विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात असलेले जादा वाघ हे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असणाऱ्या कोयना, चांदोली व राधानगरी अभयारण्यात सोडता येऊ शकतात काय? यासाठीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याची सूचना सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. याबाबत पुढील महिन्यात नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक नाना खामकर यांनी दिली.

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक व्याघ्र संवर्धन परिषदेतील माहिती देताना खामकर बोलत होते. यावेळी विभागीय वन्यजीव अधिकारी मिलिंद पंडितराव, एस. एल. झुरे, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, व्ही. एस. थोरात, वनक्षेत्रपाल किरण साबळे यांची उपस्थिती होती.

खामकर म्हणाले, की  विदर्भातील ताडोबा, पेंच व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथे मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्षही वाढला आहे. यावर उपाय म्हणून वन्यजीव तज्ज्ञांनी ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त वाघ सोडण्याची सुचना केंद्र सरकारला केलेली आहे. या पाश्र्वभूमीवर विदर्भातील जादा वाघ ‘सह्य़ाद्री’त आणण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या देशात वाघ आहेत, अशा १३ देशांची नवी दिल्ली येथे जागतिक व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. या परिषदेत आपण सहभागी झालो होतो.

या परिषदेत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. त्याबरोबरच ज्या देशात वाघ नामशेष होत आहेत अथवा त्यांच्या शिकारी मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. अशा देशामध्ये वाघांचे जतन करण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी दर्शविली. व्हिएतनाम, कंबोडीया व म्यानमार या देशांमध्ये वाघ झपाटय़ाने कमी होत असल्याने या देशांना भारताने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत व देशाच्या बाहेर वाघ पाठविण्याबाबत चर्चा झाली.

जागतिक स्तरावर वाघांच्या स्थलांतरासाठी आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.

आपल्या देशात ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सरासरीपेक्षा कमी वाघ आहेत. अशा ठिकाणी देशांतर्गत व्याघ्र प्रकल्पातील अतिरिक्त वाघ पाठविले जावेत, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच व मेळघाट येथील वाघांची वाढलेली संख्या विचारात घेऊन या प्रकल्पातील जादा वाघ हे वाघ पश्चिम घाट क्षेत्रात स्थलांतरित करता येथील काय? अशा स्वरूपाची प्राथमिक चर्चा या परिषदेत झाली आहे. त्यानुसार सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात हे वाघ सोडता येऊ शकतील काय? याबाबतचा प्राथमिक अहवाल सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तयार करावा असे सूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.