स्वातंत्र्यापासून विकास कामांचा दुष्काळ अनुभवणाऱ्या धुळे जिल्ह्य़ात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेले दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन तसेच धुळेमार्गे मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग कामास लवकरच सुरूवात, तापी नदीचा जलमार्ग यादीत समावेश या घोषणांमुळे जिल्हा तूर्तास सुखावला आहे. मागील सात वर्षांचा अपवाद वगळता सतत काँग्रेसचा पाठीराखा मानल्या गेलेल्या या जिल्ह्य़ात यानिमित्ताने आपला पाया मजबूत करण्यास भाजपने सुरूवात केल्याचे मानले जात असून भाजपेयींसाठी हा दौरा सुखावह ठरला आहे.

पायाभूत सुविधांशिवाय कोणत्याही शहराचा औद्योगिक विकास होऊ शकत नाही. काही शहरांमध्ये अशा सुविधा उपलब्ध असल्या तरी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशी शहरे विकासापासून मागेच राहतात. धुळे हे त्यापैकीच एक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारच्या दौऱ्यात आपल्या अवघ्या १० मिनिटांच्या भाषणात विकास कामांसंदर्भात विविध घोषणा दिल्याने धुळेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

बहुचर्चित मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गाची मागणी विविध आंदोलनांच्या माध्यमातून मांडण्यात आली. या मागणीसाठी संघर्ष समितीही स्थापन झाली. त्यासंदर्भात केंद्रात सत्तेवर आलेल्या सर्वानीच आश्वासने दिली. प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवर कोणताही निर्णय जाहीर करण्यात येत नसल्याने धुळेकर निराश झाले असताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्यक्ष निधीची तरतूद केल्याने हा मार्ग होऊ शकेल, यासंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यात भर म्हणून गडकरी यांनी या रेल्वे मार्गासाठी त्यांच्या अधिपत्याखालील खात्याला होणाऱ्या नफ्यातून अर्थसहाय्य करण्याची आणि निधी कमी पडलाच तर प्रसंगी आंतरराष्ट्रीय बँकेतून पैसा उभारण्याचे आश्वासन दिले. या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश ही दोन राज्ये जोडली जाण्यासह संपूर्ण देशात माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी मदत होणार आहे.

गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या अमरावती-सुरत तसेच धुळे-औरंगाबाद या महामार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत बचत होईल. भरीसभर म्हणून तापी नदीचा जलमार्ग म्हणून वापर करण्याची घोषणा झाली आहे. अशा प्रकारे रस्ता, रेल्वे आणि जल अशा त्रिस्तरीय वाहतुकीने धुळे शहर इतर राज्यांना जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाणी साठविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या बॅरेजशिवाय केवळ वाळू उपशामुळे सतत चर्चेत असलेल्या तापी नदीचा जलमार्ग म्हणून वापर सुरू झाला तर नदीपात्रातील अनेक बेकायदेशीर कृत्यांवर आपोआपच नियंत्रण येईल. सध्याच्या सात वर्षांचा कालावधी वगळता धुळे जिल्ह्य़ावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, विकासाच्या मोठय़ा योजना जिल्ह्य़ात आल्याच नाहीत.

असे असताना केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून जिल्ह्य़ास डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने संरक्षण राज्यमंत्रीपद, जयकुमार रावल यांच्या रूपात राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तसेच आता दोन राष्ट्रीय महामार्ग, धुळेमार्गे इंदूर रेल्वेमार्ग यांची भेट मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने जिल्ह्य़ातील राजकीय वातावरण बदलणेही शक्य होणार आहे.