वयाच्या ८१ व्या वर्षीही उत्साहाचा अखंड झरा असलेल्या आशा भोसले आणि वयाच्या ६४ व्या वर्षांत असूनही चिरतरुण दिसणारी अभिनेत्री रेखा यांची ‘केमिस्ट्री’ पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना ‘लाइव्ह’ पाहायला मिळाली. आशाताईंनी सूर छेडले आणि रेखाची पावले आपोआपच थिरकली..उपस्थितांनीही शिट्टय़ा व टाळ्यांच्या कडकडाट करत आपल्या पसंतीची मोहोर उमटविली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात हा योग जुळून आला. निमित्त होते महेश टिळेकर यांची संकल्पना तसेच निर्मिती-दिग्दर्शन असलेल्या ‘मराठी तारका’च्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे. उपस्थित प्रेक्षकांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे या नात्याने साक्षीदार होते.
आशाताईंच्या भाषणानंतर रेखा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आशाताईंनी काहीतरी गुणगुणावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर ‘मी गाणे म्हणते पण त्यावर तूही थोडासा पदन्यास केला पाहिजेस,’ असे आशाताईंनी रेखाला सांगितले. रेखावर चित्रित झालेल्या आणि आशा भोसले यांनीच गायलेल्या ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ या लोकप्रिय गाण्याचे सुरुवातीचे ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा..’ हे शब्द रेखा यांनी म्हटले आणि ‘बंगलोर, गोवा नी काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ हे शब्द आशा भोसले यांनी पूर्ण केले. त्यातही आशा भोसले यांनी ‘अहो सांगा ना राया हनीमूनला’ हे शब्द असे काही ठसक्यात उच्चारले की त्यावर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या दिल्या.
त्यानंतर आशा भोसले यांनी पदर खोचत पुन्हा माईक हातात घेतला आणि ‘हं, चल आता मी गाणे म्हणते आणि तू पदन्यास कर’ असे प्रेमाने रेखाला दटावले. कोणत्याही संगीत वाद्याच्या साथीशिवाय आशा भोसले यांनी ‘उमराव जान’ चित्रपटातील रेखावरच चित्रित झालेले ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा, मान लिजिए’ हे गाणे सुरू केले आणि रेखा यांनी त्यावर ताल धरत पदन्यास करून त्यावर कळस चढविला.. यानंतर सभागृहात काही क्षण टाळ्या आणि शिट्टय़ांचेच आवाज घुमत राहिले.. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहिदा रहेमान, लेखिका शोभा डे, नृत्यगुरू पं. बिरजू महाराज आणि विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.