लोखंडी भंगारापासून लोखंडी साहित्य तयार करण्यात येत असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार भाजले झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले आहे. ही घटना कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रातील त्रिमूर्ती इस्पात कंपनीत शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या कंपनीत लोखंडी भंगार साहित्य वितळवून त्यापासून दुसरे लोखंडी साहित्य तयार केले जाते. आज पहिल्या पाळीत १५ कामगार काम करीत होते. त्यातील ७ कामगार भंगार वितळवण्याचे, तर अन्य कमगार दुसरीकडे काम करीत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास भंगार वितळल्यानंतर होणाऱ्या लाव्हारसात अचानक स्फोट झाल्याने हा लाव्हारस तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर उडाला. त्यात ७ कामगार जखमी झाले. या स्फोटानंतर औद्योगिक परिसरात खळबळ उडाली. अन्य कर्मचाऱ्यांनी जखमी कर्मचाऱ्यांना कळमेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे सुखदेव उईके (४०, रा. कळमेश्वर) व सुशील उपाध्याय (४५, रा. वाराणशी (कळमेश्वर) या दोघांना उपचार करून घरी पाठवण्यात आले. उपाध्याय हे या कंपनीचे पर्यवेक्षक आहेत. गंभीर जखमींमध्ये कमलाकर झाडे (३०, रा. केतापार), ज्ञानेश्वर गोरले (३७, रा. वाढोणा), भादो मडावी (४० रा. सावंगी), सूरज उईके (३०, रा. कळमेश्वर), महेंद्र शर्मा (४५, रा. कळमेश्वर) यांचा समावेश असून त्यांना मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे. स्फोट झाला तेव्हा लोखंडी अँगल तयार केले जात होते. या भंगारात स्फोटक वस्तू असल्याने त्याचा प्रचंड उष्णतेने स्फोट झाला, असे कळमेश्वर पोलिसांचे म्हणणे आहे.
कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड हे चौकशी करीत असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोणत्या वस्तूमुळे स्फोट झाला, याचा तपास सुरू आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे औद्योगिक परिसरातील अन्य कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. लाव्हारसाने भाजलेले कामगार विव्हळत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात आणले. किरकोळ जखमी झालेल्या दोघांना प्रथमोपचारानंतर घरी पाठवले, तर अन्य पाच कामगारांना पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवले. दरम्यान, या घटनेने या कंपनीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.