कवी दासू वैद्य यांचा ‘तूर्तास’नंतर तब्बल दहा वर्षांनी ‘तत्पूर्वी’ हा दुसरा कवितासंग्रह रसिक वाचकांसमोर आला आहे. या संग्रहात सत्तरएक कविता आहेत. कवितेच्या अटकर बांध्यामुळे कविता लगेच प्रकाशित lok20करण्यासाठी आजही पुस्तकाशिवाय चांगली नियतकालिके व दिवाळी अंक असल्याने त्यातून असे चांगले कवी आपल्याला वेळोवेळी भेटत असतात. त्यातील त्यांच्या काही चांगल्या कविता मनात घर करून राहतात. परंतु कवीचा संग्रह वाचनात आला म्हणजे त्या कवीची कवी म्हणून असणारी योग्यता, त्याच्या जाणिवा, संवेदना व संग्रहित काव्याचे काहीएक आशयसूत्र यांची वाचकाला माहिती होते. तसेच त्या कवीची संग्रहामागील भूमिकाही आपणास कळते. म्हणून सुटय़ा सुटय़ा कवितांमुळे होणाऱ्या परिणामापेक्षा एका संग्रहातून होणारा परिणाम हा चांगला असतो. म्हणून कथासंग्रहाची, कवितासंग्रहाची, ललितसंग्रहाची आवश्यकता वाटत असते.
दासू वैद्यांचा ‘तत्पूर्वी’ हा संग्रह वाचल्यानंतर पहिली शंका येते की, ते आणखी काही भरीव वा व्यापक स्वरूपात करीत आहेत का, की त्यामुळे हा ‘तत्पूर्वी’ ठेवलेला आहे? मुखपृष्ठावरील चित्र फार बोलके नि सूचक आहे. कोणीएक काळठोक्यावर बसून काळाला थांबविल्याच्या आविर्भावात खाली पाहत बसलेला आहे. संग्रहाच्या सुरुवातीस संत तुकारामांचा अभंग शीर्षक कविता म्हणून घेतला आहे- ‘बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी। कोणी कैसी कैसी भावनेच्या॥ विचार करिता वाया जाय काळ। लटिके ते मूळ फजितीचें।’ हा अभंग शीर्षककविता म्हणून स्वीकारण्यात काय उद्देश असावा, हे मुक्तपणे रसिकवृत्तीने शब्दवाचन करणाऱ्यांना संग्रह वाचून झाल्यानंतर कळेलच.
‘तत्पूर्वी’ हा गद्यकवितांचा संग्रह आहे. शब्द रचत जावे आणि कविता तयार व्हावी या मूडमधून हा कवी केव्हाच बाहेर आलेला आहे. गद्यरूपाने गंभीरपणे चिंतन करणाऱ्या अनेक कविता या संग्रहात भेटतात. ‘अस्तित्वात नसलेल्या नंबरसाठी’, ‘जनहितार्थ’, ‘मानववंशशास्त्र’, ‘हे अभागी दिवस’ या कवितांत समाजाविषयीचे सखोल चिंतन आहे.
इथे अस्तित्वासाठी झटणारा निवेदक भेटतो. तो अनुकूलतेच्या शोधात आहे, परंतु सर्वत्र प्रतिकूलता त्याच्या दृष्टीस पडते. त्यामुळे नकाराचे तो निवेदन करीत राहतो. सर्वत्र त्याला अभावाचेच दर्शन घडते. तो फुलून यावा, त्याच्या विचाराला बहर यावा असे त्याला- म्हणजे निवेदकाला कुठेच काही दिसत नाही. एवढेच काय, गर्भात असणाऱ्या बाळाच्या भविष्याचीही कवीमनाला चिंता त्रस्त करते. जाती-पंथाचे, रीतिरिवाजाचे, स्त्री-पुरुष, दंगली, भीती, निर्वासित, उपरे, डावे-उजवे, गरीब-श्रीमंत, असे अनेक बॅरिकेट्स निर्माण झालेले आहेत. म्हणून श्वासाची लयगती जाणून घेण्याची विनंती अर्भकाला कवीमन करते आहे! आकारही न घेतलेल्याचे स्वागत नकाराने का बरे? कदाचित ते अर्भक पुढे हे सर्व पाश भेदून-छेदूनही काढेल- तत्पूर्वीच्या आत्मग्लानीला.
या संग्रहाचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे स्त्रिया व मुलांवरच्या आशादायी सुंदर कविता. पण तरी त्यात कवीने शंका घेतलेली आहेच. ‘हा मुलामा सोडून’, ‘लाट पोरी लाट’, ‘बायका बसल्यात फतकल मारून’, ‘मुलगी आता मोठी झालीय’, ‘कुरळ्या केसांची छोटी मुलगी’, ‘बये’ या आशावादाची निरागस भावना प्रकट करणाऱ्या सुंदर, प्रसन्न कविता अत्यंत वाचनीय आहेत. मुलगी आता मोठी झालीय हे पत्नीने पतीला सांगितल्यानंतर तो विनाकारण सचिंत होतो. सचिंत होणे हा या कवीचा संवेदन स्वभाव आहे. प्राप्त परिस्थितीतल्या समाजातील अनेक वाईटसाईट, उग्र व भीतिदायक गोष्टी, टीव्हीवरील उत्तान जाहिराती यामुळे साशंक असलेला पिता लेकीकडे मोठी झाली म्हणून पाहतोय. तर लेक एक अर्धनग्न जाहिरात पाहत काही खाण्यात मश्गुल आहे. दोन पिढीतला हा विसंवाद वा जग समजून घेण्यातील अंतर नेहमीच राहिलेले आहे. स्त्रीमध्ये नेहमीच आशावाद असतो, तो ती सोडत नाही, हे कविमन तिरकसपणे, साशंकतेने सांगत आहे. ‘लाट पोरी लाट’ ही चार- चार ओळींच्या सहा कडव्यांची कविता आहे. तिच्यामध्ये तीन कडव्यांत लोकगीताची प्रसन्न व गतिमान अशी लय आहे. या लोकलयींच्या कडव्यांत कधी नव्हे ते कवीने यमकही साधला आहे.
या संग्रहात कवींविषयी अनेक कविता आहेत. ‘तूर्तास’मध्येही कवींविषयीच्या कविता आहेत. कवींच्या असतेपणाविषयीचे हे आत्मभान असावे असे वाटते. चित्रकार, फोटोग्राफर यांच्याविषयीही काही कविता आहेत. ‘चित्रकार मित्र’ ही कविता एखाद्या मॉडर्न आर्टसारखीच झाली आहे. या कवितेला कथनाचे स्वरूप आहे. या प्रयोगामुळे कवितेचे रूपही पालटलेले आहे. चित्रकार मित्राला स्किझोफ्रेनिया झालाय. तो शांत आहे. डॉक्टरांनी त्याला चित्रे काढण्यावर बंदी घातलेली नाही, पण कवीच्या पुढय़ात अनेक प्रश्नांच्या नोंदी ठेवल्या. समाज सडत चाललाय, मुलांना काय शिकवू, डिप्रेशन आल्यावर काय करावे, व्हॅन गॉगचं चरित्र वाचायचंय.. असे अनेक असंबद्ध प्रश्न चित्रकाराला पडले आहेत. त्याच्या जीवनातील  विसंगती तो चित्रातून नकळत काढतो. ‘फोटोतला कवी’, ‘दोन फोटो’, ‘कवितेची गोगलगाय’, ‘कविता’ या कलावंतावरच्या कविताही चांगल्या आहेत. या सर्व कवितांमधून परात्मभाव प्रकट झालेला आहे. त्यात अस्तित्वासाठीची धडपड आहे, पण भोवतालच्या कोरडेपणामुळे कवितेच्या, चित्राच्या, गाण्याच्या  रसरशीतपणाची स्वाभाविक प्रचीती मिळत नाही, ही खंत आहे.
‘अनिवार्य भजन’ ही कविता ईश्वराचे नामस्मरण करीत नाही किंवा भक्तिभाव दाखवीत नाही. ती अहर्निश शारीरस्मरण करणारी आहे. पन्नास ओळींची आणि ओळीत केवळ एकेक शब्द अशी ही कविता आहे. तिच्यामध्ये सर्व  प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारच्या ज्ञात उपचार यांची जंत्री आहे. तटस्थपणा आहे. कसलेच आपलेपण नाही. कोणतीच भावना नाही. पण तरीही हॉस्पिटल समोर येते आणि सुया, औषधे, शस्त्रक्रिया, वेदना, किंचाळ, ओरड, रडारड, मग दहावा, तेरावा या साऱ्या गोष्टी जाग्या होतात. असे एकेका शब्दांच्या कवितेचे प्रयोग मराठीत जुने आहेत. पण हा जो ‘अनिवार्य भजन’चा प्रयोग आहे, तो वाचताना मन थरारून जाते.
संत ‘तुकाराम’ हा कवीला आपला भावसखा वाटतो. या संग्रहात ‘तुकाराम’ या नावाची एक कविता आहे. पाच कडव्यांची साधी सरळ गद्यात्म वाक्ये त्यात आहेत. स्वत:वर क्ष- किरणांचा मारा करून तुकारामांनी स्वत:लाच स्वत:समोर ठेवले. तो तुकाराम आपला आदर्श असल्याचे कवी सांगतो. या कवितेतून कवीने जणू काही तुकारामांची गाथा, तुकाराम चरित्रच सांगितले आहे.
‘तत्पूर्वी’ – दासू वैद्य, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – ११५, मूल्य – १७५ रुपये.          
     

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..