केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रचंड गाजावाजा करत चालवल्या जात असलेल्या रोहयो योजनेतील भ्रष्टाचार आता जीवघेणा ठरू लागला आहे. या योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतमजुरांचे जगणे कठीण बनले आहे. या जिल्ह्यातील सहा मजुरांनी अलिकडच्या काळात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
दत्ता माघाडे (रा. टिटवी, जि. बुलढाणा)या मजुराने ७ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सिल्लोड तालुक्यातल्या रोहयोच्या कामातला गोंधळ चच्रेत आला आहे. मात्र त्याआधी याच गावातील प्रल्हाद शामजी कोकाटे, चांगुणाबाई गजानन डाखोरे या दोन मजुरांनी आत्महत्या केल्या. तर गोत्रा (जि.बुलढाणा) येथील महादू सोनाजी राऊत या मजुराने १ जून २०१२ या दिवशी आत्महत्या केली. तर अमृता गोरे याने २८ ऑगस्ट २०११ रोजी आत्महत्या केली. सिल्लोड येथेच कामावर असलेल्या जिंतूर तालुक्यातील जोगवाडा या गावच्या सुनिता तुकाराम वाळके या महिलेने गेल्याच महिन्यात २३ जूनला तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिगंबर सुखदेव व्यवहारे (ढगी बोरगाव, ता.जि.जालना) या शेतमजुराची आत्महत्या ही या शृंखलेतली पहिली घटना असून गेल्या दीड ते दोन वर्षांंपासून या आत्महत्येच्या घटना घडत आहेत.
रोहयोतील भ्रष्टाचार
* सिल्लोड तालुक्यात २००९ ते २०१० आणि २०१० ते २०११ या दोन वर्षांच्या कालावधीत बोरगाव, बहुली, वडद, धारला, चारणेरवाडी, तळणी, दिग्रस, जांभई, आधारवाडी आदी गावांमध्ये जी कामे म.गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली.
* या कामांवर सेनगाव(जि.हिंगोली), लोणार (जि.बुलढाणा), मंठा (जि.जालना), जिंतूर (जि.परभणी) या तालुक्यातले मजूर कामासाठी होते. बहुतांश मजूर हे आदिवासी पट्टय़ातले आहेत.
* या मजुरांच्या नावे जॉबकार्डही नसून त्यांना कामाचा मोबदलाही मिळालेला नाही.
* रोहयोच्या मजुरीची रक्कम सिल्लोड तालुक्यातील वेगवेगळ्या पोस्टऑफीसमध्ये पडून असून ती रक्कम अडीच कोटींच्या घरात आहे.
* ज्यांनी प्रत्यक्ष कामे केली त्यांची नावेच मस्टरवर नाहीत. त्यामुळे ही रक्कम पडून आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2013 रोजी प्रकाशित
शेतमजुरांच्याही जगण्याचा कडेलोट!
केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रचंड गाजावाजा करत चालवल्या जात असलेल्या रोहयो योजनेतील भ्रष्टाचार आता जीवघेणा ठरू लागला आहे.
First published on: 20-07-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mnrega corruption leads now vidarbha peasants to suicide