काही महिन्यांपूर्वी शेकापने शिवसेनेशी घेतलेला काडीमोड आणि आघाडीकडून राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेला मतदारसंघ यामुळे रायगड लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेना आणि शेकापच्या मतविभाजनाचा फायदा आघाडीच्या सुनील तटकरे यांना होईल, असा कयास बांधला जात असला तरी विजयासाठी आवश्यक मते मिळवण्यासाठी तटकरे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
विधानसभेच्या अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या मतदारसंघांनी मिळून रायगड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. राजकीय बलाबलाचा विचार केला तर मतदारसंघात शेकाप सेना आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणे अपेक्षित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे खासदार अनंत गिते तब्बल पावणेदोन लाख मतांनी निवडून आले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या बॅरिस्टर अंतुले यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आता मात्र मतदारसंघातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेनेशी असलेली युती तोडत शेकापने आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला आहे. राष्ट्रवादीच्याच मुशीत वाढलेल्या रमेश कदम यांना उमेदवारी देऊन शेकापने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. बॅरिस्टर अंतुले आणि मनसेचा तथाकथित पाठिंबा मिळवत गिते आणि तटकरे यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे सेना-शेकापच्या मतविभाजनाचा फायदा आघाडीच्या सुनील तटकरे यांना होईल, असा कयास बांधला जात असला तरी विजयासाठी आवश्यक मतांचा टप्पा गाठतांना तटकरे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात १४ वर्षे मंत्रिपद उपभोगणाऱ्या तटकरेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. रमेश कदम, बॅरिस्टर अंतुले यांची नाराजी आणि निवडणुकीत दुसऱ्या सुनील तटकरे नामक उमेदवार जलसंपदा मंत्र्यांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी मतभेदाचे पडसाद या मतदारसंघात शेवटच्या क्षणी दिसले तर तटकरे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवाय विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही त्यांना सामना करावा लगतो आहे.
शिवसेनेकडून अनंत गिते सलग सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. मोदी सरकारमधील मंत्रिपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. दापोली, श्रीवर्धन, महाड मतदारसंघातील कुणबी मतांचा फॅक्टर आणि मोदी फॅक्टर या गितेंसाठी उजव्या बाजू ठरताना दिसत आहेत. मात्र शेकापच्या मतविभाजनाचा फटका थोपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. अशातच रामदास कदम यांच्या उघड नाराजीचा फटकाही त्यांना बसतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मतदारसंघात आपचे उमेदवार माजी पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांच्याकडून मोठय़ा चमत्काराची अपेक्षा नसली तरी ते किती आणि कोणाची मते खातात यावर इतर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. एकूणच मतदारसंघात तिंरगी लढत अपेक्षित असली तरी अनंत गिते आणि सुनील तटकरे यांच्यात काटय़ाची टक्कर पाहायला मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात १४ वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. या काळात नगररचना विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, अर्थ विभाग आणि जलसंपदा विभागाचे काम मी पाहिले. प्रत्येक संधीचा माझ्या विभागाला कसा फायदा होईल याचा प्रयत्न मी केला. त्यामुळे आता याच विकास कामाच्या जोरावर लोक मला निवडून देतील, असा मला विश्वास आहे. खासदार झालो तर मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि कोकण रेल्वेचे दुपदरी करण्यासाठी प्रयत्न करीन.
    – सुनील तटकरे, (आघाडी)
रायगडचा खासदार म्हणून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न, अलिबाग-पेण रेल्वे मार्गाला मंजुरी, आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. आगामी काळात कोकणातील इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. ही भ्रष्टाचारविरोधात सदाचाराची लढाई आहे.                                                                   
    – अनंत गिते, (महायुती)
कोकणात प्रक्रियाउद्योगांना खूप वाव आहे. मात्र याकडे आजवर कुठल्याही पक्षाने लक्ष दिले नाही. कोकणातील पर्यटन उद्योग, प्रक्रिया उद्योग वाढीस लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे कोकणात निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर असणार आहे. जनसंपर्क असलेला खासदार कसा असतो हे दाखवून द्यायचे आहे.
रमेश कदम, शेकाप

रायगड