योगिता दांडेकर
यावर्षीची माझी दिवाळी सामाजिक व सांस्कृतिक अशा दोन्ही पातळ्यांवर खूप खूप वेगळी अशीच आहे. सामाजिक पातळीवर सांगायचे तर, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने मी पुणे शहरातील शरीरविक्री करणा-या शंभरजणींना साडी भेट देणार आहे. त्यांना सतत कशाना कशा पद्धतीचा आधार देत आनंदी करणे मला नेहमीच महत्त्वाचे वाटले आहे. ‘जरा संभाल के’ या चित्रपटात मी त्या स्वरुपाची भूमिका साकारली तेव्हा मला त्यांच्या सुख-दुःख, वेदना-तणाव यांची कल्पना आली. एखादी भूमिका पडद्यावरच राहू नये असे मला नेहमी वाटते. सांस्कृतिक गोष्टीबाबत सांगायचे तर ‘निर्भय’ व ‘लावण्यवती’ असे माझे दोन चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाल्याचा दिवाळी आनंद आहे. लहानपणीच्या दिवाळीची एक आठवण सांगायची तर तेव्हा चाळीत राहत असताना एका कामवाली बाईच्या मुलाला फुलबाजा देताना माझे पप्पा रागावतील असे वाटले, पण त्यांनी माझ्या कृतीचे समर्थन केल्याने माझ्यात समाजहित मुरले.