राज्यातील अभिमत महाविद्यालयाच्या पुढच्या फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारमार्फत पार पाडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वैद्यकीय प्रवेशाच्या रिक्त जागा राज्य सरकारच्या संयुक्त समुपदेशनाद्वारे भरण्यास सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यंदाच्या वर्षी हजारो विद्यार्थी नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशही मिळाला आहे. ही प्रवेश प्रक्रिया ७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या निर्णयामुळे खासगी आणि अभिमत महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ दूर होणार आहे. यापूर्वी अभिमत विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. राज्य सरकार संस्था चालविण्याच्या मुलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे अभिमत विद्यालयांचे म्हणणे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिमत महाविद्यालयांतील ८५ टक्के जागा भरल्या आहेत.