पावसाअभावी राज्यभर भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, दुष्काळामुळे ऊसउत्पादनात दुष्काळग्रस्त भागात ५० टक्के, तर उर्वरित भागात २५ टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे खासगी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.
मराठवाडा, खाादेश, सोलापूर, अहमदनगर भागात पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी पडत असल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठाही खोल गेला आहे. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे विभागातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात लक्षणीय घट झाली. अवर्षणामुळे उसाच्या लागवडीत २५ टक्के घट असून, असलेल्या उसाच्या वाढीवर २५ टक्के परिणाम झाला आहे. चाऱ्याची टंचाई असल्याने सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा या प्रमुख ऊस उत्पादन क्षेत्रात उसाची चाऱ्यासाठी तोड सुरू झाली आहे. आगामी ३ महिन्यांत ३० ते ३५ टक्के ऊसचारा वापरासाठी तुटेल. साखर आयुक्तांच्या नोंदीनुसार राज्यातील १०.२४ लाख हेक्टर ऊस क्षेत्रामधून अंदाजे २ लाख हेक्टर ऊस कमी होऊन साधारण ७०० ते ७५० लाख हेक्टर मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. मागील हंगामातील १०४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाच्या तुलनेत पुढील हंगामात ७० ते ७५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
उसाच्या अनुपलब्धतेमुळे राज्यातील अनेक साखर कारखाने सुरूच होऊ शकणार नाहीत. शिवाय साखरेचे भाव पडल्यामुळे साखर कारखाने चालवणे कारखानदारांना परवडणार नाही. उपलब्ध उसाला सरकारने ठरवून दिलेल्या भावाप्रमाणे पसे देणेही अतिशय अवघड जाणार असल्याचे ठोंबरे म्हणाले.