‘देवदास’ बंगाली साहित्यातून जन्माला आलेला हा नायक आणखी किती काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्जनशील दिग्दर्शकांना भुरळ घालणार आहे कोण जाणे. बॉलीवूडचे ‘देवदास’प्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. देवदास, पारो आणि चंद्रमुखी यांच्या प्रेमाचा तोच जुना अध्याय पुन्हा एकदा आजच्या काळाचे संदर्भ घेऊन रुपेरी पडद्यावर येणार आहे. चित्रपटाचा नायकच ‘देवदास’ आहे, कथाही त्याच्याभोवतीच फिरते. त्यामुळे दरवेळी शिळ्या ताकाला नवी फोडणी असली तरी तिला ‘कढी’च म्हणावे लागते. तसे या चित्रपटाच्या नावाचे झाले आहे. म्हणून २०१५ साली येणाऱ्या आपल्या चित्रपटाला दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी ‘और देवदास’ असेच नाव देऊन टाकले आहे.
शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ कादंबरीवर आत्तापर्यंत हिंदीसह विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हिंदीतच आत्तापर्यंत चार ‘देवदास’ येऊन गेले आहेत. सर्वात पहिला ‘देवदास’ साकारला होता तो के. सैगल यांनी, मग दिलीप कुमार यांचा ‘देवदास’ आला. दिलीप कुमार यांचा प्रभाव असणाऱ्या शाहरूखनेही ‘देवदास’ साकारला. तर याच देवदासचे अत्याधुनिक रूप म्हणून अभिनेता अभय देओल याने ‘देव डी’ केला. आता सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘और देवदास’ या हिंदीतील पाचव्या आवृत्तीत ‘अग्ली’फेम राहुल भट देवदासची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक म्हणून सुधीर मिश्रांची वाट नेहमीच वेगळी राहिली आहे. त्यांचे चित्रपट, विषय, कलाकार आणि मांडणी सगळेच वेगळ्या पद्धतीचे असते. त्यामुळे ‘और देवदास’मध्येही कलाकारांच्या निवडीपासूनच तो वेगळेपणा दिसून येतो.
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याची संधी राहुलला मिळाली. ‘अग्ली’तील राहुलचे काम पाहूनच आपल्या चित्रपटासाठी देवदास म्हणून त्याची निवड केली असल्याचे सुधीर मिश्रा यांनी सांगितले. या देवदासच्या पारोची भूमिका चक्क अभिनेत्री रिचा चढ्ढाकडे गेली आहे. तर चंद्रमुखीच्या भूमिकेत नाजूक नार अदिती राव हैदरीची निवड सुधीर मिश्रांनी केली आहे. एवढे वेगळे कलाकार निवडण्यामागे आपल्या ‘देवदास’ची मांडणी वेगळी असल्याचे कारण सुधीर मिश्रांनी दिले आहे.