म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतर प्रशासनाकडे ५ निनावी तक्रारी आल्या असून याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी जिल्हास्तरीय बठकीत दिली. यावेळी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकानी चोख काम करत सखोल व गांभीर्याने तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले.

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भिलग निदान तंत्र अधिनियम अंतर्गत जिल्हा दक्षता समितीच्या बठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त एस. एम. साक्रीकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्यासह अन्य शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अवैध सोनोग्राफी सेंटर किंवा गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भिलग निदान तंत्र अधिनियमाची पायमल्ली करण्याबाबत प्राप्त निनावी तक्रार अर्जाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे आदेश देऊन जिल्हाधिकारी गायकवाड यांनी, स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे व यासाठी कार्यशाळा घ्यावी, तसेच विविध माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.

या वेळी जिल्ह्यतील सर्व तालुका समुचित अधिकाऱ्यांच्या मार्फत व त्यांच्या पथकांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या सोनोग्राफी सेंटर व खाजगी दवाखान्यांच्या तपासणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच, एफ फॉर्म, ऑनलाईन तक्रारी, जिल्ह्यतील सोनोग्राफी केंद्र, एमटीपी केंद्र यांचे नोंदणीकरण व नूतनीकरण यांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी डॉ. संजय साळुंखे यांनी टोल फ्री क्रमांक तसेच ऑनलाईन संकेतस्थळावर ५ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे सांगितले.