नोटाबंदीनंतर दिलेल्या धनादेशांद्वारे व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

‘नोटाबंदी नसती तर रोखीत कापूस विकला असता. पण दुर्दैव माझे. व्यापाऱ्याला ३१ क्विंटल ५९ किलो कापूस विकला. त्याने १ लाख ७८ हजार ४८३ रुपयांचा धनादेश दिला, तोही दीड महिन्याने. हा धनादेश वठलाच नाही, असे बँकेने कळवले आणि सगळीच रक्कम आता बुडाल्यात जमा आहे. धनादेश न वटल्याप्रकरणी वकील लावून न्यायालयात जाण्याचा विचार आहे. सगळी मेहनत वाया गेली.’ दीपक सांडुलाल बडवणे त्यांची करुण कहाणी डोळ्यांत पाणी आणून सांगत होते. औरंगाबाद तालुक्यातील करंजगावमध्ये एक हेक्टर ८ आर या क्षेत्रात पिकवलेल्या कापसाची रक्कम व्यापारी द्यायला तयार नाही. दीपक बडवणे हे काही एकटे शेतकरी नाही. करंजगावमधील येडुबी भीमराव भेरे, जितेंद्र सांडुलाल बडवणे, जनार्दन भेरे यांच्यासह हसनाबादवाडी येथील कृष्णा एकनाथ गाडेकर यांचीदेखील अशीच अवस्था. मेहनतीने कमवावे आणि मातीमोल व्हावे, अशी स्थिती.

कधी निसर्ग मारतो, कधी सरकार हमी भावात हात आखडता घेते. कधी व्यापारी नाडतो. करंजगावमधील योगेश साहेबराव बोरुडे या तरुण व्यापाऱ्याने गावातल्या शेतकऱ्यांना पुरते फसविले आहे. बँकेमधून दिलेले धनादेश वठणार नाहीत, असे कळविल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. दीपकचे वडील सांडुलाल यांना त्यांच्या शेतात पिकविलेल्या कापसाचे एक लाख ४० हजार रुपये याच व्यापाऱ्याने आरटीजीएसने बँक खात्यात जमा केले. सांडुलाल बडवणेंना व्यापाऱ्यावर विश्वास बसला. त्यांनी त्यांच्या मुलाच्या शेतीतील कापूसही याच व्यापाऱ्याला देण्याचे ठरविले आणि पुढे घोळ झाला. दीपक बडवणेंनी कापसावर एक लाख रुपये खर्च केले होते. त्यासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एक लाख ५३ हजारांचे कर्ज घेतले होते. सावकाराकडून तीन टक्के व्याजाने त्यांनी दोन लाख रुपये कर्जाऊ रक्कमही उचलली होती. पैसे आले की, सावकाराची रक्कम चुकवू, असा त्यांचा मानस होता. आता पाऊस आला आहे. किमान बियाणांसाठी तरी पैसे द्या, अशी त्यांनी मागणी केली. पण रक्कम काही मिळाली नाही.

दीपक बरोबरच भगवान भेरे या २८ वर्षांच्या शेतकऱ्याने साडेतीन एकरात कापूस लावला होता. घरात खाणारी तोंडे दहा. एका शेतीच्या उत्पन्नातून भागणार नाही म्हणून दोन एकर शेती बटईने केली. २१ क्विंटल ८० किलो कापूस त्याच व्यापाऱ्याला विकला. त्याच्याकडेही आता बँकेने परत पाठवलेला धनादेश आहे. त्यावर रक्कम आहे १ लाख १९ हजार ७८० रुपये. आता ही रक्कमसुद्धा कागदी तुकडाच. जुन्या नोटांसारखा. दीपक आणि भगवान हे दोघेही तरुण शेतकरी सांगत होते, नोटाबंदी नसती तर रोख व्यवहार झाला असता. किमान फसलो तरी गेलो नसतो. केवळ दीपक बडवणे, भगवान भेरे हे दोनच शेतकरी फसले गेले नाही. कापूस उत्पादन करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्याला एकाच व्यापाऱ्याने एवढे नाडले आहे. पाऊस पडू लागला आहे. आज-उद्यालाच पेरावे लागेल, अशी स्थिती येऊ लागली आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात रक्कमच नाही. ‘आज देतो, उद्या देतो’ असे म्हणत व्यापाऱ्याने सहा महिने खाल्ले. दिलेले धनादेश वठले नाही. कृष्णा गाडेकर, एकनाथ गाडेकर, तुळशीराम भेरे असे अनेक शेतकरी त्यांच्या घामाचे पैसे कसे पळविले गेले, हे सांगत होते. ज्या व्यापाऱ्याला कापूस विकला, त्याच्या बँक खात्यावर आता वजा ४ हजार ९०० रुपये झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गावातच व्यापारी असल्याने अनेकांनी त्याच्या घरी चकरा मारल्या. पैसे देण्याची विनंती केली. पण रक्कम काही मिळाली नाही. कर्जमाफीची वाट बघत नोटाबंदीत अडकलेल्या औरंगाबाद तालुक्यातील हे शेतकरी हैराण आहेत. त्यातील एक-दोघांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. पण कोणीच जुमानले नाही.