काही महिन्यांपासून येथील फाशी पुलावरील गटारीचे काम रखडले असून काम संथपणे सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रोजच याठिकाणी अपघात होत आहेत. अनेक वेळा वाद उद्भवत असल्याने या वादाचे पर्यवसान मोठय़ा घटनेत होण्याची शक्यता आहे. मनपाच्या या ढिम्म कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी धुळे बार असोसिएशनतर्फे वकिलांनी रस्त्यावर उतरत महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचा धिक्कार केला.

नेहमीच्या कोंडीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यासंबंधी वारंवार तक्रार करूनही समस्या ‘जैसे थे’ आहेत. वकिलांनी फाशी पुलावरील रखडलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले. यावेळी धुळे बार असोसिएशनने मनपासह ठेकेदाराचा धिक्कार केला.

येथील लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे संकुलासमोरील गटारीचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामामुळे रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आल्याने एकेरी वाहतुक सुरु आहे. आधीच हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते. शिवाय, बाजुलाच एक खड्डा असल्याने येथे अनेक अपघात झाले आहेत. यासंबंधी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारीही करण्यात आल्या. परंतु, त्याचा काहीही उपयोग न झाल्याने अखेर बार असोसिएशनने आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी ११ वाजेच्या सुमारास बार असोसिएशनची वकील मंडळी याठिकाणी धडकली. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारासह मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रकरणी धुळे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बार संघाचे अध्यक्ष श्यामकांत पाटील, उपाध्यक्ष समीर सोनवणे, सचिव मधुकर भिसे, अमित दुसाणे आदींनी दिला आहे.