सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे ज्येष्ठ विचारवंत कॉ. शरद तानाजी पाटील यांचे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धुळे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
त्यांच्यामागे पत्नी नजुबाई गावित, दोन मुले, एक कन्या असा परिवार आहे.  रविवारी दुपारी चार वाजता धुळे येथील त्यांच्या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
पाटील यांना फेब्रुवारीच्या अखेरीस ब्रेनहॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आठवडाभरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर उपचारांना ते प्रतिसादही देऊ लागले होते. शनिवारी दुपारी त्यांनी दूध आणि औषधे घेतली. परंतु रात्री साडेदहाच्या सुमारास शांतपणे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
धुळ्याच्या कापडणे तालुक्यात १७ सप्टेंबर १९२५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मॅट्रीक्युलेशन झाल्यावर त्यांनी बडोद्याच्या कलाभवन येथे चित्रकला शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. त्यापुढील वर्षांत ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखल झाले. १९४५ मध्ये झालेल्या पहिल्या युध्दोत्तर विद्यार्थी संपात शिक्षण सोडून ते सहभागी झाले आणि जीवनदानी कम्युनिस्ट म्हणून कार्यरत झाले. १९६४ मध्ये हिंदी कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर त्यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. माकपच्या माध्यमातून सलग १४ वर्ष त्यांनी वेगवेगळे विषय व प्रश्नांवर काम केले.
पुढे जाती व्यवस्थेविरोधात लढण्यास माकपने नकार दिल्यामुळे त्यांनी या पक्षाचा राजीनामा दिला. १९७८ मध्ये कॉ. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी’ या मासिकाचे बारा वर्ष त्यांनी संपादन केले.