आमदार कदमांचा टोला

जिल्ह्य़ाच्या तीन तालुक्यांमधील जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सत्तेतून बाहेर पडून आंदोलन करावे, असा टोला दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी लगावला आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्य़ात कृषि विभागातर्फे हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांमधील कामांमध्ये कोटय़वधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी गेल्या आठवडय़ात केला. जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या झालेल्या बैठकीत त्याबाबत चर्चा होऊन या कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय कदम, कृषि अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचा योगेश कदम यांचा आरोप आहे, तर एकूण कामापैकी ८० टक्के कामे सेनेशी संबंधित ठेकेदारांना दिली गेल्याचा पलटवार आमदार कदम यांनी केला आहे.

या संदर्भात आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळात राहून रामदास कदम अशा प्रकारे आपल्या चिरंजीवांमार्फत  एकीकडे सरकारला बदनाम करत आहेत आणि दुसरीकडे माझ्यावरही राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. संबंधित वादग्रस्त कामांचे ठेके माझ्याशी संबंधित कुणाही व्यक्तीने घेतलेले नाहीत. पण रामदासभाईंनी अशा पध्दतीने मुलाच्या आडून हेत्वारोप करण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडून कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने करावीत.

पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार कदम यांच्यातील राजकीय संघर्षांची किनार या सबंध प्रकाराला असून आमदारांच्या वर्चस्वाला धक्का देत चिरंजीव योगेश यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही या सबंध विषयाकडे पाहिले जात आहे.