बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट आमिर खानवर आगामी ‘दंगल’ चित्रपटातील भूमिकेबद्दल कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी आमिर खानने शरिरयष्टीवर घेतलेली मेहनत याचे मुख्य कारण आहे. कुस्ती आखाड्यावतील खेळाचे दर्शन घडविणाऱ्या आगामी चित्रपटासाठी आमिरने अधिक मेहनत घेतली आहे. आमिरला या चित्रपटासाठी एकदा वजन कमी करावे लागले, तर एकदा वजन वाढविण्यासाठी कसरत करावी लागली. यासाठी करावी लागणाऱ्या कसरतीचा एक व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओमधील त्याच्या दोन लूक संदर्भात सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

‘दंगल’च्या लूकच्या चर्चेनंतर आता आमिरच्या आगामी नव्या लूकची हिंट समोर आली आहे. आमिप प्रोडक्शन हाउसच्या आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटामध्ये आमिरचा आणखी एक नवा लूक पाहायला मिळणार आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, आमिर आपल्या माजी व्यवस्थापक अद्वेत चंदन यांच्या दिग्दर्शनाखाली येणाऱ्या चित्रपटामध्ये ‘कैमियो’ च्या लूकमध्ये दिसणार आहे. आमिर या चित्रपटामध्ये सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून आमिरच्या आगामी लूकची माहिती जारी केली आहे.

आमिर खान प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘सीक्रेट सुपरस्टार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे तरणने म्हटले आहे. या चित्रपटात आमिर एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. आमिर खानचा हा चित्रपट ४ ऑगस्ट २०१७ मध्ये प्रदर्शित होणार असून . या चित्रपटाचे कथानक आणि दिग्दर्शनाचे काम हे अद्वेत चंदन पार पाडणार आहेत. आमिर खान सध्या आगामी चित्रपट दंगल प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दंगल या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का? हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेकांचेच लक्ष या चित्रपटाटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागून राहिले आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आमिरच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपट म्हटले की त्याची प्रसिद्धी आलीच. पण, आमिर त्याच्या ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका वेगळ्याच मार्गाचा अवलंब करताना दिसतोय.