणीच्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने शासकीय कुकुटपालनातल्या एकशे सत्तावन्न कोंबडय़ा मरतात आणि त्याचा खराखुरा अहवाल पाठवल्यामुळे शासकीय पातळीवर जे राजकारण घडतं त्याचा तपशील ‘डिबिकिंग’मध्ये आला आहे. या कथेतून शासकीय भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे याचा प्रत्यय येतो. तर ‘तीव्रकोमल’ कथेतील कवी आपली पुरस्काराची रक्कम आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्याचे वीजबिल भरण्यासाठी देतो. पण त्यातून जे गावपातळीवरील आणि वाङ्मयीन राजकारण पुढे येते ते पाहण्यासारखे आहे. एकूणच व्यवस्था कशी सडत चालली आहे, याचा प्रत्यय देणारी ही कथा शेतकरी आणि कवीच्या सरळपणाला मात्र उजागर करताना दिसते. बाकी कथांपेक्षा या दोन कथा दीर्घत्वाकडे झुकणाऱ्या आणि एखाद्या घटनेचे पडसाद किती लांबवर जाऊ शकतात याचा वेध घेणाऱ्या आहेत. यानिमित्ताने ‘डिबिकिंग’ या कथेत आलेली प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांची प्रशासकीय भाषा उठावदार बनली आहे.
गोष्ट आणि कथेचा एकमेळ साधणारी, नावीन्याचा ध्यास असणाऱ्या या कथा महत्त्वाच्या आहेत. विषयाचे वैविध्य, निवेदनातील सहजता आणि वाचनीयता यांमुळे धर्मापुरीकरांच्या कथा परिणामकारक ठरत असल्या, तरी बहुश्रुत होताना दिसत नाहीत. कथा तपशिलांत अडकून पडत नसल्या तरी जो गंभीर आणि वाङ्मयीन परिणाम जाणवायला हवा तो जाणवत नाही. मानवी जीवनाच्या पृष्ठभागावरच या कथा तरंगताना दिसतात. खोलवर असलेल्या अंत:स्तरावर त्या पोहचू शकत नाहीत. त्यामुळे तिला कधीकधी ठोकळेबाजपणाचे रूप येते. मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या आणि अबोध जाणिवांच्या शोधापर्यंत या कथा पोहचत नाहीत. त्यामुळे त्या कधीकधी उपदेशात्मक होतात. साहजिकच मधुकर धर्मापुरीकर यांच्याकडे आशय-विषय आणि भाषिक वैविध्य असूनही या कथा प्रयोगशील होत नाहीत, ही त्यांच्या या कथासंग्रहाची मर्यादा आहे.
‘गोष्टीवेल्हाळ’ – मधुकर धर्मापुरीकर
राजहंस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १६४, मूल्य – १४० रुपये.     

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….