लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात आघाडी मिळाली नाही किंवा काही मतदारसंघात नाममात्र आघाडी मिळाली, तरी काँग्रेसने जिल्ह्य़ातील आपल्या सर्व विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. पक्षाचे उमेदवार २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान आपापले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत भोकरमध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभेवर गेले असल्याने भोकरमध्ये काँग्रेसतर्फे त्यांची पत्नी अमिता रिंगणात उतरत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. हा बदल वगळता पालकमंत्री डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड दक्षिण) यांची उमेदवारीही पक्षाकडून निश्चित झाली आहे. मधल्या काळात काँग्रेस शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व पोकर्णा यांच्यात बेबनाव निर्माण झाला. परंतु खासदार चव्हाण यांनी सोमवारी त्यांच्यात समेट घडवून आणला.
हणमंतराव पाटील बेटमोगरेकर (मुखेड), माधवराव जवळगावकर (हदगाव) व रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) या आमदारांची उमेदवारी काँग्रेसश्रेष्ठींनी कायम ठेवली. मागील निवडणुकीत नायगावमध्ये अपक्ष निवडून आलेले वसंतराव चव्हाण यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षातर्फे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीनेही प्रदीप नाईक (किनवट) व शंकरअण्णा धोंडगे (लोहा-कंधार) या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला. त्यांच्या विरोधात पक्षाकडे कोणी उमेदवारी मागितली नाही. जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, असे जाहीर करीत रिंगणात उतरण्याची घोषणा सोमवारी केली. मधल्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे सर्व आमदार व त्यांची उमेदवारी गोत्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु निवडणूक आयोगासमोरील प्रकरणात खासदार चव्हाण यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यामुळे या आमदारांवरील संभाव्य गंडांतर परस्पर टळले.