जागतिक पातळीवर पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, चीनसारख्या विकसित देशात आता माणसाला जगण्यासाठी बाटलीबंद प्राणवायू (ऑक्सिजन) विकत घ्यावा लागत आहे. भारताची वाटचालही आता याच दिशेने होऊ घातली असून, येत्या काही दिवसात येथेसुद्धा माणसाला जगण्यासाठी प्राणवायू विकत घ्यावा लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. मुंबईत ट्रॅफिक पोलीस बुथवर ‘ऑक्सिजन मास्क’ ठेवण्यास सुरुवात झाली आहे.
औष्णिक विद्युत केंद्रे, रसायन कारखाने, सिमेंट कारखाने यासारख्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांची संख्या चीनमध्ये झपाटय़ाने वाढत आहे. परिणामी चीनमधील शांघायसह इतरही बऱ्याच शहरांमध्ये वातावरणातील प्राणवायूची पातळी अतिशय खालावली आहे.
त्यामुळे चीनमधील सामान्य माणसालासुद्धा आता श्वसनाच्या रोगाने ग्रासल्यामुळे अनेक दुकानांमध्ये बाटलीबंद प्राणवायू विकण्यास सुरुवात झाली आहे. सॉफ्ट ड्रिक्सच्या कॅनमधून विकल्या जाणाऱ्या या ऑक्सिजनची किंमत पाच चिनी युवान इतकी आहे. प्राणवायूअभावी सामान्य माणसांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहूनच तेथील एक अब्जाधीश चेन गुवांग बियो यांना प्राणवायूच्या विक्रीची कल्पना सुचली. प्रामुख्याने शांघायमध्ये विक्री होणाऱ्या प्राणवायूवर जगणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
प्राणवायू विक्रीमुळे प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर झाला आहे याची प्रचिती आली आहे. मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारला ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणवायू विक्रीसाठी तयार राहावे लागणार आहे. त्यादृष्टीने मुंबईची वाटचालसुद्धा सुरू झाली आहे.
चीनसारखी प्राणवायू विक्री भारतात अजून सुरू झालेली नसली तरीही, श्वसनाचा त्रास होणाऱ्या वाहतूक पोलिसांसह अनेक नागरिक याठिकाणी येऊन प्राणवायू घेतात. प्राणवायू हा मानव तसेच प्राण्यांना उर्जा तयार करण्यासाठी वापरात असलेला मूलभूत घटक आहे. व्यक्ती पाण्याशिवाय तीन दिवस, अन्नाशिवाय सात दिवस जगू शकतो.
मात्र, प्राणवायूअभावी तो तीन ते पाच मिनिटाच्या वर जगू शकत नाही. माणसाच्या शरीराला लागणाऱ्या एकूण प्राणवायूपैकी मेंदूला २४ टक्के प्राणवायूची गरज असते. उर्वरित ७६ टक्के प्राणवायू उर्वरित शरीरातील पेशी वापरतात. पर्यावरणात प्राणवायूचे प्रमाण आता केवळ २१ टक्क्यांच्या सुमारास आहे.
येत्या शंभर वर्षांत ते २० टक्क्यांवर येईल. पुरेशा प्रमाणात प्राणवायू न मिळाल्यास प्रकृतीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अस्वस्थता, श्वास लागणे, डोकेदुखी, थकवा, स्मृतिभ्रंश ही कमी प्राणवायू पुरवठय़ाची लक्षणे आहेत.
भारतातील उद्योगांची वाढती संख्या बघता, किंबहूना पर्यावरण नियमांचे पालन न करता उभारलेले हे उद्योग बघता येत्या काही वर्षांत भारताचेही चीन होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती या क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
झाडे ही प्राणवायू तयार करणारी यंत्रे आहेत आणि अलीकडच्या काळात या यंत्रावरच मोठय़ा प्रमाणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. ही वृक्षतोड अशीच सुरू राहिल्यास प्राणवायू निर्मितीची प्रक्रिया थांबवली जाईल आणि मोठय़ा प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साईडची निर्मिती होईल. हा वायू पाण्यात सहजपणे विरघळत असल्यामुळे पाणीसुद्धा आम्लयुक्त (अ‍ॅसिडीक) होईल. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि माणसाला जगण्यासाठी प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या झाडांची तोड करू नका. अन्यथा भारतातही माणसाला जगण्यासाठी प्राणवायू विकत घेण्याची वेळ येईल, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ व इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी दिला आहे.