गेल्या महिन्यात शिमला येथे सुरू असलेल्या सुभाष कपूर यांच्या ‘गुड्डू रंगिला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अमित साधच्या पायाला दुखापत झाली. दुखापत एव्हढी जबरदस्त होती की त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करणे भाग पडले. त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे आगामी काळात तो अभिनय करणार असलेल्या तीन चित्रपटांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, सध्या चित्रीकरण सुरू असलेल्या ‘गुड्डू रंगिला’ चित्रपटाचे चित्रीकरणदेखील रखडले आहे. तिग्मानशु धुलियाच्या ‘यारा’ चित्रपटात तिग्मानशुच्या तरुणपणीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. ज्याचे चित्रीकरण जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्याता आहे. तर, कुशान नंदीच्या राजकीय-थरारपटात तो नवाझउद्दीन आणि चित्रंगदाबरोबर करणार आहे. अमितच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, साधारपणे सोमवारपासून तो चालायला लागण्याची शक्याता वर्तवली जात आहे.