राज्यातील शहरांमध्ये भयावह स्थिती; वरवरच्या मलमपट्टीने समस्या गंभीर

देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असताना ही आकडेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे. चंद्रपूरसारख्या शहरातील प्रदूषणाचा प्रश्न वर्षांनुवर्षे चर्चेत आहे. एखादा अहवाल आल्यावर आठवडाभर चर्चा होते, उपाय योजण्याचे आश्वासन राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून दिले जाते. थातूरमातूर उपाय योजले जातात. त्यातून प्रश्न सुटत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. केंद्र सरकारच्या अहवालानंतर तरी राज्य सरकारचे डोळे उघडणार का, असा प्रश्न आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ प्रतिनिधींनी समस्येचा घेतलेला आढावा.

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?

नागपूरचा बट्टय़ाबोळ !

जगातील हिरव्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे नागपूर शहर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत आल्याने पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवींसह शहरातील नागरिकांनाही धक्का बसला. जागतिक आरोग्य संघटनेने काही वर्षांपूर्वी दिलेल्या या अहवालावर टीकेची झोड उठली, पण वास्तविकतेत शहरातील हिरवळ प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्याप्त नाही. वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण होणारा घनकचरा, सांडपाणी, वाढती वाहनांची संख्या यामूळे शहर प्रदूषणाच्या खाईत लोटले गेले आहे.

विकासाच्या दिशेने शहर वाटचाल करत असले तरी सांडपाणी वाहून देण्यासाठी अजूनही जुन्याच मलवाहिन्यांचा वापर केला जात आहे. शहराची लोकसंखा ४० लाखांच्या घरात पोहोचल्यानंतरही जुन्याच मलवाहिन्या आहेत. अनेक ठिकाणी त्या फुटल्यामुळे सांडपाणी जमिनीत झिरपून मृदा प्रदूषणाच्या नवी समस्या उभी झाली आहे. शहरात दररोज ५०० एमएलडी सांडपाणी तयार होते. तर ११०० मेट्रीक टन कचरा दरवर्षी तयार होतो. त्यातील २०० मेट्रीक टन घनकचऱ्यावरच प्रक्रिया होत असल्याने उर्वरित घनकचऱ्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी जे नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत महापालिका आहे, त्यातही अनेक त्रूटी आहेत. यात ओला आणि सुका कचरा तसेच प्लॅस्टिक वेगळे न केल्यास कचरा मार्गी लागण्याऐवजी प्रदूषणात वाढ होणार आहे.

शहरातील झाडांच्या तुलनेत सिमेंटचे जंगल मोठे आहे आणि ते वाढतच आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात साडेचार हजार झाडांवर कुर्हाड चालवण्यात आली. मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांकरिता वृक्षतोड सातत्त्याने सुरू आहे. शहरात सुमारे २९ लाख वृक्ष आणि प्रत्येक दहा व्यक्तीमागे नऊ वृक्ष आहेत. वास्तविकतेत प्रत्येक व्यक्तीमागे किमान तीन तर कमाल १७ झाडे असायला हवी. वाहनातून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनो ऑक्साईड हे प्रदूषण करणारे घटक बाहेर पडतात. रस्ते दुभाजकावर लावण्यात आलेली झाडे शोभीवंत असून, धुळ शोषून घेणारी आणि ऑक्सिजन निर्माण करणारी नाहीत. त्यामुळे शहरातील वाढत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातून निघणाऱ्या धुरांवर कोणतेही नियंत्रण नाही.

बदलापूरच्या प्रदूषण समस्येवर मार्ग काढण्यात यंत्रणेला अपयश

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नुकत्याच जाहिर झालेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर आणि बदलापूर या दोन शहरांचा समावेश प्रदुषित शहरांमध्ये झाल्याने येथील स्थानिक यंत्रणांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. एकीकडे या शहरांच्या पट्टय़ात उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांची मागणी वाढत असताना, दुसरीकडे प्रदूषित जलस्रोत आणि वायूप्रदूषण यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मात्र प्रदुषण नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पाउले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने २०११ ते २०१५ या काळात विविध शहरात सर्वेक्षण आणि चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात शहरातील हवेतील सरासरी वार्षिक पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदुषित घटकाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. या प्रदुषीत शहरांमध्ये बदलापूर आणि उल्हासनगरचा समावेश असल्याने येथील रहिवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. यापूर्वी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट उल्हास आणि वालधुनी नदी पत्रात सोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण हरित लवादाच्या सुनावणीसाठी प्रलंबित आहे. नदी प्रदुषणाचा ठपका असलेली ही दोन्ही शहरे आता वायु प्रदुषणातही अग्रणी असल्याचे पुढे आले आहे. उल्हासनगर शहरात मोठय़ा प्रमाणावर उद्य्ोगधंदे आहेत. त्यात अनेक ठिकाणी विकासकामेही सुरू आहेत. शहरात मोठय़ा प्रमाणावर येणारी वाहने, होणारी अवजड वाहनांची, कचरा भूमीची वानवा, विविध ठिकाणी जाळला जाणारा कचरा अशा विवीध कारणांमुळे येथील प्रदुषणाची पातळी वाढली आहे. एमआयडीसी भागातून बदलापूरात प्रवेश करताना मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यावर जाळला जाणारा कचरा हे येथील प्रदुषणाचे मुख्य कारण ठरले आहे. वर्षांनुवर्षे येथील यंत्रणेला ही समस्या सोडविता आलेली नाही.

अमरावतीत धूर आणि धुळीचे साम्राज्य!

वाहनांची संख्या जेमतेम आणि औद्योगिकदृष्टय़ादेखील मागासलेपण असताना देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये अमरावतीचा समावेश हा विषय चिंतनीय बनला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देखील अमरावती शहराच्या हवेत २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या सूक्ष्म कणांचे (पीएम २.५) प्रमाण ४३ टक्के आढळून आले होते. त्यावेळीही पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अमरावती शहरात दुचाकीनंतर सर्वाधिक संख्या ही ऑटोरिक्षांची आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुख्यत्वे या वाहनांवरच अवलंबून आहे. ऑटोरिक्षांमध्ये इंधन भेसळीमुळे प्रदूषण वाढल्याचा आक्षेप आहे. शहर बससेवा अस्तित्वात असली, तरी बसगाडय़ांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर सर्वाधिक प्रदूषण दिसून येते. वाहनांमधून निघणारा धूर प्रदूषणासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे. अमरावती शहरातील औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने नाहीत. औद्योगिक प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळे कमी आहे. अमरावती शहरामध्ये दुचाकींची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. पण, शहराचा विस्तारही वाढला आहे. दुसरीकडे शहरातील मुख्य मार्गावर वाहनांची कोंडी होते. वायू प्रदूषणाच्या बाबतीत सर्वाधिक संवेदनशील भाग हा राजकमल चौक ते मालवीय चौक मानला जातो. या भागात ध्वनी प्रदूषणाचीही समस्या आहे. शहरातील इतर भागात धुळीचे साम्राज्य आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ते सुधारणेची कामे झाली त्यावेळी रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी झाले होते, पण आता रस्ते उखडले. भुयारी गटार योजनेच्या कामांसाठी खोदण्यात आले. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे.

अकोल्यात प्रदूषणाची  पातळी भयावह

शहरातील प्रदूषणाची पातळी भयावह स्थितीत पोहोचली असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे चित्र आहे. धूळ, प्रदूषित हवा व नदीत जाणारे सांडपाणी यामुळे शहरातील प्रदूषणाच्या पातळीत गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवणारी यंत्रणाही उपाययोजना करण्यात कुचकामी ठरत आहे. शहरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामध्ये काही मोठे तर, काही मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांमधून हवेत प्रदूषित धूर सोडण्यात येतो. याच उद्योगातील दूषित पाणीदेखील सोडण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. एमआयडीसीमधील मोठय़ा उद्योगांमधून होणारे प्रदूषण रोखण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकारी कार्यालयाला यश आले नाही.  शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह अनेक महत्त्वपूर्ण मार्ग जातात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांसह सर्वच प्रकारच्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहनातून निघालेल्या धुरानेही प्रदूषणात मोठी भर घातली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने धुळीचाही अकोलेकरांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील धूळ हवेत उडत असल्याने प्रदुषणाने कमाल पातळी ओलांडल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी कार्यालातील अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरली आहे. शहरातील सांडपाण्यापकी ८० टक्के सांडपाणी सोडून प्रदूषणाला महापालिकेने हातभार लावला आहे. शहरातून वाहणारी मोर्णा नदी घाण पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाली आहे. शहरापासून २० किलोमीटरवर पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्यातून निघणारी राख, हवेतील प्रदूषण याचा दुष्परिणाम होत असून अकोल्यातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विविध कारणांमुळे अकोल्यातील हवेमध्ये पार्टक्यिुलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे.

चंद्रपुरातील हवा व पाणी प्रदूषित

जीवनासाठी आवश्यक शुध्द हवा आणि पाणी या दोन्ही गोष्टी या जिल्हय़ात पूर्णत: प्रदूषित झाल्या असून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट व पोलाद उद्योग, कोळसा जाळणे, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. प्रदूषणात चंद्रपूर देशात कधीकाळी सहाव्या क्रमांकावर होते. नागपुरातील ‘नीरी’ या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेतील संशोधकांनी चंद्रपूरसाठी प्रदूषण नियंक्ष्णाचा कृती आराखडा तयार केला, पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. महानगरपालिकेच्या अकार्यक्षमत धोरणामुळे शहरात घनकचरा विल्हेवाट आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अध्र्यावर आहेत. शहरातील सर्व सांडपाणी नाल्यांवाटे नदीच्या पात्रात सोडल्याने पाणीही प्रदूषित झाले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नवीन ५०० मेगाव्ॉटचे ८ व ९ क्रमांकाचा संचातून प्रदूषित धूर बाहेर पडतात. वीज केंद्राचे एक व दोन क्रमांकाचा संच बंद केला असला तरी ३ व ४ क्रमांकाचा संच तितकेच प्रदूषण करित आहे. सर्वाधिक प्रदूषण करणारे धारीवाल व मल्टी ऑरगॅनिक या दोन उद्योगांची प्रत्येकी ५ लाखांची बँक हमी जप्त करण्यात आली. १५ कोल डेपोंना नोटीस बजावण्यात आल्या. मानापुरे हॉट मिक्स प्लान्ट व चिद्रावार कंन्स्टक्शन यांनाही नोटीसेस दिल्या. चंद्रपूर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू न केल्याने महापालिकेवर खटले का दाखल करण्यात येऊ नये या आशयाची नोटीस बजावली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी जोशी यांनी दिली.

(संकलन : सागर नरेकर, राखी चव्हाण, मोहन अटाळकर, प्रबोध देशपांडे, रवींद्र जुनारकर)