छायाचित्रकार आणि आपला मित्र व अभिनेता सलमान खान यांच्यातील वादाला पूर्णविराम देण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने दर्शवली आहे. अलिकडेच आमिर खानची मुलगी इरा हिने एका सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. जेव्हा सामन्याच्या ठिकाणी स्टार मंडळी यायला लागली, तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी सलमान खानचे छायाचित्र काढण्यास नकार दिला. फक्त आयोजकांतर्फे ठेवण्यात आलेले छायाचित्रकारच छायाचित्र काढत होते. याआधी छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकारांची जशी धावपळ पाहायला मिळायची, तशी धावपळ यावेळी दिसून आली नाही. यावेळी छायाचित्रकारांनी आपला कॅमेरा बंद ठेवणेच पसंत केले. फक्त ‘कीक’ चित्रपटकर्त्यांमार्फत उपस्थित असलेले छायाचित्रकारच सलमानची छायाचित्र काढत होते. अलिकडेच सलमान आणि छायाचित्रकारांमध्ये झालेल्या वादानंतर छायाचित्रकारांतर्फे सलमानवर टाकण्यात आलेल्या बहिष्काराचा हा परिणाम होता.
हा सर्व प्रकार पाहून आमिर खान तातडीने छायाचित्रकारांजवळ आला आणि त्याने सर्व परिस्थिती समजावून घेऊन मध्यस्ती करण्याची तयारी दर्शवली. परंतु, हा सर्व प्रकार छायाचित्रकारांच्या संस्थेद्वारे हाताळला जात असल्या कारणाने संस्थेच्या निर्णयाचे पालन करीत पुढच्या कारवाईची वाट पाहाणे छायाचित्रकारांनी पसंत केले.