ग्रामीण डाक सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील ८०० डाकसेवक बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा परिणाम धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात झाला असून, ग्रामीण भागातील सुमारे ५०० डाक कार्यालय बंद आहेत. शुक्रवारी सकाळी सेवकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी शहरातील मुख्य डाक कार्यालयासमोर अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने निदर्शने केली.

अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना बुधवारपासून बेमुदत संपावर आहे. सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्या सोडवण्यासाठी चालढकल करत आहे. यासंदर्भात सरकार दरबारी दोनवेळा बैठका झाल्या. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर डाक सेवकांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिला.  तरीही सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे ग्रामीण डाकसेवकांनी म्हटले आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प आहे.

स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, लाईट बिल, पत्र व महत्त्वपूर्ण कागदपत्रे पडून  आहेत. दरम्यान आज धुळे शहरातील मुख्य कार्यालयात ग्रामीण डाकसेवकांनी निदर्शने करत प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.