‘पॅराजंपिंग’ या हवेतील साहसी क्रीडा प्रकारात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद झालेले राज्यात दोनच खेळाडू आहेत, एक पुण्याची शीतल महाजन व दुसरा नगरचा अप्पासाहेब ढूस. मात्र, या दोघांमध्ये राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा भेदाभेद करत वेगवेगळा न्याय देत आहे.
शीतल महाजनची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद झाली म्हणून राज्य सरकारने तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून ७ लाख रुपयांची आर्थिक मदत व विदेशातील पुढील प्रशिक्षणासाठी मदत म्हणून क्रीडा विकास निधीतून १५ लाख रुपये देऊन कौतूक केले. नगर जिल्ह्य़ातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील अप्पासाहेब ढूस हा खेळाडू सन २००० पासून हवेतील साहसी क्रीडा प्रकारात प्रावीण्यप्राप्त आहे, पॅराजंपिंग याच साहसी क्रीडा प्रकारात त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद झाली. गेल्या चार वर्षांपासून तो राज्य सरकारकडे विदेशातील प्रशिक्षण व शिवछत्रपती पुरस्कारासाठी पाठपुरावा करत आहे, परंतु सरकारने त्याला पुरस्कारापासून वंचित तर ठेवलेच, शिवाय क्रीडा विकास निधीतून विदेशातील प्रशिक्षणाऐवजी केवळ विमान प्रवास खर्च देण्याचे मान्य करुन त्याची थट्टाच केली आहे.
घरातील हलाखीच्या परिस्थितीपुढे न डगमगता अप्पासाहेब याने साहसी क्रीडा प्रकारातील जिद्द कायम ठेवत, पायाला रबरी दोर बांधून ८३ मीटर खोल दरीत उडी घेण्याच्या ‘बंजी जंप’ प्रकारात नवीन इतिहास रचला. अलिकडेच हरिद्वार येथे त्याने ही उडी घेतली. त्यातून नगर जिल्हाही साहसी क्रीडा प्रकारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. आपण देशात सध्या जुमरींग, पॅरासेिलग, पॅराग्लायडिंग, पॉवर पॅराग्लायडिंग, पॉवर हँग, ग्लायडिंग, पॅराजंपिंग व बंजी जंपिंग या हवेतील सात साहसी क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवणारे एकमेव असल्याचा अप्पासाहेब यांचा दावा आहे.