विजय वडेट्टीवार यांचा आरोप; मेडिगट्टाप्रकरणी आंदोलनाचा इशारा

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दबावामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील कालेश्वरम-मेडिगट्टासह तीन प्रकल्पांच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. राज्यपाल तेलंगणाच्या हिताची जबाबदारी पार पाडत आहेत. राज्यपालांच्या दबावात सरकार काम करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते  विजय वडेट्टीवार यांनी केला. करार झालेला नाही, याबाबत कल्पना नाही, केवळ २७ एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे, शंभर मीटरने उंची कमी केली, अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन करीत आहेत. त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करून प्रसंगी मेडिगट्टाप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

तेलंगणा सरकार बांधत असलेल्या प्रकल्पांबाबत वडेट्टीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव येथे बसून तेलंगणाच्या हिताची जबाबदारी पार पाडत आहेत. कालेश्वरम-मेडिगट्टा धरणासाठी ते सर्वतोपरी मदत करीत आहेत. गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रम बघता ते तेलंगणाला फायदा होईल या दृष्टीने काम करीत आहेत. हे राज्याचे दुर्दैव असून त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही.  येत्या २५ मे रोजी महाजन चंद्रपूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर असून त्यांना या संदर्भात एक निवेदन देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

‘निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी’

महसूलमंत्री एकनाथ खडसे आरोप झाल्याने अडचणीत आलेले आहेत. तत्पूर्वी पंकजा मुंडे या देखील चिक्की घोटाळय़ात अडकल्या होत्या. या सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.