सलग तिसऱ्या दिवशीही तुरीच्या भाववाढीचा तडका सुरूच असून, शुक्रवारी क्विंटलला पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली. किरकोळ बाजारातही किलोमागे १० रुपयांची भर पडून २३५ रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. महागाईच्या भडक्यात तुरीच्या डाळीचा तडका सर्वसामान्यांना परवडेनासा झाला असतानाच भावात दररोज होणाऱ्या किमान हजार रुपये वाढीच्या भडक्यामुळे आता समाजमाध्यमांमध्येही हा थट्टेचा विषय झाला आहे.

गेल्या सलग तीन दिवसांपासून रोजच तुरीच्या भावात किमान हजार रुपयांच्या पटीत वाढ होत असून शुक्रवारीही एक हजार रुपयांनी भाववाढीचा आलेख उंचावता राहिला. क्विंटलला १६ हजार रुपयांचा टप्पा गाठला गेला. लातूरच्या बाजारपेठेत जेमतेम ५० क्विंटल तुरीची आवक होती. ठोक भाव २०५ रुपयांवरून २१५ रुपयांवर पोहोचला असून, किरकोळ बाजारपेठेत मात्र तो तब्बल २३५ रुपये किलो झाला.

साठेबाजांवर कारवाईचे आदेश
मुंबई : डाळीचे उत्पन्न घडल्याचा फायदा उठवत साठेबाजी करून डाळीचे दर वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या साठेबाजांवर कठोर करावाईचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे तूरडाळ आयात करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात डाळीचे दर खाली येतील, असा दावा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केला. गेल्या काही दिवसांपासून तूरडाळीच्या भावात कमालीची वाढ होत असून किरकोळ बाजारात तूरडाळीचा दर प्रतिकिलो २२५ रुपये इतका उच्चांकी झाला आहे. राज्यात अपेक्षेपेक्षा तुरीचे उत्पन्न खूपच कमी आले आहे. त्याचा फायदा उठवत काही साठेबाजांनी डाळीची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून त्यामुळे भाव वाढत आहेत. त्यामुळे साठेबाजांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास दिले आहेत. साठेबाजांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.