पटवर्धनसरांच्या काळात खटाववाडीत जाणं ही एक मोठी मौजच असायची. खूप काही ऐकायला मिळायचं आणि वाचायला हवं ते पुस्तक. ‘मौजे’चा तो विख्यात जिना चढून वर गेलं की संपादकांचं ऑफिस. पुस्तकांची कपाटं एकमेकांना बिलगून उभी. एक टेबल गुरुनाथ सामंतांचं. दुसरं सरिता मानकामेंचं. पटवर्धनसरांचं टेबल खिडकीपाशी असायचं. दुपार उतरता उतरता उन्हाचा एक पातळ पिवळाधम्मक तुकडा खिडकीतनं आत सरकत सरकत संपादकांच्या टेबलाच्या आगे-मागे रेंगाळत असायचा. तेव्हा पटवर्धनसर आपल्याला Silhoutte ¸ मध्ये दिसायचे.
पटवर्धनसरांना पहिल्यांदा ‘मौजे’त भेटायला गेलो ते १९७५ साली. मार्च-एप्रिलचा महिना असावा. सर नेहमीप्रमाणे कामात होते. प्रथमदर्शनी मला ते सेल्टिक, स्लाव्ह वगैरे वाटले. गोरापान चेहरा, तरतरीत नाक, bony, sharp features आणि नजरेत धाक. माझी कवितेची वही त्यांनी ठेवून घेतली आणि ‘आठेक दिवसांनी या,’ असं म्हणाले. दुसऱ्या-तिसऱ्या खेपेला सर विस्तारानं बोलले. माझ्याबद्दल विचारलं. मी कोण, कुठला, शिक्षण कुठं झालं, बी. ए.ला कोणते विषय घेणार, घरात कोणती भाषा चालते, असं बरंच. अनेक प्रवाह, प्रभाव पचवून कविता उभी राहते, कवितेचं फार करावं लागतं, असं म्हणाले. मग पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही बाय-लिंग्वल आहात आणि तुमचं सगळं शिक्षण इंग्रजीत झालंय. लिखाणासाठी तुम्ही मराठी निवडली आहे. प्रत्येक भाषेचं स्वत:चं सौष्ठव असतं. आर्किटेक्चर असतं. ते समजून घ्या. खूप खोल पाण्यात उतरावं लागेल तुम्हाला.’’
सरांच्या टेबलावर लिखाणाचा डोंगर असायचा. हस्तलिखितं, प्रूफं, वर्तमानपत्रं, मासिकं असं बरंचसं. सर सतत कामात असायचे. कवी, लेखक, चित्रकारांची ये-जा अखंड सुरू. विलास सारंग, संभाजी कदम, सरोजिनी वैद्य या सगळ्यांना मी ‘मौजे’तच भेटलो. दुर्गाबाई भागवत कधीतरी चक्कर टाकत. ज्ञानेश्वर नाडकर्णी डोकावून जात. जया दडकर संध्याकाळचे येत आणि शांतपणे वाचत बसत. गुरुनाथ सामंत व जया दडकर ही दोन अफलातून माणसं सरांमुळे भेटली. ‘आठवणीतल्या कविता’चं काम सुरू असताना पद्माकर महाजन त्यांना भेटायला येत. सरांचा एक कान गप्पांकडे असायचा. आता चर्चेत उडी घ्यायला हवी असं त्यांचं ठरलं की मोजक्या, काटेकोर शब्दांत ते आपलं मत मांडत. ‘आम्ही असं मानतो’ किंवा ‘यासंबंधी आमचं म्हणणं असं की-’ अशी त्यांची सुरुवात असायची. त्यांचं ते ‘आम्ही’ फार भारी असायचं. एकदम वजनदार. त्या ‘आम्ही’ला एक धार असायची. कवी-लेखकाची विचारपूस करताना मात्र सरांचा आवाज मऊ, स्नेहाद्र्र असायचा.
घरी जाण्यापूर्वी पटवर्धनसर आपल्या इष्टमित्रांना चहाला घेऊन जात. खटाववाडीच्या अगदी समोरचा इराणी, ‘सेंट्रल’च्या जरा पुढे असलेलं शेट्टीचं हॉटेल किंवा गिरगावातलं (आता बंद झालेलं) ‘मॉर्डन’ ही ठरलेली ठिकाणं. अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा होत असे. अगदी अध्यात्मापासून फॅशन, पॉप कल्चपर्यंत. ‘आधी उत्तम गाणं ऐकलं पाहिजे. मग गाणं येईल,’ असं गाण्यातली मंडळी म्हणतात. पटवर्धनसरांच्या मैफलीत खूप चांगलं ऐकायला मिळालं. त्यांचा खजिना मी बराच लुटलाय.
नामवंत-नवखा, लहान-मोठा असा भेद सरांनी कधी केला नाही. प्रत्येकाची प्रत्येकाशी ओळख करून देत. ‘हे सुरेश भट आणि हे अंबरिश मिश्र. मिश्र कविता करतात. त्यांची एक कविता आम्ही गेल्या महिन्यात छापली आहे.’ तेव्हा माझं वय एकोणीस होतं आणि भटांभोवती तेजाचं वलय होतं. ‘मौजे’च्या दिवाळी अंकात निर्मला देशपांडे यांची ‘बन्सी काहे को बजायी’ वाचली. मला ती कादंबरी खूप आवडली. तसं मी सरांना सांगितलं. तर ते म्हणाले, ‘‘तुम्ही निर्मलाबाईंना पत्र टाकून तुमचा अभिप्राय कळवा किंवा त्यांना फोन करा. मीही सांगेन त्यांना.’’ लेखक-लेखक आणि मुख्य म्हणजे लेखक-वाचक यांच्यातला पूल म्हणजे संपादक- हे सूत्र सरांनी मोठय़ा निष्ठेनं पाळलं.
‘काय वाचताय?’ हा सरांचा पहिला प्रश्न असे. समोरचा माणूस काय वाचतोय अन् का, त्या पुस्तकाविषयी त्याला काय म्हणायचंय, पुस्तकाचा स्वभाव, पुस्तकाचं मूळ प्रतिपादन त्याला समजलंय का, असं बरंचसं सरांच्या प्रश्नाला लागून असे. मी ‘अॅना कॅरनिना’ वाचली आणि सरांना ते सांगितलं, तर ते टॉलस्टॉयवर आणि ‘अॅना कॅरनिना’वर माझ्याशी विस्तारानं बोलले. खासकरून लेविन या पात्राविषयी. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या ठाण्याच्या घरी गेलो होतो. माझ्या हातात चार्ल्स डार्विनचं एक छोटेखानी चरित्र होतं. ते त्यांनी आधी वरवर चाळलं. मग काही पानं वाचली. अगदी बारकाईनं. नंतर डार्विनवर मोजकंच, परंतु सुरेख बोलले.
‘‘काय वाचताय?’’ नंतरचा दुसरा प्रश्न म्हणजे ‘‘नवीन काय लिहिलंत?’’ ‘मौजे’त गेल्या गेल्या मी कवितेचा विषय काढत नसे. संध्याकाळी सर थोडे निवांत बसले की दोन-तीन कविता त्यांच्यासमोर ठेवायच्या- की मग माझ्या पोटात बागबुग बागबुग सुरू. ‘‘तुम्ही वाचून दाखवा,’’ असं ते म्हणायचे. मग स्वत: दोन-तीन वेळा शांतपणे वाचायचे. कविता जमली नसेल तर तसं सांगायचे. मोजक्या, टोकदार शब्दांत कुठं फसलीये ते विस्तारानं सांगायचे. तिथं अजिबात दयामाया नाही. माझी एक दीर्घकविता वाचून म्हणाले, ‘‘पालखीचे दोन्ही दांडे अगदी मजबूत आहेत. पालखीवर थोडं काम करावं लागेल.’’ नंतर ते राहून गेलं.
उत्तम संपादकाकडे ससाण्याची नजर असते असं म्हणतात. सरांच्या बाबतीत हे शंभर टक्के खरं होतं. कसदार, दर्जेदार लिखाणावर- मग ते कुणाचंही असो अन् कुठंही छापून आलेलं असो- त्यांची नजर असे. लॉर्ड बायरनला चिरतारुण्याची धुंदी जडली होती. पटवर्धनसरांना उत्तम, रसरशीत लिखाणाचा ध्यास जडलेला असायचा. ग्रंथप्रकाशन व्यवहार आणि कला- साहित्यातल्या घडामोडींची अद्ययावत महिती त्यांच्याकडे असायची. एखादा लेखक अचानकपणे लिहायचा थांबला की ते अस्वस्थ होत. त्या लेखकाची पुन्हा पुन्हा विचारपूस करीत. त्यानं परत लिहिलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. अनेक लेखकांच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा सहभाग आहे. शंकर पाटील, सखा कलाल, मारुती चितमपल्ली, अनिल अवचट, निर्मला देशपांडे, आशा बगे ही आघाडीची लेखक मंडळी सरांच्या तालमीत तयार झाली. संभाजी कदम, विश्वनाथ खैरे, वसंत पळशीकर यांच्याकडून त्यांनी ‘सत्यकथा- मौज’साठी उत्तम वैचारिक लिखाण मिळवलं.
माझे स्नेही आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांच्या काही कथा ‘सत्यकथे’त आल्या होत्या. नंतर प्रकाशचं लेखन थांबलं. माझ्याप्रमाणे तोसुद्धा पेपरच्या लायनीत गुरफटला. सर मात्र अधनंमधनं त्याची आठवण काढत. ‘‘काय म्हणताहेत प्रकाश बाळ जोशी? लिखाण सुरू आहे की नाही? त्यांनी बरेच दिवस काही पाठवलं नाहीये.’’ एक-दोनदा मी हे प्रकाशला सांगितलं. तर तो एकदम विरघळलाच. म्हणाला, ‘‘खरंय रे सरांचं. आपण काहीतरी लिहायला हवं..’’ हे पटवर्धनसरांचं फार मोठं यश.
जाता जाता सर एकदम भेदक असं काहीतरी बोलून जात अन् समोरचा खाडकन् भानावर येत असे. इंग्रजी घेऊन बी. ए. झालो. पेढे घेऊन ‘मौजे’त गेलो. तर सर आधी ‘‘व्वा!’’ असं म्हणाले. काहीही आवडलं, मनाला भावणारं काही वाचलं, ऐकलं की सरांचा एक दिलखुलास ‘‘व्वा!’’ असतो. मग आला ना त्यांचा हातोडा माझ्यावर. आपली शिक्षणव्यवस्था माणसाला स्वार्थी, आत्मकेंद्रित बनवते. आपल्या स्वार्थाचं सफाईदार समर्थन करण्याची राजरोस परवानगी म्हणजे पदवी. उत्तम बुद्धिमत्तेला, अफाट कर्तृत्वाला माणुसकीचा पाझर फुटण्याची शक्यता जवळजवळ नाहीच, हे नंतरच्या काळात समजत गेलं. मला वठणीवर आणण्याचं बरंचसं काम सरांनी केलं आणि माझ्या आईनं. दोघं कोकणातले. एकदम करकरीत आणि सणसणीत. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. खजूर चघळत चघळत ‘आणुनी द्या मज एक सुरई’ करत बसलो असतो.
मी पत्रकार झालो तर सर म्हणाले, ‘‘दहा-बारा वेळा नाव छापून आलं की आपण सर्वज्ञ आहोत असा तुमचा समज होईल. तर ती चूक करू नका. स्वत:ला सतत अपडेट करत राहा. दुसरा धोका म्हणजे सिनिसिझम. सिनिक झालात तर मग काही खरं नाही..’’ सरांचं हे विधान मोठाल्या टायपात प्रत्येक वर्तमानपत्राच्या ऑफिसात लावलं पाहिजे असं माझं मत आहे.
खूप मागची गोष्ट. एका मराठी दैनिकात माझा कॉलम येत असे. १९९०-९१ ची गोष्ट असेल. चार-पाच महिने कॉलम बरा चालला आणि मग मलाच कंटाळा आला. तर मी ‘मौजे’त गेलो. चहाची मैफल संपल्यावर बसस्टॉपकडे जाता जाता सरांनीच विषय काढला. म्हणाले, ‘‘कॉलम वाचतो. But you are spreading it too thin. (सरांचं इंग्रजी अप्रतिम होतं.) मजकुराची चणचण भासते का तुम्हाला? तसं वाटतंय..’’ त्या रविवारचा मजकूर दिल्यावर मी ‘कॉलम बंद करतोय..’ असं साहाय्यक संपादकांना सांगून टाकलं तर ते वैतागले. ‘कॉलम तडकाफडकी बंद करण्याचा विशेषाधिकार आता वापरता येणार नाही,’ असा काहीसा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. थोडक्यात वाचलो मी.
लिखाण आपल्या ठिकाणी असतं. त्याचप्रमाणे काळाचा, आयुष्याचा एक चमत्कारिक रेटाही असतो. जगण्याचे तगादे जिवाची सालटी काढत असतात. मी ‘मौजे’त जाऊ लागलो ते माझे दिवस मुष्किलीचे होते. वय लहान होतं. सरांच्या ते सगळं लक्षात आलं होतं. एकदा म्हणाले, ‘‘जगणं कणखर, कसदार असलं की लिखाणही कसदार होतं. प्रतिकूल काळच लिखाणाला जीवनरस पुरवत असतो. आयुष्याचं भान सुटू देऊ नका.’’ असं सांगू लागले की ते फक्त ‘मौज’-‘सत्यकथे’चे संपादक नसत, ते माझे वडीलधारे स्नेही होत असत.
व्रतस्थ, निरलस संपादकांची एक फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पटवर्धनसर त्या परंपरेतले. गोविंदराव तळवलकर, श्री. ग. माजगावकर आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी हेसुद्धा याच परंपरेतले. या चार संपादकांबरोबर मला थोडंबहुत काम करता आलं ही माझी जमेची बाजू आहे. इंग्रजी संपादकांबद्दल न बोलणंच बरं.
सरांचं जगणं झणझणीत. कणा एकदम ताठ. मिळमिळतपणा, मुळमुळीतपणा त्यांना मान्य नाही. पोकळ मिजास, बढाईखोरपणा, नटवेपणा, बनचुकेपणा या गोष्टींची तीव्र चीड. त्याचप्रमाणे पोलिटिकली करेक्ट असण्याचीही गरज त्यांना कधी भासली नाही. सरांच्या विचारांना भारतीय दर्शन आणि भारतीय संस्कृतीमूल्यांची बैठक आहे. ज्ञानदेवांच्या शब्दांत सांगायचं तर सत्यवादाचं तप त्यांच्या गाठीशी होतं आणि त्यांच्यातलं अथांग जाणतेपण त्यांना अपूर्व बळ देत राहिलं. राम पटवर्धन यांचं जगणं शांत, तृप्त होतं. रोज सकाळी ते पेपर वाचायला गॅलरीत बसले की उन्हाचा एक पातळ, पिवळाधम्मक तुकडा त्यांच्या आगेमागे करत असे.
गेल्या काही वर्षांत माझ्या आणि पटवर्धन- सरांच्या भेटी कमी झाल्या होत्या. तरी मी वर्षांतून एकदा त्यांना भेटायला जात असे. दोनेक तास त्यांच्याशी बोलत असे. गुरुपौर्णिमेला किंवा त्याच्या आगेमागे तर मी त्यांच्याकडे निक्षून जात असे. पटवर्धनसर ठाण्याला श्रीरंग सोसायटीत राहात. अगदी साधेपणाने राहात. त्यांच्या घरातले सगळेच लोक ‘तू आमचा आहेस.. आमच्यापैकीच एक आहेस,’ असं फीलिंग मला देत. त्यांच्या पत्नी साधंच, पण रुचकर खाऊपिऊ घालायच्या. आजच्या काळात मला हे थोर वाटतं.
हल्ली आपण एकमेकांना भेटत नाही. आपल्या मनात असतं, पण होत नाही. हल्ली लोकांची न भेटण्याची, न पटण्याची यादी खूप मोठी असते. या पाश्र्वभूमीवर पटवर्धनसर मला खूप सहिष्णु वाटतात. समोर बसलेल्या लेखकाला ते खूप बोलतं करत. त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत. ते मला खूप आवडत असे. ते तुम्हाला बोलतं करायचे आणि त्यातून शोधून काढायचे, की तुमच्या डोक्यात काय चाललंय. पटवर्धनसर वयातलं अंतर कापून बोलायचे. समोरच्या लेखकाला पडताळून पाहायचे. आपण एखादं कापड किंवा धान्य कसं पाहतो, तसं. ते लेखकाला मूठभर हातात घ्यायचे.
तीन-चार वर्षांपूर्वीच्या भेटीत मी त्यांना विचारलं होतं की, ‘यापुढचा काळ विशुद्ध साहित्याला- म्हणजे कविता, कादंबरी, कथेला अनुकूल असणार आहे का?’ त्यांनी सरळ उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, ‘मीडियाचा सगळीकडे वरचष्मा आहे. समाजाला जे काही अनुभव येत आहेत, ते समाज मीडियाच्या भिंगातून पाहतो. समाज सर्जनशील कलावंताकडे वळत नाही; मीडियाकडे वळतोय- हा माझा अनुभव आहे. पूर्वी हे काम सर्जनशील कलावंत करायचे. सध्याचा काळ अनुकूल नसला तरी एखाद्या लेखकाला आलेला अनुभव त्याने लिहून ठेवावा. समाजाला आज त्याच्याकडे पाहायला वेळ नाही, पण भविष्यात कधीतरी तो पाहील.’
दोन वर्षांपूर्वी पटवर्धनसरांची मुलं- श्रीरंग व अनिरुद्ध यांच्याशी मी बोललो. सरांच्या तब्येतीची चौकशी केली. मग त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला ओळखलं. मला एक फळ दिलं खायला. त्यांच्याकडे आतिथ्यशीलतेचा भाग खूप होता. ती दिखावू नव्हती. ते खूप प्रेमानं वागायचे. पटवर्धनसर आतल्या खोलीत बसले होते. मी श्रीरंगला विचारलं, ‘अप्पा तुमच्यावर कधी रागावले का? ते कडक होते का?’ तो म्हणाला, ‘ते कडक नव्हते. पण त्यांचा संपादकीय साक्षेप घरीही आम्हाला अनुभवायला यायचा. १२-१४ वर्षांचा असताना मी त्यांच्याकडे सायकल मागितली होती. तिची किंमत तेव्हा असेल ३००-३५० रुपये. अप्पा म्हणाले- मी तुला अर्धे पैसे देतो, अर्धे तुझे तू उभे कर.’ आज श्रीमंत परिवारातली बेताल मुलं पाहिल्यावर हे मला विलक्षण वाटतं. आता लोकांकडे खूप पैसा आहे. जागतिकीकरणात पैशाला इतकं महत्त्व आलेलं असताना पटवर्धनसर मात्र १९ व्या शतकातील प्रबोधनाच्या परंपरेची कास धरणारे होते.
संपादक असं म्हटलं की सर्वप्रथम दैनिकांचे संपादक आठवतात. उदा. आचार्य अत्रे, ह. रा. महाजनी, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर. त्यांच्याशी माझा काही तंटा नाही. पण समग्र संस्कृती आणि भाषाव्यवहार असा विचार केला तर वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांचं आवर्जून स्मरण केलं पाहिजे. अनंत अंतरकर, शिरीष पै, श्री. ग. माजगावकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी किंवा वाङ्मयीन पुरवण्या काढणारे दिनकर गांगल, शंकर सारडा, अशोक शहाणे, नंतरच्या काळातले सुनील कर्णिक या लोकांकडे आपण कधीच बघत नाही. यांनी पुष्कळ संस्कार केले. अनेक लेखक घडवले. त्यातले काही गाजले, काही मागे पडले. पण या संपादकांनी त्यांचं काम केलं ना! त्यांच्याकडे बघायला पाहिजे. आणि या यादीत पटवर्धनसर सर्वात वर असायला पाहिजेत.
मी लेखक म्हणून खूप वाईट निपजलो, ही जबाबदारी पूर्णत: माझी आहे. पण पटवर्धनसरांनी माझं ग्रूमिंग, मेंटरिंग केलं. हे शब्दसुद्धा नसतानाच्या काळात केलं. कुठंही भेटले की विचारायचे, ‘नवीन काय वाचलं? काय लिहिताय?’ उत्तम संपादक शिकारी कुत्र्याप्रमाणे लेखकांवर पाळत ठेवतो. हे मोठय़ा प्रमाणावर पटवर्धनसरांनी केलं. साक्षेपी संपादकाला कधी मरण नसतं. मी जे लेखन करणार आहे त्याच्यावर संपादकीय संस्कार करणारा संपादक मला यापुढच्याही काळात लागणार आहे. याचाच अर्थ संपादक मरत नाही.
आपण जेव्हा वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांकडे बघत नाही, केवळ दैनिकांच्या संपादकांकडे बघतो, तेव्हा आपण पटवर्धनसरांचा मुद्दा मान्य करत असतो, की प्रसारमाध्यमांचा समाजावर मोठा प्रभाव आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियाने पटवर्धनसरांकडे दुर्लक्ष केलं. गोपीनाथ मुंडे आणि पटवर्धनसर यांचं निधन एकाच दिवशी झालं. पण मुंडेंना किती जागा द्यावी.. प्रमाणाच्या बाहेर? इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या संपादकांना संपादकीय साक्षेप नसावा? तुम्हाला दहा मिनिटे पटवर्धनांसाठी देता येऊ नयेत? परदेशात असं होत नाही. याचा अर्थ १९५० ते १९८५ या काळातलं पटवर्धनांचं काम तुम्हाला माहीतच नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला पटवर्धनांची थोरवी कळली नाही, ही त्यांची समस्या आहे. पटवर्धन थोरच होते.
याचा अर्थ परत असा घेऊ नये, की प्रसारमाध्यमांचं खूप वर्चस्व आहे. ते ठरवतात, ते आपल्याला बघावं लागतं. इलेक्ट्रॉनिक मीडिया जे दाखवतो तेच बघावं लागतं असं नाही. तुम्ही चॅनेल बदलू शकता किंवा बंद करू शकता. ल्ल