अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामुळे ‘दंगल’ या चित्रपटासाठी त्याने घेतलेले कष्ट आणि मेहनत पाहून सध्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये अभिनेता आमिर खान सध्या व्यग्र आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये आमिर खानने नुकतीच उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये आमिरने बऱ्याच विषयांवर त्याची मतं मांडली. आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखले जाते. पण, त्याच्या नावाला जोडल्या गेलेल्या याच विशेषणामुळे आमिरने एक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे अनेकांनाच त्याने पेचात पाडले आहे.

वाचा:  परफेक्शनिस्ट आमिरच्या ‘दंगल’ला सेन्सॉरचा हिरवा कंदिल

‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने अभिनेता आमिरला ज्यावेळी याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला, ‘मला या परफेक्शनिस्ट विशेषणामुळे स्वत:वर कोणत्याही प्रकारचा दबाव असल्याचे कधीच वाटत नाही. कारण मी या विशेषणावर विश्वासच ठेवत नाही. किंबहुना हे विशेषणच चुकिचे आहे. तसं पाहायला गेलं तर, माझ्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्टपेक्षा मिस्टर पॅशनेट हे विशेषण जास्त साजेसे आहे असं मला वाटतंय’. यापुढे आमिर असेही म्हणाला की, ‘मी आता जसा आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी परफेक्शन वगैरे असे काही अस्तित्वात नाही. कलाक्षेत्रात सर्वोत्तम असे काहीच नसते. गोष्टी सतत बदलत असतात. त्यामुळे हा प्रत्येकाच्या विचार करण्याच्या दृष्टाकोनातून सर्वोत्तमपणा ठरत असतो’, असे म्हणत ‘मला परफेक्शनिस्टपेक्षा पॅशनेट म्हणा’ असेही त्याने सांगितले.

त्यामुळे आता आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणावे की पॅशनेट? असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, सध्या विविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ‘दंगल’चे सर्वच कलाकार व्यग्र आहेत. पण, प्रसिद्धीचा मुख्य स्त्रोत मानल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाचे प्रमोशन केले जात नाहीये. ‘दंगल’च्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटाच्या मेकिंगचे काही व्हिडिओ, आमिरच्या व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आणि अशा हटके मार्गांचा अवलंब करत ‘दंगल’ या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आमिरने साकारलेली महत्त्वाकांक्षी वडिलांची भूमिका प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.