गावविरोधात गेल्यामुळेच राज्याचे मंत्री सुरेश धस यांनी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची तक्रार केली. धस मंत्री असल्यामुळेच त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आंधळेवाडीत फेरमतदान घेण्यात येते आहे. तिथे फेरमतदान घ्यायला माझी काहीच हरकत नाही. मात्र, मीदेखील निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे सहा ते सात तक्रारी दिल्या आहेत. माझ्या एका कार्यकर्त्यांला कुऱहाडीने मारण्यात आले आहे. तसेच इतर कार्यकर्त्यांनाही मारण्यात आले असून, त्याविरोधात मी सुद्धा तक्रार केली आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील आंधळेवाडी येथे फेरमतदान घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून, येत्या गुरुवारी या मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी, १७ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता निवडणूक कर्मचाऱ्यांना धमकावून एक मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी १० जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटकेतील सर्व हे औरंगाबाद, आष्टी व नगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. राज्यात मतदान केंद्र बळकाविण्याचा गुन्हा नोंदविला गेलेला हा पहिलाच प्रकार आहे.
या मतदान केंद्रावर २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली होती. त्याला सोमवारी मंजुरी देण्यात आल्यामुळे आता आंधळेवाडी मतदानकेंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे.
भाजप समर्थकांनी बीडचे मतदान केंद्र बळकावले