अभिनय क्षेत्रात येऊ पाहणारा आयुष शर्मा या दिल्लीस्थित तरूणाशी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता डेटिंग करीत असल्याचे वृत्त आहे. याआधी अर्पिता खान बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच अर्जुननेदेखील जाहिररित्या याची कबुली दिली होती. अनेकवेळा अर्पिता आणि आयुषला मित्रांबरोबर एकत्र पाहिले गेले आहे. शिवाय एकमेकांना अलिंगन दिलेली छायाचित्रे दोघे अनेक वेळा टि्वट करत असतात. आयुष हा आपला सर्वात चांगला आणि जवळचा मित्र असल्याचे अर्पिताचे म्हणणे आहे, तर अर्पिताबरोबर प्रत्येक क्षण चांगला जात असल्याचे आयुष म्हणतो. अर्पिता खान ही सलिम खान आणि हेलनची दत्तक मुलगी आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्पिता आणि आयुष कुटुंबियांसमवेत शिमला येथे सुटीचा आनंद लुटत आहेत. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या वावड्यासुध्दा उठत आहेत.