सत्तेत असताना वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तांतरानंतर मात्र तोलूनमापून बोलण्याचे व प्रत्येकाचा सन्मान करण्याचे धडे तरुणांना दिले. एवढेच नव्हे तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा शिकविला, त्यामुळे त्यांच्या मार्गाने जाण्याचाही सल्ला त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री असताना पवार यांनी एकदा पाणीच नाही, तर आणू कुठून? आता मी लघुशंका करू का, असे वक्तव्य पूर्वी केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. तसेच त्यांच्या राजकीय शैलीमुळे अनेक ज्येष्ठ नेते दुखावले गेले होते. मात्र आता सत्तांतरानंतर त्यांनी सभ्यतेचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. बारामती सहकारी बँकेच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी पूर्वीच्या चुका कबूल करीत तरुणांना कसे वागावे ते सांगितले.

एकदा का शब्द तोंडातून बाहेर गेला तर त्याचा परिणाम काय होतो हे मी अनुभवले अन् भोगलेही आहे. संपूर्ण एक दिवस गांधीजींच्या पुतळ्यासमोर मौन धारण करून प्रायश्चित्त घेतले. तेव्हा माझ्या जिवात जीव आला. त्यामुळे आता तरुणांनी तोलूनमापून तर बोलावेच, पण सर्वाचा सन्मान करावा. जबाबदारीने वागावे. राजकारणातील नव्या पिढीने विरोधक आहे म्हणून त्यांच्याशी शत्रुत्व ठेवायचे, त्यांच्याशी बोलायचेच नाही असे करू नये. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा शिकविला. त्यामुळे निर्लज्ज, कोडगे, हरामखोर असे शब्द वापरू नये, असा सल्ला तरुणांना दिला.

माजी मंत्री गोिवदराव आदिक, भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, माजी आमदार ज. य. टेकावडे, आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शरद पवारांशी संबंध आला. ते येथील राजकारणात एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यात मतमतांतरे असतीलही; पण ते एकमेकांचे कायमचे दुश्मन नाही. याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. वेळेला महत्त्व देण्याची अधिक गरज आहे. राजकारणी म्हटले की, ते उशिरा येणार असा एक समज असतो. त्यामुळे लोकही उशिरा येतात. लोकांना ताटकळत ठेवले जाते. तरुणांनी असे करता कामा नये, असे सांगितले.