मद्य उत्पादनांच्या विक्रीवाढीसाठी त्यांना महिलांचे नाव द्या, असे वादग्रस्त विधान करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. महिलांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. माझ्या हातून नकळत चूक घडली असून, यासाठी मी माफी मागतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त विधान केले होते. ज्या उत्पादनांना महिलांची नावे आहेत, त्यांची विक्री जास्त होते. त्यामुळे मद्य उत्पादनांच्या विक्रीवाढीसाठी त्यांना महिलांचे नाव द्यावे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळानेही ‘महाराजा’ या मद्याची विक्री वाढवण्यासाठी त्याचे नामकरण महाराणी करण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला होता.

गिरीश महाजन यांच्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये महाजन यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. तर चंद्रपूरमध्ये श्रमिक एल्गार संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी मूल पोलीस ठाण्यात महाजन यांच्याविरोधात तक्रार केली होती. पोलीस कारवाई झाली नाही आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही महिला कार्यकर्त्यांनी दिला होता.

वाद चिघळत असल्याने शेवटी गिरीश महाजन यांनी विधानासाठी माफी मागितली. महिलांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत दारुच्या ब्रँडना महिलांची जी नावे देण्यात आली ती पण मागे घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महाजन यांच्या माफीनाम्यामुळे या वादावर पडदा पडला.