मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लँडलाईनधारकांची संख्या झपाटय़ाने कमी झाली, हे एक कारण असले तरी नादुरुस्त दूरध्वनी लवकर दुरुस्त न होणे, अपुरा कर्मचारीवर्ग, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पुन्हा नवीन भरती न होणे, कंत्राटी पद्धतीने दुरुस्तीची कामे याचा थेट परिणाम बीएसएनएलचे ग्राहक कमी होण्यावर झाला आहे. मात्र, असे असले तरी ग्राहकांना कर्मचाऱ्यांमार्फत देयके, जनधन योजनेंतर्गत मोफत सीमकार्ड, शेतकऱ्यांसाठी प्रीपेड महाकृषी योजना, लँडलाईनचा वापर मोबाईलसारखा करता यावा या साठी एक हजारांत नवीन कनेक्शन आदी वेगवेगळ्या योजनांमधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही बीएसएनएलकडून सुरू आहे.
गेल्या ७ वर्षांपासून बीएसएनएलच्या तांत्रिक कार्यक्षमतेत एकूणच फारशी प्रगती न झाल्यामुळे त्याचा ग्राहक सेवेवर दूरगामी परिणाम होत आहे. मात्र, ग्राहकांच्या वाढत्या गरसोयींकडे अधिकारी-कर्मचारी यांचेही दुर्लक्षच होत असल्यामुळे ग्राहकांची नाराजी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.
बीएसएनएलचे जिल्हय़ात १० हजार पोस्टपेड, तर १ लाख ३० हजार प्रीपेड ग्राहक आहेत. शिवाय २२ हजार लँडलाईनधारक आहेत. बीएसएनएल सेवेसाठी जिल्हाभर १६६ मनोरे आहेत. ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेता मनोऱ्यांची संख्या अपुरी पडत असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे अवघड होत आहे. गेल्या ७ वर्षांत देश पातळीवर बीएसएनएलची तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी विविध कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या. काही ठिकाणी पुरेसे साहित्य न आल्याने काम अर्धवट राहिले, तर काही ठिकाणी ठेकेदाराने काम सुरू केलेच नाही. तांत्रिक क्षमतेत वाढ न झाल्यामुळे त्याचा ग्राहकसेवेवर परिणाम झाला. सात वर्षांपूर्वी लातूर शहरात ७० हजार लँडलाईनधारक होते. ही संख्या २२ हजारांवर घसरली आहे.
एक लाख ३० हजार ग्राहक प्रीपेड सेवा घेत असल्याने त्यांना बिल देण्याचा प्रश्न नाही. पण जे १० हजार पोस्टपेड मोबाईल ग्राहक व २२ हजार लँडलाईनधारक आहेत, त्यांना वेळेवर बिले पोहोचत नाहीत. काही ग्राहकांना तर महिनोनमहिने बिलेच मिळत नाहीत. बीएसएनएलचे अधिकारी हे काम आम्ही टपालाद्वारे करतो, टपाल खात्याची सेवा योग्य नसल्याचे कारण पुढे करीत आहेत. मात्र, अंतिमत: त्याचा फटका ग्राहकसेवेला, पर्यायाने बीएसएनएलला बसत आहे.
बीएसएनएलची सर्व कार्यालये सकाळी १० वाजता सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी या दोघांनाही वेळेचे कसलेही बंधन दिसून येत नाही. पाच टक्के कर्मचारीही वेळेवर उपस्थित नसतात. पाच वर्षांपूर्वी महाप्रबंधक जी. रामकृष्णन् यांच्या कालावधीत सकाळी १० वाजता अधिकारी-कर्मचारी यांची ‘इतनी शक्ती हमें दे न दाता..’ ही सामूहिक प्रार्थना होत असे. स्वत: महाप्रबंधक उपस्थित राहत असल्याने अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत.
ग्राहक देयके भरण्यासाठी सकाळपासून रांगा लावतात. मात्र, देयक स्वीकारण्यासाठी एकच खिडकी असल्यामुळे ती अपुरी पडते. देयके भरण्याच्या अंतिम तारखेदरम्यान तीन खिडक्या असायला हव्यात. मात्र, वरिष्ठ लक्ष देत नाहीत. ग्राहकसेवा, ग्राहकांचे हित याला केराची टोपली दाखवली जाते.
राज्यात सर्वोत्कृष्ट काम
खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना बीएसएनएलला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आमच्या क्षेत्रात चांगली स्पर्धा होत नाही, तर सेवा विस्कळीत होण्यासाठीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. रिलायन्स कंपनीने काही महिन्यांपूर्वी खड्डे खणून केबल तोडल्यामुळे बाराशे ग्राहकांची सेवा खंडित झाली. आम्ही कंपनीशी भांडून तब्बल ७ लाख रु.दंड वसूल केल्याचे उपमहाप्रबंधक ए. एम. चौधरी यांनी सांगितले.
जिल्हय़ात हेर, रावणकोळा, तांदुळजा, वडवळ नागनाथ आदी भागात मनोऱ्यांपासून केबल तोडण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. एकाच मनोऱ्यावर व्होडाफोनची सेवा सुरू व त्याच मनोऱ्यावरून बीएसएनएलची सेवा मात्र खंडित, असे चित्र दिसले. पाहणी केली असता जाणीवपूर्वक आमच्या केबल तोडण्यात आल्याचे आढळून आले. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ग्राहकांची देयके वेळेवर दिली जावीत, या साठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांमार्फत देयके देण्याची योजना आखली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांसाठी आकर्षक योजना
पंतप्रधानांच्या जनधन योजनेंतर्गत ग्राहकांसाठी मोफत सीमकार्ड योजना सुरू केली असून, ६ डिसेंबपर्यंत ही योजना सुरू राहील. शेतकऱ्यांसाठी प्रीपेड महाकृषी योजना ६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. लँडलाईनचा वापर मोबाईलसारखा करता यावा, या साठी एक हजार रुपयात नवीन कनेक्शन दिले जाणार आहे. त्यात १२५ रुपयांचा टॉकटाईम मोफत असेल. ब्रॉडबँड अमर्याद स्वरूपाचा वापर केवळ ५४५ रुपयांत सुरू आहे. अधिकाधिक ग्राहक आकर्षति व्हावेत, या साठी बीएसएनएलने दीपावलीनिमित्त योजना बाजारात आणल्या आहेत.