उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलू शकतात, तसेच राज्यातील सत्तेचा आणि मुंबई महापालिकेतील सत्तेचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच घेतील, असा विश्वास शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्या मनात नेमके काय आहे आणि शिवसेनेबाबत त्यांना प्रेमभावना कशी निर्माण झाली याबाबत मी बोलणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, तालुका प्रमुख रूपेश राऊळ उपस्थित होते. जिल्ह्य़ात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल समाधान मानता येणार नाही. जिल्ह्य़ाची संघटनात्मक बांधणी आणि शिवसेनेला मिळालेला फायदा याचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख यांच्या समोर ठेवून संघटना पुनर्बाधणीचा निर्णय घेतला जाईल, असे खासदार राऊत म्हणाले.

जिल्ह्य़ात युती झाली नसली तरी कुडाळात शिवसेनेला चांगले यश मिळाले तसे सावंतवाडीत मिळाले नाही, अशी खंत खासदार राऊत यांनी व्यक्त केली.

त्याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौरांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. राणे त्याबाबत नेमके काय बोलताहेत याबाबत मी बोलणार नाही, असे खासदार राऊत यांनी सांगून राजकारण व प्रेमात सारे काही माफ असते, बदलत्या राजकारणात काहीही होऊ शकते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलतील, असे शिवसेना सचिव खासदार राऊत म्हणाले.

राज्याच्या सत्तेचा आणि मुंबई महापालिकेतील सत्तेचा निर्णय पक्षप्रमुखांचा असेल, पण मुंबई महापालिकेचे राजकारण राज्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरेल, असे खासदार राऊत यांनी सांगितले. नारायण राणे यांच्याशी आमचे वैर नव्हते, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्रासदायक निर्णय घेतले, तसेच शिवसैनिकांना त्रास दिला त्यामुळेच राणेंना विरोध केला असे ते म्हणाले.

शिवसैनिकांच्या भावना उद्धवजींच्या कानावर घातल्या जातात. त्यानंतर शिवसेनेचा फायदा शिवसैनिकांच्या मतावर ठरविला जातो. भाजपसोबत जाण्यास शिवसैनिकांत मतप्रवाह आहेत, असे खासदार राऊत म्हणाले.

मुंबई व ठाणे वगळून राज्यात चारच्या पॅनेलची निवडणूक पद्धत भाजपने फायद्यासाठी आणली. मराठी माणसे मुंबईत सेनेसोबत राहिली, पण काही प्रमाणात मनसेला मराठी बांधवांनी साथ दिल्याचा फटका बसला. मनसेचा युतीचा निर्णय शेवटच्या क्षणी प्रस्ताव आल्याने अडचणी निर्माण झाल्या. अमराठी लोकांनी भाजपला साथ दिली असे खासदार राऊत म्हणाले.

सिंधुदुर्गात शिवसेनेची मते आणि जिल्हा परिषदेत सीट वाढल्या. पाच पंचायत समितींत शिवसेना सत्तेत आहे. सेना-भाजपची मतदारसंख्या वाढली तशी काँग्रेस-राष्ट्रवादीची घटली, असे खासदार म्हणाले.