‘सांगली-सातारा’ मतदार संघातील निवडणुकीत मतदार सहलीवर 

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरस असून, एकमेकांची मते फोडण्याच्या तयारीत असतानाच मतदार मात्र सहलीवर रवाना झाले आहेत. एका मताची बोली १० लाखांवर गेल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात चुरशीची लढत होत असली तरी काँग्रेसमध्ये शेखर माने यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. या बंडखोरीमागे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे असले तरी नामानिराळे राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम यांना सांगलीत येण्यास रोखण्याची संधी गमविण्याची सध्या तरी त्यांची इच्छा नाही. यामुळेच या निवडणुकीला अधिक रंगत आली आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी या पक्षाचे मतदार फोडण्याचे काम काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. यातूनच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे काँग्रेस नेते गेल्यामुळे वादही झाला. हा वाद हातघाईवर येता येता थांबला असला तरी राष्ट्रवादीतही आलबेल आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

या निवडणुकीला तिसरा पलू आहे तो भाजपचा. भाजप उमेदवार युवराज बावडेकर यांनी माघार घेतली असली तरी या गटाकडे असलेली मते कोणाच्या पारडय़ात जाणार यावर विजयाचा गुलाल ठरणार आहे. भाजपचे नेते ही मते १२० असल्याचे सांगत असले तरी ८० तरी आहेत. बदलत्या राजकीय स्थितीत ही मते राष्ट्रवादीची आहेत हे निश्चित, कारण भाजपवासीय नेते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे होते. यामुळे ही मते कोण घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.  या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन नेत्यांपकी कोणाचे प्राबल्य पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगलीवर आहे हे निश्चित करणारी निवडणूक घोडेबाजारामुळे अधिक तेजीत येणार हेही निश्चित आहे. मात्र या निवडणुकीत वसंतदादा घराणे पुन्हा एकदा दुसऱ्याच्या अंगणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे हेही तितकेच सत्य.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन नेत्यांपकी कोणाचे प्राबल्य पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगलीवर आहे हे निश्चित करणारी निवडणूक आहे.