लोकसभा निकाल उद्यावर आलेला असताना जिल्हय़ातील प्रमुख उमेदवारांमध्ये विजयाचा आत्मविश्वास दुणावलेला दिसतो. देशातील ‘एक्झिट पोल’चा कौल ‘एनडीए’च्या बाजूने झुकलेला असला तरी धनंजय महाडिक, कल्लाप्पाण्णा आवाडे या आघाडीच्या उमेदवारांनी जल्लोषाची तयारी केली आहे. तर मोठय़ा फरकाने विजयाचा आत्मविश्वास असल्याने संजय मंडलिक व खासदार राजू शेट्टी या महायुतीच्या समर्थकांनी गांधी मदानातून मिरवणूक, फटाक्याची आतषबाजी, मिठाई वाटप असा मोठा जामानिमा सज्ज ठेवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान  झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तशी दुरंगी लढत झाली. या ठिकाणी झालेल्या विक्रमी मतदानामुळे वाढलेले मतदान आमचेच, त्यामुळे विजय आमचाच, असा दावा प्रा. संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून केला जाऊ लागला आहे. मतदान होण्यापूर्वी, मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणी तीन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर हे दावे सुरूच आहेत.
दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. शासकीय तंत्र निकेतनमध्ये मतमोजणीवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली आहे. मुख्यत्वेकरून मतमोजणीसाठी येणाऱ्या राजकीय नेते व कार्यकर्त्यांना मोबाइल बंद ठेवण्यास सांगितले जाणार आहे. चुकीचा निकाल मोबाइलवरून बाहेर पडल्याने गरसमज होऊन वादाला तोंड फुटण्याची शक्यता असते हे गृहीत धरून मोबाइल बंद ठेवले जाणार आहेत. पोलीस, एसआरपीच्या तुकडय़ांचा कडेकोट बंदोबस्त तनात केला जाणार आहे.