काही वर्ष राजकारणात घालवल्यानंतर अभिनेता गोविंदाने गेल्यावर्षी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. आपल्याला शोभतील अशा चांगल्या भूमिका असतील तरच आपण काम करू, असा पवित्रा सध्या गोविंदाने घेतला आहे. त्यानुसार, गेल्यावर्षी यशराजच्या ‘किल दिल’ आणि सैफ अली खानबरोबर ‘हॅप्पी एंडिंग’ असे दोन चित्रपट त्याने केले. मात्र, या दोन्ही चित्रपटांना फारसे यश न मिळाल्याने गोविंदाच्या पुनरागमनाचीही फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे यावर्षी छोटय़ा पडद्यावर काही क रून पाहूयात म्हणत तो चौदा वर्षांनी टीव्हीवर परतला आहे.
गोविंदाचे नाव घेतले की गोविंदा स्टाईल नृत्य आणि त्याचा विनोद या दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. छोटय़ा पडद्यावर परतण्यासाठी त्याने आपल्या आवडत्या छंदाचा आधार घेतला आहे. झी टीव्हीच्या ‘डान्स इंडिया डान्स’(डीआयडी)च्या सुपरमॉम्स पर्वासाठी परीक्षक म्हणून गोविंदा काम पाहणार आहे. या शोचे परीक्षक नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्याबरोबर तिसरा परीक्षक म्हणून गोविंदाने सूत्रे हातात घेतली आहेत. या शोच्या ऑडिशनच्या भागाचे चित्रिकरणही त्याने पार पाडले.
इतक्या वर्षांनंतर टीव्हीकडे परतण्याचा निर्णय का घेतला?, या प्रश्नावर मात्र त्याने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले आहे. चित्रपट आणि मालिकांसाठी त्याने ‘निवडक’ गोष्टी करण्यावर भर दिला होता. मात्र, आपण एवढी निवडक भूमिका घेतली की आता निवडण्यासाठी माझ्यासमोर पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे सध्या माझ्याकडे ज्या ऑफर्स येत आहेत. त्यातले जे जे आश्वासक वाटेल ते मी ताबडतोब स्वीकारतो, असे उत्तर गोविंदाने दिले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘चींची’ नावाने लोकप्रिय असलेल्या गोविंदाला त्याचा हा निवडकपणा भलताच महागात पडला आहे. मला पुन्हा पहिल्यासारखे व्हायचे आहे. माझ्या कारकिर्दीतील माझे पहिले दिवस जसे होते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे, असे सांगत त्याची तयारीही आपण सुरू केली असल्याचे गोविंदाचे म्हणणे आहे. त्याच्या समकालीन कलाकारांप्रमाणे त्यालाही पुन्हा लोकप्रियतेचे शिखर सर करायचे आहे. ‘डीआयडी’ ही त्याची सुरूवात आहे.