सोलापूरमधील टेंभुर्णीजवळ एसटी महामंडळाच्या मिनी बस आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी बस उलटून खड्ड्यात पडल्याने या अपघातात बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

एसटी महामंडळाची मिनी बस माढा तालुक्यातील टेंभुर्णीवरुन अकलुजकडे निघाली होती. टेंभुर्णी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोविंद वृध्दाश्रमाजवळ मिनी बसला समोरुन येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात लव्हू रामा सौंदाणे या दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बसचालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नही केला. पण यात बस उलटून खड्ड्यात पडली. अपघातात बसमधील प्रवासी प्रसाद राजाराम इनामदार, शंकर जयवंत जुकले, मन्मथ शंकर जुकले, तुकाराम लक्ष्मण मस्के(वय ६५), शिवाजी नामदेव बोत्रे (वय ५५), मंदाबाई भारत बागाव (वय ५०), अर्जुन सोपान पराडे (वय ६०), पारुबाई दिगंबर नाईकनवरे (वय ६०) हे जखमी झाले.

जखमींवर टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चालक लचमा आकाराम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक आनंद खोबरे हे अधिक तपास करत आहे.