राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प रखडलेलेच
महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या कामाला अद्याप गती मिळालेली नसून, नऊ प्रकल्पांचे काम फार काही पुढे सरकू शकलेले नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे मूळचे महाराष्ट्रातील असल्याने राज्यातील प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
देशातील रेल्वेचे जाळे हे ६६ हजार ६८८ कि.मी. एवढे आहे. यापैकी ६१२७ किमी रेल्वेचे जाळे राज्यात आहे. देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी राज्यातील रेल्वे मार्गाचे प्रमाण हे ९.२ टक्के आहे. राज्यातील रखडलेल्या रेल्वे मार्गाना गती मिळावी या उद्देशाने पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना राज्याने रेल्वे मार्गाच्या कामाचा आर्थिक वाटा उचलण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार काही राज्याने रेल्वेबरोबर करार केला असून, खर्चाचा काही टक्क्यांचा भार राज्य शासनाने उचलला आहे.
राज्यात रस्त्यांचे जाळे तीन लाख किमीचे
मुंबई : राज्यात रस्त्यांचे जाळे हे तीन लाख किमींपेक्षा जास्त झाले असून, राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासावर भर देण्यात आला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील काही प्रमुख महामार्गाना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने राज्यावरील बोजा काही प्रमाणात कमी झाला आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती वा देखभालीचे काम हे केंद्र सरकारकडून केले जाते. राज्यात २०१४-१५ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही ४७६६ कि.मी. होती. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आता ७४३८ कि.मी. झाले आहे. गडकरी यांच्यामुळे सुमारे अडीच हजार कि.मी. राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर झाले आहे.