इंग्रजी ही जगाची भाषा हा आपला समज असून तो सोडला पाहिजे. जगात सर्व देशांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले जात असताना भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो. जगातील विकसित राष्ट्रांची भाषा इंग्रजी नसूनही त्यांचा विकास झाला. इंग्रजी आल्याने माणसं ज्ञानी होतात ही अंधश्रद्धा आहे, असे परखड मत ज्ञानपीठकार साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे.
डॉ. नेमाडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील परिवर्तन आणि भंवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘दादा सलाम’ या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी व परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी नेमाडे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी नेमाडे यांचा इंग्रजीविरूध्दचा राग पुन्हा उफाळून आला. फ्रांस, जर्मनी, चीन या देशात मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांची प्रगती झाली की अधोगती? फक्त आपलाच देश इंग्रजीची बढाई मारतो. इंग्रजी ही केवळ ज्ञानभाषा आहे, असे त्यांनी नमूद केले.
हडप्पा संस्कृती, मोहंजोदडो, भारतीय संस्कृती, अस्पृश्यता, मातृभाषा अशा अनेक प्रश्नांवर मत मांडले. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा असून ती टिकण्याचे एकमेव कारण म्हणजे बदल स्वीकारले व पचवले. जगाच्या इतिहासात अनेक संस्कृती नष्ट झाल्या, पण हिंदू संस्कृती इथे राबणाऱ्यांच्या जोरावर टिकून आहे. भारतातील कृषी संस्कृतीला अडीच हजार वर्षांची परंपरा असून जगात इतकी प्राचीन परंपरा असलेली कृषी संस्कृती कुठेही अस्तित्वात नाही.ो अजिंठा परिसरात कृषीचे जागतिक दर्जाचे संग्रहालय निर्माण केल्यास जगाला भारतीय कृषी संस्कृतीची ओळख पटेल. घराजवळ गोठा, गोठय़ातील शेणातून इंधनाचा वापर, त्यातून ऊर्जा हे आपले पूर्वज पूर्वापार करत आले आहेत. कृषी संस्कृती फार पूर्वीच आपल्याकडे विकसित झाली होती. त्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे खेडय़ात सापडतात. सांगवी गावातून, परंपरेतून जे मिळाले त्यातून मी मोठा झालो.
सांगवीच्या घरात अजूनही लहान बहिणीच्या बाहुल्या, गौर, पेटय़ा आहेत. त्या मला फेकाव्याशा वाटत नाही. म्हणून ही समृद्ध अडगळ आहे. भारतीय संस्कृतीेने जुने काहीही फेकून दिलेले नाही. त्यामुळे हिंदू ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे मी मानतो, असे नेमाडे यांनी सांगितले. जातीयता आणि जाती व्यवस्था हे दोन वेगळे प्रकार आहेत. व्यवस्था म्हटली की, त्यात काही गोष्टी सम असू शकत नाहीत. त्यात विषम गोष्टी असतात. भारताचे नुकसान हे जातीव्यवस्थेमुळे झाले नसून चुकीच्या धर्म व्यवस्थेमुळे झाले आहे, असे मत त्यांनी मांडले. मुलाखतीदरम्यान शंभू पाटील यांनी नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा यांनाही बोलते केले. रात्रभर लिहिणे आणि सकाळी झोपणे असा नवरा असावा, पण भविष्यात तो लेखक नसावा, असे उत्तर त्यांनी दिल्यावर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2015 रोजी प्रकाशित
इंग्रजीमुळे ज्ञानी होता येते, ही अंधश्रद्धा – नेमाडे
इंग्रजी ही जगाची भाषा हा आपला समज असून तो सोडला पाहिजे. जगात सर्व देशांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले जात असताना भारतात मात्र इंग्रजीचा उदोउदो केला जातो.

First published on: 29-05-2015 at 04:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra nemade on english language