नक्षलग्रस्त अतिदुर्गम गावातील मतदान प्रक्रिया आटोपून जिल्हा मुख्यालयी परत जाणाऱ्या मतदान कर्मचारी पथकाला स्फोट करून उडविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध पेरलेली ३५ किलो स्फोटके गस्त घालताना पोलिस दलाला मिळाल्याने नक्षलवाद्यांचा डाव उधळला गेला. दोन बसगाडय़ा उडविण्याची क्षमता या स्फोटकांमध्ये आहे. दरम्यान, जांबियागट्टा पोलिस मदत केंद्राजवळ अडंगे येथे पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
लगतच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघात बुधवार, १५ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अतिदुर्गम भागातील मतदान कर्मचारी पथके  २४ तासानंतरही जिल्हा मुख्यालयी पोचलेली नाहीत. त्यामुळे या सर्व मतदान कर्मचारी पथकोंना  मतदान केंद्रावरून बेस कॅम्प व तेथून जिल्हा मुख्यालयी आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. बुधवार दुपारपासून पेंढरी, जांबियागट्टा, अडंगे व फुलबोडी येथील ५३ मतदान कर्मचारी पथकोंना जिल्हा मुख्यालयी आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दल व सी-६० चे पथक रोड ओपनिंग करीत असताना फुलबोडीजवळ रस्त्याच्या मधोमध १० किलो स्फोटके नक्षलवाद्यांनी पेरून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. ही स्फोटके निकामी केल्यानंतर मतदान कर्मचारी पथकोंना रस्ता मोकळा करून देण्यात आला, तसेच पेंढरी पोलिस उपविभाअंतर्गत येणाऱ्या मोहगाव येथून मतदान कर्मचारी पथकोंना मुख्यालयी आणले जात असतांना रस्त्यात १० किलो स्फोटके सापडली. ही स्फोटके निकामी करण्यात येत आहेत.
अजूनही नक्षलग्रस्त भागातील बहुतांश मतदान कर्मचारी पथके  जिल्हा मुख्यालयी पोचली नसल्याने भीतीचे वातावरण आहे. जांभियागट्टाजवळील अडंगे येथे नक्षलवाद्यांनी मतदान कर्मचारी पथकोंवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. उपविभाग अहेरी अंतर्गत आलापल्लीजवळ नक्षलवाद्यांनी घातपाताच्या इराद्याने पेरून ठेवलेली १६ किलो स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.